Revised Common Lectionary (Semicontinuous)
देव खरी तृप्ती देणारे “अन्न” देतो
55 “तहानलेल्यांनो, या आणि पाणी प्या.
तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका.
या आणि पोटभर खा, प्या.
अन्न आणि मद्य ह्यासाठी पैसे पडणार नाहीत.
2 जे खरोखरचे ‘अन्न’ नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता?
तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता?
माझे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल.
तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल.
3 मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल तुम्ही माझ्याकडे या.
मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन.
हा करार मी दावीदाबरोबर केलेल्या करारासारखा असेल.
मी दावीदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन.
तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता.
4 मी, सर्व राष्ट्रांकरिता, दावीदाला माझ्या सामर्थ्याचा साक्षीदार केले.
दावीद अनेक देशांचा राजा आणि सेनापती होईल असे मी त्याला वचन दिले.”
5 आता, काही राष्ट्रे कोठे आहेत हे तुम्हाला माहीत नाही.
पण त्यांची आणि तुमची भेट होईल.
त्या राष्ट्रांना, तुम्ही माहीत नाही.
पण ती राष्ट्रे तुमच्याकडे धाव घेतील.
परमेश्वराची, तुमच्या देवाची इच्छा असल्यामुळे हे असे घडून येईल.
इस्राएलचा पवित्र देव तुमचा आदर करीत असल्याने हे असे होईल.
6 म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा.
तो जवळ असतानाच त्याला बोलवा.
7 दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे.
त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे.
त्यांनी परमेश्वराला शरण यावे.
मग परमेश्वर त्यांचे दुख: हलके करील.
आमचा देव क्षमाशील आहे म्हणून
त्यांनी परमेश्वराला शरण जावे.
लोक देवाला समजू शकत नाहीतः
8 परमेश्वर म्हणतो, “तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत.
तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत.
9 स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे.
त्याचप्रमाणे माझे मार्ग
आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत.”
परमेश्वर स्वतः असे म्हणाला.
दावीदाचे एक स्तोत्र तो यहुदाच्या रानात होता त्या वेळचे
63 देवा, तू माझा देव आहेस
आणि तू मला खूप हवा आहेस.
माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क,
बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले.
मी तुझी शक्ती आणि तुझे गौरव पाहिले.
3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे.
माझे ओठ तुझी स्तुती करतात.
4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन
तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन,
आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल,
मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
7 तू मला खरोखरच मदत केली आहेस.
तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो
आणि तू माझा हात धरतोस.
यहूदी लोकांसारखे होऊ नका
10 बंधूनो, तुम्हांला हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले. 2 मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वांचा मेघात व समुद्रात बाप्तिस्मा झाला. 3-4 त्यांनी एकच आध्यात्मिक अन्र खाल्ले. व ते एकच आध्यात्मिक पेय प्याले. कारण ते त्यांच्यामागून चालणाऱ्या खडकातून पीत होते. आणि तो खडक ख्रिस्त होता. 5 परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता, आणि त्यांना अरण्यात ठार मारण्यात आले.
6 आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये. 7 त्यांच्यापैकी काही जण होते तसे मूर्तिपूजक होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते नाचणे, मौजमजा करण्यासाठी उठले.” 8 ज्याप्रमाणे त्यांच्यातील काही जणांनी केले तसे जारकर्म आपण करु नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. 9 आणि त्यांच्यातील काही जणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, सापांकडून ते मारले गेले. 10 कुरकूर करु नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाल की, मृत्युदूताकडून ते मारले गेले.
11 या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या. व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात 12 म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे. 13 जे मनुष्याला सामान्य नाही अशा कोणत्याही मोहाने तुम्हाला पकडले नाही. परंतु देव विश्वासनीय आहे. तुम्हांला सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या मोहाबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हांला सहन करणे शक्य होईल.
तुमची अंतःकरणे बदला
13 त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते. त्यांनी येशूला गालीलातील त्या लोकांविषयी सांगितले, ज्यांचे रक्त पिलाताने [a] आधीच असलेल्या यज्ञपशूंच्या रक्तात मिसळले होते. 2 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला वाटते का की, ह्या गालीलकरांनी जे भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते? 3 नाही, मी तुम्हांस सांगतो, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल. 4 किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते? 5 नाही, मी तुम्हांला सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल.”
निरुपयोगी झाड
6 नंतर त्याने ही बोधकथा सांगितली, “एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते, त्यावर फळ असेल म्हणून तो पाहावयास आला परंतु त्याला काहीही आढळले नाही. 7 म्हणून तो माळयाला म्हणाला, ‘पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काहीही आढळले नाही. तेव्हा ते तोडून टाक. त्याचा उगीच भुईला भार कशाला?’ 8 माळयाने उत्तर दिले, ‘मालक, या एका वर्षासाठी ते राहू द्या. मग मी त्याच्याभोवती खणून त्याला खत घालीन. 9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.’”
2006 by World Bible Translation Center