Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 35:11-28

11 साक्षिदारांचा समूह मला दु:ख द्यायचे कारस्थान करीत आहे.
    ते लोक मला प्रश्न विचारतील आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही.
12 मी फक्त चांगल्याच गोष्टी केल्या आहेत परंतु लोक माझ्या विरुध्द वाईट गोष्टी करतील.
    परमेश्वरा, मी ज्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे त्या मला दे.
13 जेव्हा ते लोक आजारी पडले तेव्हा मला वाईट वाटले,
    अन्न न खाऊन मी माझे दुख प्रकट केले.
    त्यांच्यासाठी प्रार्थना करुन मी हेच मिळवले का?
14 मी त्या लोकांसाठी सुतकी कपडे घातले.
    मी त्या लोकांना माझ्या मित्रांसारखे किंवा भावासारखे वागवले.
आई मेल्यावर रडणाऱ्या माणसाप्रमाणे मी दु:खी आहे.
    त्या लोकांसाठी दु:ख व्यक्त करायचे म्हणून मी काळे कपडे घातले. दुखात नतमस्तक होऊन मी वावरलो.
15 परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते.
    मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो
परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
16 त्यांनी वाईट भाषा वापरली आणि माझी चेष्टा केली.
    त्यांनी माझ्यावरचा त्यांचा राग कराकरा दातखाऊन व्यक्त केला.

17 परमेश्वरा, या वाईट गोष्टी घडत असताना तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस?
    ते लोक माझा नाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत परमेश्वरा, माझे प्राण वाचव, माझे प्रियप्राण त्या वाईट लोकांपासून वाचव. ते सिंहासारखे आहेत.

18 परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन.
    मी सामर्थ्यवान लोकांबरोबर असेन तेव्हा तुझी स्तुती करेन.
19 माझे खोटे बोलणारे शत्रू हसत राहाणार नाहीत.
    त्यांच्या गुप्त योजनांमुळे माझ्या शत्रूंना खरोखरच शिक्षा होईल. [a]
20 माझे शत्रू शांतीच्या योजना आखत नाहीत.
    या देशातील शांततापूर्ण लोकांना त्रास देण्यासाठीच माझे शत्रू गुप्तपणे योजना आखत आहेत.
21 माझे शत्रू माझ्या विषयी वाईट बोलत आहेत.
    ते खोट बोलतात आणि म्हणतात, “हा तू काय करतोस ते आम्हाला माहीत आहे.”
22 परमेश्वरा, काय घडत आहे
    ते तुला तरी दिसतं आहे ना?
    मग गप्प बसू नकोस मला सोडून जाऊ नकोस.
23 परमेश्वरा, जागा हो! ऊठ माझ्या देवा,
    माझ्या परमेश्वरा माझ्यासाठी लढ आणि मला न्याय दे.
24 परमेश्वरा, देवा तुझ्या न्यायी बुध्दीने मला न्याय दे
    त्या लोकांना मला हसू देऊ नकोस.
25 “आम्हाला हवे होते ते मिळाले,” असे त्या लोकांना म्हणू देऊ नकोस.
    परमेश्वरा, “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.
26 माझ्या सगळ्या शत्रूंना शरम वाटावी, ते गोंधळून जावेत अशी माझी इच्छा आहे.
    माझ्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ते लोक आनंदी होते
ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते.
    म्हणून ते लोक अपमानाने आणि लाजेने झाकोळून जावोत.
27 काही लोकांना माझे चांगले व्हावे असे वाटते.
    ते सर्व लोक सुखी होवोत
ते लोक नेहमी म्हणतात, “परमेश्वर महान आहे
    त्याच्या सेवकाचे भले व्हावे अशी त्याची इच्छा आहे.”

28 म्हणून परमेश्वरा तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन.
    मी रोज तुझी स्तुती करेन.

यहेज्केल 1:1-2

प्रस्तावना

मी बूजीचा मुलगा याजक यहेज्केल. मी परागंदा झालो होतो. मी खास्द्यांच्या देशात खबार कालव्याच्या काठी असताना आकाश दुभंगले व मला देवाचा दृष्टान्त झाला. 30व्या वर्षीच्या [a] चौथ्या महिन्याच्या (जूनच्या) पाचव्या दिवसाची ही घटना आहे. यहोयाखीन राजाच्या परागंदा होण्याच्या काळातील 5 व्या वर्षी, महिन्याच्या 5 व्या दिवशी, यजेज्केलला परमेश्वराचा शब्द प्राप्त झाला. तेथेच त्याला परमेश्वराची शक्ती प्राप्त झाली.

परमेश्वर देवाच्या सिंहासनाचा रथ

उत्तरेकडून एक धुळीचे वादळ येताना मी (यहेज्केलने) पाहिले. तो एक मोठा ढग होता आणि त्यातून आगीचा झोत बाहेर पडत होता. त्याच्याभोवती प्रकाशाची प्रभा फाकली होती. आगीत धगधगणाऱ्या तप्त धातू प्रमाणे तो दिसत होता. त्यामध्ये चार प्राणी होते. ते मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसत होते. पण त्या प्रत्येक प्राण्याला चार तोंडे आणि चार पंख होते. त्यांचे पाय सरळ होते. त्यांच्या पायांचे तळवे गाईच्या खुरांप्रमाणे होते. ते चकाकी दिलेल्या पितळेप्रमाणे चमकत होते. त्यांच्या पंखाखाली मानवी हात होते. ते चार प्राणी होते. त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते. त्यांचे पंख एकमेकांना स्पर्श करत होते. ते चालताना वळत नव्हते. ते ज्या दिशेकडे पाहत, त्याच दिशेला जात होते.

