Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 17

दावीदाची प्रार्थना.

17 परमेश्वरा, न्यायासाठी,
    प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
    माझी खरी प्रार्थना ऐक.
तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील.
    तू सत्य बघू शकतोस.
तू माझ्या ह्रदयात खोलवर पाहिलेस.
    तू रात्रभर माझ्या बरोबर होतास
तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही.
    मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.
एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक
    मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.
मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो.
    माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.
देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा
    तू मला ओ दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.
देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस.
    ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.
तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर.
    मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.
परमेश्वरा, जे वाईट लोक माझा निपात करायला निघाले आहेत
त्यांच्यापासून मला वाचव माझ्याभोवतीचे जे लोक मला दुख द्यायला निघाले आहेत, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
10 ते वाईट लोक देवाचे न ऐकण्याइतके गर्विष्ठ झाले आहेत
    आणि ते स्वतःच्याच बढाया मारत आहेत.
11 त्या लोकांनी माझा पाठलाग केला आता
    ते माझ्या अवती भोवती आहेत
आणि माझ्यावर हल्ला करायच्या तयारीत आहेत.
12 ते दुष्ट लोक दुसरा प्राणी मारुन खाण्यासाठी लपून बसलेल्या सिंहासारखे आहेत.
    ते सिंहासारखे हल्ला करण्यासाठी लपून बसतात.

13 परमेश्वरा, ऊठ आणि शत्रूकडे जा.
    त्यांना शरण यायला लाव.
तुझ्या तलवारीचा उपयोग कर.
    आणि मला दुष्टापासून वाचव.
14 परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन,
    या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर.
परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात.
    त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते.
त्या लोकांना खूप अन्न दे.
    त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे.
    त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.

15 मी न्यायासाठी प्रार्थना केली, म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन
    आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.

जखऱ्या 3

मुख्याजक

मग देवदूताने मला मुख्यायाजक यहोशवा दाखविला. योशीया परमेश्वराच्या दूताच्या पुढे होता. सैतान योशीयच्या उजव्या बाजूस उभा होता. सैतान योशीयावर वाईट कृत्ये करीत असल्याचा आरोप करण्यासाठी आला होता. मग परमेश्वराचा दूत म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला दोष देतो, आणि तो तुला दोष देतच राहील. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरुशलेमची निवड केली आहे. आगीतून पेटलेल्या काटकीला ओढून काढावे, तसे देवाने यरुशलेमला वाचविले.”

यहोशवा देवदूतापुढे उभा होता. त्याने मळकी वस्त्रे घातली होती. मग जवळ उभ्या असलेल्या इतर देवदूतांना हा देवदूत म्हणाला, “यहोशवाची मळकी वस्त्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत योशीयाशी बोलला. तो म्हणाला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि वस्त्रबदल म्हणून तुला नवीन वस्त्रे देत आहे.”

मग मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला स्वच्छ फेटा बांधा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला. परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्याला स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली. मग परमेश्वराच्या दूताने यहोशवाला पुढील गोष्टी सांगितल्या:

सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला,
“मी सांगतो त्या प्रमाणे जीवन जग.
    मी सांगितलेल्या गोष्टी कर.
मग माझ्या मंदिराचा तूच मुख्य अधिकारी होशील.
    मंदिराच्या पटांगणाची तू निगा राखशील.
येथे उभ्या असलेल्या देवदूतांप्रमाणे तुलाही माझ्या
    मंदिरात कोठेही वावरायला मोकळीक असेल.
तेव्हा यहोशवा मुख्ययाजका,
    तू स्वतः व तुझ्या समोर बसलेल्या सहकारी याजकांनी ऐकले पाहिजे.
माझा खास सेवक मी आणल्यावर काय घडणार आहे, ह्याची ही माणसे म्हणजे नमुने आहेत.
    त्याला कोंब म्हणतील.
पाहा! मी यहोशवापुढे विशेष दगड ठेवतो.
    त्याला सात बाजू [a] आहेत.
मी त्यावर खास संदेश कोरीन.
    तो संदेश, मी एका दिवसात पृथ्वीवरील [b] सर्व पाप नाहीसे करीत असल्याचे दाखवील.”

10 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
“त्या वेळी, लोक आपल्या
    मित्रांबरोबर व शेजाऱ्यांबरोबर बसून गप्पा मारतील.
ते एकमेकांना अंजिराच्या झाडाखाली
    व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवतील.”

