Revised Common Lectionary (Semicontinuous)
परमेश्वराचा येणारा दिवस
2 सियोन वरुन रणशिंग फुंका!
माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या.
ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा
भीतीने थरकाप उडू द्या.
परमेश्वराचा खास दिवस येत आहे.
परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे.
2 तो काळोखा, विषण्ण दिवस असेल.
तो अंधकारमय व ढगाळ दिवस असेल.
सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल.
ते सैन्य प्रचंड न शक्तिशाली असेल.
यापूर्वाे कधी झाले नाही
आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही.
लोकांमध्ये परिवर्तन करण्यास परमेश्वर सांगतो
12 परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे:
“मनापासून माझ्याकडे परत या.
तुम्ही दुष्कृत्ये केलीत.
रडा, शोक करा आणि उपवास करा.
13 तुमचे कपडे फाडू नका,
तर ह्रदये फाडा” [a]
परमेश्वराकडे, तुमच्या परमेश्वराकडे परत या.
तो कृपाळू व दयाळू आहे.
तो शीघ्रकोपी नाही.
तो खूप प्रेमळ आहे.
त्याने योजलेली कडक शिक्षा
कदाचित् तो बदलेलही.
14 कदाचित परमेश्वराचे मनः परिवर्तन होईलही, कोणी सांगावे!
आणि कदीचित तो त्याच्या मागे तुमच्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल.
मग तुम्ही परमेश्वराला.
तुमच्या परमेश्वराला, अन्नार्पणे व पेयार्पणे देऊ शकाल.
परमेश्वराची प्रार्थना करा
15 सियोन वरून रणशिंग फुंका.
खास सभा बोलवा.
उपवासाची विशिष्ट वेळ ठरवा.
16 लोकाना एकत्र जमवा,
खास सभा बोलवा,
वृध्दांना एकत्र आणा
मुलांना एकत्र जमवा, तान्ह्या मुलांना एकाठिकाणी जमवा.
शय्यागृहातून नवरा नवरीलाही येऊ द्या.
17 याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना
द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या.
ह्या सर्व लोकांनी म्हणावे, “परमेश्वरा, तुझ्या माणसांवर दया कर.
तुझ्या माणसांची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस.
तुझी माणसे दुसऱ्या लोकांनी आम्हाला हसू नये वक्ष
‘कोठे आहे तुमचा परमेश्वर?’ असे विचारू नये.”
देवाला अनुसरण्यास लोकांना सांगितले पाहिजे
58 तुम्हाला शक्य असेल तेवढ्या जोरात ओरडा.
थांबू नका.
रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे मोठ्याने ओरडा.
लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांगा.
याकोबाच्या वंशजांपुढे त्यांच्या पापांचा पाढा वाचा.
2 म्हणजे माझी उपासना करायला ते रोज येतील.
माझे मार्ग जाणून घ्यायची लोकांना इच्छा होईल.
योग्यरीतीने जगणारे ते राष्ट्र होईल.
देवाच्या चांगल्या आज्ञांचे पालन करण्याचे ते सोडणार नाहीत.
त्यांना योग्य न्याय देण्यास ते मला सांगतील.
न्याय निर्णयासाठी त्यांना देवाकडे जावेसे वाटेल.
3 आता ते लोक म्हणतात, “तुझ्याबद्दल आदर दाखविण्यासाठी आम्ही उपास करतो. तू आमच्याकडे का पाहत नाहीस? तुझा न राखण्यासाठी आम्ही आमच्या शरीरांना क्लेश करून घेतो. तू आमची दखल का घेत नाहीस?”
पण परमेश्वर म्हणतो, “विशेष दिवशी उपास करून तुम्ही तुम्हालाच पाहिजे ते करता. [a] तुम्ही तुमच्या शरीराला क्लेश देत नाही तर तुमच्या नोकरांना शिक्षा करता. 4 तुम्ही भुकेले आहात. पण ती भूक अन्नाची नाही, भाकरीची नाही तर भांडणाची आणि लढाईची आहे. तुमच्या पापी हातांनी लोकांना मारण्यासाठी तुम्ही भुकेले आहात. तुम्ही माझ्याकरिता उपास करीत नाही. माझी स्तुती करण्याची तुमची इच्छा नाही. 5 त्या विशेष दिवसांत उपास करून आपल्या शरीरांना लोकांनी क्लेश दिलेले पाहण्याची माझी इच्छा आहे असे तुम्हाला वाटते का? मला लोकांना दु:खी असलेले पाहावेसे वाटते असे तुम्हाला वाटते का? लोकांनी वाळलेल्या झाडांप्रमाणे माना झुकवाव्या व शोकप्रदर्शक कपडे घालावे अशी माझी इच्छा आहे; असे तुम्हाला वाटते का? लोकांनी राखेत बसून त्यांचे दु:ख मला दाखवावे अशी माझी इच्छा आहे, असे तुम्हाला वाटते का? विशेष दिवसांत उपास करून तुम्ही हे सर्व करता, परमेश्वराला हेच पाहिजे असे तुम्हाला वाटते का?
