Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 17

दावीदाची प्रार्थना.

17 परमेश्वरा, न्यायासाठी,
    प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
    माझी खरी प्रार्थना ऐक.
तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील.
    तू सत्य बघू शकतोस.
तू माझ्या ह्रदयात खोलवर पाहिलेस.
    तू रात्रभर माझ्या बरोबर होतास
तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही.
    मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.
एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक
    मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.
मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो.
    माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.
देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा
    तू मला ओ दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.
देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस.
    ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.
तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर.
    मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.
परमेश्वरा, जे वाईट लोक माझा निपात करायला निघाले आहेत
त्यांच्यापासून मला वाचव माझ्याभोवतीचे जे लोक मला दुख द्यायला निघाले आहेत, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
10 ते वाईट लोक देवाचे न ऐकण्याइतके गर्विष्ठ झाले आहेत
    आणि ते स्वतःच्याच बढाया मारत आहेत.
11 त्या लोकांनी माझा पाठलाग केला आता
    ते माझ्या अवती भोवती आहेत
आणि माझ्यावर हल्ला करायच्या तयारीत आहेत.
12 ते दुष्ट लोक दुसरा प्राणी मारुन खाण्यासाठी लपून बसलेल्या सिंहासारखे आहेत.
    ते सिंहासारखे हल्ला करण्यासाठी लपून बसतात.

13 परमेश्वरा, ऊठ आणि शत्रूकडे जा.
    त्यांना शरण यायला लाव.
तुझ्या तलवारीचा उपयोग कर.
    आणि मला दुष्टापासून वाचव.
14 परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन,
    या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर.
परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात.
    त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते.
त्या लोकांना खूप अन्न दे.
    त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे.
    त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.

15 मी न्यायासाठी प्रार्थना केली, म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन
    आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.

1 इतिहास 21:1-17

इस्राएलच्या जनगणनेचे पातक

21 सैतान इस्राएल लोकांच्या विरुध्द होता. त्याने दावीदाला इस्राएल लोकांची जनगणना करण्यास प्रवृत्त केले. दावीद यवाबला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, “इस्राएलमधील सर्व लोकांच्या मोजणीला लागा. बैरशेब्यापासून दानपर्यंत सर्व प्रदेश पालथा घाला. कोणीही वगळले जाता कामा नये. मग मला एकंदर संख्या किती आहे ते येऊन सांगा.”

यावर यवाब म्हणाला, “परमेश्वर आपले राष्ट्र आहे त्यापेक्षा शंभर पटीने वाढवो. इस्राएलमधील सर्व लोक आपले दास आहेत, तेव्हा माझे स्वामीराज, आपण ही गोष्ट कशासाठी करता? त्याने इस्राएलचे लोक दोषी आणि पातकी ठरतील.”

पण राजा दावीद काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. तेव्हा यवाबला राजाज्ञेप्रमाणे वागणे भाग पडले. यवाब निघाला आणि लोकांची मोजणी करत त्याने सर्व प्रदेश तुडवायला सुरुवात केली. मग यरुशलेमला परत येऊन दावीदाला त्याने एकंदर लोकसंख्या सांगितली. इस्राएलमध्ये 11,00,000 तलवार धारी पुरुष होते आणि यहूदात 4,70,000. यवाबाने लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती कारण राजा दावीदाचा हुकूम त्याला मान्य नव्हता. देवाच्या दृष्टीने दावीदाची ही चूक होती म्हणून देवाने इस्राएलला शासन केले.

इस्राएलला शासन

मग दावीद देवाला म्हणाला, “माझ्या हातून हा मूर्खपणा झाला आहे. इस्राएलमधील लोकांची मोजणी करुन मी पाप केले आहे. या अपराधाबद्दल या तुझ्या सेवकाला तू या पापाची क्षमा करावीस अशी मी विनवणी करतो.”

9-10 गाद हा दावीदाचा संदेष्टा होता. त्याला परमेश्वर म्हणाला, “जा, जाऊन दावीदाला सांग: ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे: तीन गोष्टीमधून निवड करायची संधी मी तुला देतो. तू त्यांतील एक निवड. तू निवडशील ती शिक्षा मी तुला करीन.’”

11-12 मग गाद दावीदाकडे गेला. दावीदाला तो म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘दावीद तुझ्या शिक्षेची निवड तूच कर: अन्नधान्याच्या टंचाईची तीन वर्षे, किंवा शत्रू तलवारीने तुझा पाठलाग करत आहे आणि तुला पळता भुई थोडी झाली आहे असे तीन महिने किंवा परमेश्वराच्या शिक्षेचे तीन दिवस. या काळात देशभर भयंकर रोगराई पसरेल आणि परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांचा संहार करील.’ दावीद मला देवाने पाठवले आहे. आता मी त्याला काय उत्तर देऊ ते तू ठरव आणि मला सांग.”

13 दावीद गादला म्हणाला, “मी भलत्याच संकटात सापडलो आहे. माझ्या शिक्षेच्या बाबतीत माणूस काय ठरवणार? परमेश्वर दयाघन आहे. मला शासन कसे करायचे ते त्यालाच ठरवू दे.”

14 तेव्हा परमेश्वराने इस्राएलभर रोगराई पसरवली. त्यात 70,000 लोक मृत्युमुखी पडले. 15 यरुशलेमचा नाश करायला देवाने दूत पाठवला. पण त्याने यरुशलेमच्या संहाराला सुरुवात केली तेव्हा परमेश्वराला ते अरिष्ट पाहून वाईट वाटले. परमेश्वराने हा संहार थांबवायचे ठरवले. परमेश्वर त्या संहारक दूताला म्हणाला, “थांब, पुरे झाले” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ होता.

16 दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखवट्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते. 17 दावीद देवाला म्हणाला, “पाप माझ्या हातून घडले आहे लोकांच्या मोजणीचा हूकूम मी दिला. माझे चुकले. इस्राएल लोक निरपराध आहेत. परमेश्वरा, देवा शासन करायचे ते मला आणि माझ्या कुटुंबियांना कर. पण तुझ्या लोकांचा जीव घेणारी ही रोगाची साथ थांबव.”

1 योहान 2:1-6

येशू आमचा साहाय्यकर्ता

माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करु नये यासाठी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे, पण जर एखादा पाप करतो तर पित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे. तो अर्पण आहे जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो.

जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर हाच मार्ग आहे ज्याविषयी आम्हाला खात्री आहे की, आम्ही देवाला खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो असे म्हणतो की, “मी देवाला ओळखतो!” आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे; आणि त्याच्यामध्ये सत्य नाही. पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो, तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे. हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की, आम्ही देवामध्ये आहोत. मी देवामध्ये राहतो असे जो म्हणतो, त्याने जसा येशू जगला तसे जगले पाहिजे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center