2 पेत्र 2:4-21

कारण देवाने, ज्या देवदूतांनी पाप केले त्यांनादेखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडद अंधारात टाकले.

देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही; तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीने राहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावर पाण्याचा महापूर आणाला.

देवाने सदोम व गमोरा या शहरांना जाळून बेचिराख करण्याची शिक्षा दिली व भविष्यकाळात अनैतिक लोकांचे काय होईल हे या उदाहरणाने दाखवून दिले. आपल्या अनीतिच्या वागण्याने ज्या बेबंद लोकांनी लोटासारख्या चांगल्या माणसाला कष्टविले, त्याची देवाने सुटका केली. दिवसेंदिवस त्या लोकांमध्ये राहत असताना, त्या नियमविरहीत लोकांमुळे जे तो पाहत व ऐकत होता त्यामुळे त्या चांगल्या मनुष्याला आपले धार्मिक ह्रदय, फाटून जाते की काय असे त्याला वाटत होते.

अशा प्रकारे, प्रभुला, धार्मिक लोकांची त्यांच्या दु:खापासून सुटका कशी करायची हे माहीत आहे आणि त्याला माहीत आहे की न्यायाच्या दिवसापर्यंत दुष्ट लोकांना शिक्षेसाठी कसे ठेवायचे. 10 विशेषतः

जे पापमय वासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोक गौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत. 11 याउलट देवदूत जे या लोकांपेक्षा सामर्थ्याने व बळाने महान आहेत, ते देवासमोर या लोकांविरुद्ध अपमानास्पद गैर काही बोलत नाहीत. 12 परंतु हे लोक ज्यांना पकडून मारुन टाकावे अशा देहस्वभावानुसार चालणाऱ्या बुद्धीहीन पशूंसारखे आहेत. ज्या गोष्टींबद्दल ते अज्ञानी आहेत, त्याविरुद्ध हे लोक बोलतात. ज्याप्रमाणे प्राण्यांचा नाश केला जातो, त्याचप्रमाणे (खोट्या शिक्षकांचाही) नाश केला जाईल. 13 आणि त्यांनी इतरांना दुखावल्याचे आणि अन्यायाचे फळ म्हणून त्यांनाही दुखाविण्यात येईल.

भर दिवसा वाईट गोष्ट करण्यात आनंद आहे असे ते लोक मानतात. ते डाग आणि कलंक असे आहेत. ते तुमच्याबरोबर मेजवानीत सामील होताना आपल्या कपटाच्या आनंदात बेभान होतात. 14 त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडे कामूकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापात ओढतात त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत.

15 सरळ वाट सोडून ते भलतीकडे भरकटत गेले आहेत. बौराचा पुत्र बलाम याच्यासारखी वाट त्यांनी धरली आहे. बलामाला अयोग गोष्टी करण्याकरिता लाच घेणे आवडत असे. 16 परंतु त्याच्या दोषामुळे त्याची कानउघडणी करण्यात आली. कधीही बोलू न शकणाऱ्या गाढवाने माणसासारखे बोलून संदेष्ट्याच्या वेडगळपणास आवर घातला.

17 हे खोटे शिक्षक पाणी नसलेले कोरडे झरे व वादळाने पांगविलेले ढग आहेत. खोल अंधारात त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली आहे. 18 ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या संगतीपासून सुटकेचा प्रयत्न करु लागले आहेत, अशांची फसवणूक करुन देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात. 19 हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांना मोकळीक देण्याचे वचन देतात परंतु ते स्वतःच नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडा बसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो.

20 म्हणून आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त यांची ज्या लोकांना ओळख होते, त्यांची जगाच्या दूषित वातावरणापासून सुटका होते. परंतु नंतर पुन्हा एकदा जगाचे अशुद्ध वातावरण या लोकांवर आपला पगडा बसविते. मग त्यांची शेवटची स्थिती अगोदरच्या स्थितीहून जास्तच वाईट होते. 21 त्यांना जर चांगला मार्ग माहीत झाला नसता तर चांगले झाले असते कारण चांगला मार्ग माहीत होणे आणि त्या लोकांना दिलेल्या पवित्र शिक्षणापासून त्यांनी वळणे, यापेक्षा (अगोदरची स्थिती चांगली होती.)

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center