Revised Common Lectionary (Semicontinuous)
देवाचा अब्रामाशी करार
15 या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”
2 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वर देवा, असे काहीही प्रतिफळ नाही की जेणे कडून मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही; म्हणून माझ्या मरणानंतर माझे सर्वकाही दिमिष्कातील माझा गुलाम, अलिएजर यालाच मिळेल.” 3 अब्राम पुढे म्हणाला, “तू मला मुलगा दिला नाहीस म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
4 परमेश्वर अब्रामाशी बोलला, तो म्हणाला, “तुझे सर्वकाही त्या तुझ्या गुलामाला मिळणार नाही; तर तुला मुलगा होईल [a] आणि तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
5 मग देवाने अब्रामाला रात्रीचे आकाश दाखविण्यासाठी बाहेर नेले. देव म्हणाला, “ह्या आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, तुला मोजता येणार नाहीत इतके ते आहेत; येथून पुढच्या काळात तुझी संततीही त्या ताऱ्यांइतकी अगणित होईल.”
6 अब्रामाने देवावर विश्वास ठेवला देवाने त्याची प्रामाणिकांता गणना केली प्रमाणिक जीवन जगण्यास योग्य असा त्याचा विश्वास होता. 7 देव अब्रामाला म्हणाला, “हा देश तुला वतन करुन देण्याकरिता खास्द्यांच्या ऊर नगरातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”
8 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वरा, माझ्या स्वामी, हा देश कायमचा वतन करुन मला मिळेल, याची खात्री मला कशी यावी?”
9 देव अब्रामाला म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.”
10 अब्रामाने तीं सर्व देवाकडे आणली अब्रामाने त्यांना चिरुन त्या प्रत्येकाचे दोन दोन अर्धे तुकडे केले; व ते समोरा समोर ठेवले; पक्षी मात्र त्याने दोन अर्धे चिरले नाहीत; 11 मग कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता हिंस्र पक्ष्यांनी उडून त्यावर झडप घातली; परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.
12 नंतर त्या दिवशी सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली म्हणून तो झोपला; तो झोपेत असताना अती भयंकर अंधार त्याच्यावर पडला;
17 सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या धडांच्या दोन दोन अर्ध्या तुकड्यांमधून धुराचा लोट आणि अग्नी निघून गेला.
18 म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले व त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो;
दावीदाचे स्तोत्र.
27 परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस.
मला कुणाचीही भीती बाळगायला नको.
परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे.
म्हणून मी कुणालाही भीत नाही.
2 माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील
ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील.
माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन
माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील.
3 परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही.
युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही.
का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.
4 मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे.
मला हे मागायचे आहे,
“मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे
मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन
आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन.”
5 मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील.
तो मला त्याच्या तंबूत लपवेल
तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
6 माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे.
परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन.
मी बळी देताना आनंदाने ओरडेन.
मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन, वाद्ये वाजवीन.
7 परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे.
माझ्याशी दयेने वाग.
8 परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे.
मला अगदी माझ्या ह्रदयातून तुझ्याशी बोलायचे आहे.
परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.
9 परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस.
तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस.
मला मदत कर! मला दूर लोटू नकोस.
मला सोडू नकोस, देवा तूच माझा तारणारा आहेस.
10 माझे आईवडील मला सोडून गेले.
परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले.
11 परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव.
मला योग्य गोष्टी करायला शिकव.
12 मला माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनाटे सांगितले.
मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले.
13 मला खरोखरच असा विश्वास वाटतो की
मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल.
14 परमेश्वराच्या मदतीची वाट बघ.
सामर्थ्यवान आणि धीट हो
व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.
17 बंधूनो, माझे अनुकरण करण्यासाठी इतरांबरोबर सहभागी व्हा. आणि आम्ही जसे तुमच्यासमोर उदाहरणादाखल आहोत, त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. 18 कारण यापूर्वी मी तुम्हांला जसे अनेक वेळा सांगितले व आताही पुन्हा रडत सांगतो, पुष्कळ जण असे आहेत की, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्यासारखे वागतात. 19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आहे आणि त्यांच्या निर्लज्जपणामध्ये त्यांचे गौरव आहे ते फक्त ऐहिक गोष्टीविषयींचा विचार करतात. 20 आमचा स्वदेश स्वर्गात आहे, तेथून येणारा तारणारा प्रभु येशू ख्रिस्त याची आम्ही वाट पाहता आहोत. 21 त्याच्या ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्याने तो आपले शरीर बदलून टाकील, आणि त्याच्या वैभवी शरीरासारखे करील.