6 “मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन. तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा, त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी, अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे, त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी. 7 भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना शोधून तुमच्या घरात त्यांना आसरा द्यावा, उघड्या माणसाला तुम्ही तुमचे कपडे द्यावे अशी माझी इच्छा आहे. अशा लोकांना मदत करताना मागे-पुढे पाहू नका. ती तुमच्यासारखीच माणसे आहेत.”
8 तुम्ही ह्या केल्यात तर पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य उजळेल. तुमच्या जखमा भरून येतील. तुमचा “चांगुलपणा” (देव) तुमच्या पुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुमच्या पाठीमागून येईल. 9 नंतर तुम्ही परमेश्वराला हाक मारल्यास परमेश्वर तुमच्या हाकेला ओ देईल. तुम्ही त्याचा धावा केल्यास तो म्हणेल, “हा मी येथे आहे.”
लोकांना त्रास देण्याचे व त्यांच्या दु:खाचे ओझे वाढविण्याचे तुम्ही थांबवावे. तुम्ही लोकांना कटू शब्द वापरू नयेत आणि प्रत्येक गोष्टीबद्दल दोष देऊ नये. 10 भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी. त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दु:ख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल.
11 परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल.
12 पुष्कळ वर्षे तुमच्या शहरांचा नाश झाला. पण नवीन शहरे वसविली जातील आणि त्या शहरांचा पाया अनेक वर्षे टिकून राहील. तुम्हाला “कुंपण पक्के करणारा आणि रस्ते व घरे बांधणारा” असे नांव मिळेल.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र दावीदाने बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर भविष्यवेता नाथान त्याच्याकडे आला तेव्हाचे स्तोत्र
51 देवा, माझ्यावर दया कर,
तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने
आणि तुझ्या महान कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देवा माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक.
माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे.
ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत
असे सांगतोस त्याच मी केल्या.
देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले.
मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास.
तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या
आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल
तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर.
मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग.
तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस,
ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्रदय निर्माण कर.
माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि
तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो,
मला पुन्हा तुझा आनंद दे,
माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
13 पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन.
आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस.
14 देवा, तूच माझा त्राता आहेस.
तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे.
15 प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन.
16 तुला बळी नको आहेत.
तुला नको असणारे बळी मी देणार नाही.
17 देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय.
देवा,तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्रदयाकडे पाठ फिरवणार नाहीस.
20 म्हणून आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काय देव आमच्या द्वारे त्याचे आवाहन करीत होता. ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हांला विनंति करतो. देवाशी समेट करा. 21 ज्याच्याठायी पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले. यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे.
6 देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हांला विनंति करतो की, जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका. 2 कारण तो म्हणतो,
“माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले
आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली.” (A)
मी तुम्हांला सांगतो, देवाच्या “सोयीची वेळ” आताच आहे. आताच “तारणाचा दिवस” आहे.
3 आमची सेवा दोषी ठरु नये यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही. 4 उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले. मग आम्हांला त्रास सोसावा लागो, नाहीतर अडचणी येवोत, छळ होवो नाहीतर वेदना होवोत. छळात, आणि दु:खात 5 फटके खाण्यात, तुंरुगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत, भुकेले असताना, 6 शुद्धतेत, समजूतदारपणात, सहनशीलतेत, आणि दयाळूपणात, पवित्र आत्म्याच्या आणि निर्व्याज प्रीतीमुळे, 7 सत्य बोलण्यात, आणि देवाच्या सामर्थ्यात, आक्रमक आणि संरक्षक पद्धतीने नीतिमत्वाच्या शस्त्रांसह, 8 गौरव व अपमानाद्वारे, आमच्याबद्दलच्या वाईट व चांगल्या बातमीने शहाणपणाने, तरीही फसविणारे ठरले गेलेलो. 9 जरी आम्ही प्रसिद्ध असलो, तरी अप्रसिद्ध असे समजले गेलेलो, मरत असलेले तरी जगत असलेलो, मारलेले तरी अजून ठार न केलेले, 10 दु:खी तरी नेहमी आनंद करीत, गरीब तरी पुष्कळांना श्रीमंत करणारे, जवळ काही नसलेले तरी सर्व काही जवळ असणारे असे आहोत.
दान देण्याविषयी येशूची शिकवण
6 “जेव्हा तुम्ही चांगली कृत्ये करता तेव्हा ती गाजावाजा न करता करा. लोकांच्या नजरेत भरावी म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.
2 “जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खरे तेच सांगतो. ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहीरपणे अशी कामे करतात, कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. 3 म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुपचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू नये. 4 दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो.
प्रार्थनेविषयी येशूची शिकवण(A)
5 “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. 6 पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल.
उपासाविषयी येशूची शिकवण
16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे. 17 तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा. 18 यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल.
पैशापेक्षा देव अधिक महत्त्वाचा आहे(A)
19 “येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. 20 म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. 21 जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
2006 by World Bible Translation Center