काही गोष्टी करणे
4 म्हणून माझ्या प्रिय आणि भेटीस आतुर झालेल्या बंधूंनो, माझा आनंद आणि मुकुट असलेल्यांनो मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे प्रभूमध्ये स्थिर राहा.
येशू यरुशलेमामध्ये मरण पावेल(A)
31 त्यावेळी काही परुशी येशूकडे आले. आणि ते त्याला म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हांला ठार मारणार आहे.”
32 येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भुते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’ 33 तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टयांनी यरुशलेमाबाहेर मरणे ह्याचा विचार करणे चूक आहे.
34 “यरुशलेमे, यरुशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कितीतरी वेळा कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे तुम्हा लोकांना एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. 35 पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो [a] असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.’”
मोशे, एलीया आणि ख्रिस्त(A)
28 मग असे झाले की, तो असे बोलल्यावर साधारणपणे आठ दिवसांनंतर, आपल्याबरोबर पेत्र, योहान व याकोब यांना घेऊन डोंगरावर प्रार्थना करण्यास गेला. 29 मग असे घडले की, तो प्रार्थना करीत असताना त्याच्या चेहऱ्याचे रुप पालटले व त्याचे कपडे डोळे दिपविण्याएवढे पांढरेशुभ्र झाले. 30 आणि तेथे दोघे जण त्याच्याबरोबर बोलत होते. ते एलीया व मोशे होते. ते गौरवामध्ये प्रगट झाले होते, 31 आणि ते येशूच्या मरणाविषयी, जे तो यरुशलेमामध्ये पूर्ण करणार होता, त्याविषयी बोलत होते. 32 पण पेत्र व त्याच्याबरोबर असलेले सर्व झोपी गेले होते, जेव्हा ते जागे झाले, त्यांनी येशूचे गौरव पाहिले, आणि दोन मनुष्यांना त्याच्याबरोबर उभे असलेले पाहिले. 33 मग असे झाले की, ते दोघे जण येशूपासून विभक्त होत असताना, पेत्र येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही येथे आहोत ते चांगले झाले. आपण तीन मंडप तयार करु या, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” (तो काय बोलत होता हे त्याचे त्याला कळत नव्हते.)
34 पण तो या गोष्टी सांगत असता एक मेघ खाली आला आणि त्याने छायेने झाकून टाकले. त्यांनी मेघामध्ये प्रवेश केल्यानंतर ते घाबरले. 35 आणि त्यानां वेढलेल्या ढगातून एक वाणी ऐकू आली; ती म्हणाली, “हा माझा पुत्र आहे; तो माझा निवडलेला आहे, त्याचे ऐका.”
36 जेव्हा वाणी झाली तेव्हा येशू एकटाच तेथे होता. आणि याविषयी ते गप्प राहिले. त्यांनी त्यावेळी जे काही पाहिले होते त्याविषयी कोणालाही काही सांगितले नाही.
येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो(A)
37 नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की, जेव्हा ते डोंगरावरुन खाली आले तेव्हा मोठा जमाव येशूला भेटण्यासाठी आला. 38 आणि त्याचवेळी जमावातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी तुम्हांला विनंति करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे. 39 एकाएकी त्याला अशुद्ध आत्मा धरतो व तो अचानक किंचाळतो, आणि तो त्याला झटके देईपर्यंत पिळतो, त्यामुळे त्याच्या तोंडाला फेस येतो, तो त्याला सोडीत नाही व त्याला गलितगात्र करतो. 40 मी तुमच्या शिष्यांना तो अशुद्ध आत्मा काढण्याची विनंति केली, पण त्यांना ते शक्य झाले नाही.”
41 येशू म्हणाला अहो, “अविश्वासू व चुकलेल्या लोकांनो! मी तुमच्याबरोबर किती काळ राहू व किती काळ तुमचे सोसू? त्या मुलाला इकडे आणा.”
42 परंतु तो येत असतानाच भुताने त्याला पाडले आणि पिळवटले. येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावले. त्याने मुलाला बरे केले आणि त्याला त्याच्या वडिलांजवळ परत दिले. 43 देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले.
येशू त्याच्या मरणाविषयी सांगतो(B)
पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला.
2006 by World Bible Translation Center