10 प्रत्येक प्राण्याला चार तोंडे होती. प्रत्येकाचे समोरचे तोंड माणसाचे होते. उजव्या बाजूला सिंहाचे, डाव्या बाजूला बैलाचे व मागच्या बाजूला गरुडाचे तोंड होते. ते चारहीजण दिसायला अगदी सारखे होते. 11 ते प्राणी पंखांचा उपयोग स्वतःला झाकण्यासाठी करीत. दोन पंखांनी ते जवळ असलेल्या प्राण्याला स्पर्श करीत. ते दोन पंखांनी अंग झाकीत. 12 ते पाहत होते त्याच दिशेने जात होते. वारा [b] जेथे नेईल, तेथे ते गेले. पण चालताना ते वळत तव्हते.

13-14 ते प्राणी असे दिसत होते: प्राण्यांच्या मध्थेन काहीतरी जळत्या निखाऱ्याप्रमाणे होते. लहान लहान मशाली प्राण्यांमधून आणि त्यांच्या सभोवती फिराव्या तसा तो अग्नी दिसत होता. तो प्रकाश झगझगीतपणे चमकत होता आणि त्यातून वीज चमकत होती.

15-16 मी प्राण्यांकडे पाहात होतो तेव्हा मला जमिनीला टेकलेली चार चाके दिसली. प्रत्येक प्राण्यासाठी एक चाक होते. सर्व चाके सारखीच दिसत होती. ती तेजस्वी वैदुर्यापासून केल्याप्रमाणे दिसत होती. एकात दुसरे चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती. 17 चाके चालताना कुठल्याही दिशेला वळत पण चाके चालताना प्राणी वळत नव्हते.

18 चाकांच्या धावा उंच आणि भयंकर होत्या. चारही चाकांच्या धावांवर सर्वत्र डोळे होते.

19 चाके त्या प्राण्यांबरोबरच फिरत. जर ते प्राणी आकाशात उडाले, तर त्यांच्याबरोबर चाकेही उचलली जात. 20 वारा नेईल तिकडे ते जात व त्याप्रमाणे चाकेही जात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) चाकांत होता. 21 म्हणून जर प्राणी हालले, तर चाकेही फिरत. प्राणी थांबले की चाकेही थांबत. जर चाके हवेत उडाली, तर प्राणीही वर जात. का? कारण वारा चाकांत होता.

22 त्या प्राण्यांच्या डोक्यांवर विलक्षण असे काहीतरी होते. वाडगा [c] पालथा घालावा तसे ते दिसत होते. तो वाडगा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ होता. 23 ह्या वाडग्याखाली, प्रत्येक प्राण्याला पंख होते आणि ते जवळच्या दुसऱ्या प्राण्यापर्यंत पोहोचू शकत होते. दोन पंख एका बाजूला व दोन पंख दुसऱ्या बाजूला पसरवून ते अंग झाकीत.

24 मग मी पंखांचा आवाज ऐकला. प्राण्यांनी हालचाल करताच पंखाचा प्रचंड आवाज होई. तो आवाज प्रचंड पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे होता. सर्वशक्तिमान देव चालताना व्हावा, तसा तो आवाज मोठा होता. सैन्याच्या आवाजाप्रमाणे अथवा लोकांच्या प्रचंड गर्दीच्या आवाजासारखा तो आवाज होता. प्राणी थांबताच, त्यांचे पंख त्यांच्या बाजूला खाली येत.

25 ते प्राणी थांबले व त्यांनी आपले पंख खाली केले. मग दुसरा एक खूप मोठा आवाज झाला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. 26 त्या वाडग्यावर काहीतरी होते. ते सिंहासनाप्रमाणे दिसत होते. ते इंद्रनीलाप्रमाणे गर्द निळे होते. त्यावर माणसाप्रमाणे दिसणारी आकृती बसलेली होती. 27 मी त्याचा कमरेवरचा भाग पाहिला. तो तप्त धातू प्रमाणे दिसत होता. त्याच्या भोवती आगीचा लोळ असल्याप्रमाणे दिसत होते. मी त्याच्या कमरेखालच्या भागाकडे पाहिले. तो आगीप्रमाणे दिसत होता. त्याच्या सभोवती प्रभा फाकली होती. 28 त्याच्या भोवती फाकलेले तेज इंद्रधनुष्याप्रमाणे होते. ते परमेश्वराच्या वैभवाच्या तेजाप्रमाणे दिसत होते. म्हणून मी ते पाहाताच जमिनीवर पालथे पडून, मस्तक टेकवून वंदन केले. त्या नंतर, माझ्याशी कोणीतरी बोलत असल्याचे मला ऐकू आले.

तो आवाज म्हणाला, “मानवपुत्रा उठ मी तुझ्याशी बोलणार आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 10:23-33

23 पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले.

दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला. यापो येथील काही बंधुही पेत्राबरोबर गेले. 24 दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला. कर्नेल्य त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.

25 जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्याला भेटला. कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्याला अभिवादन केले. 26 पण पेत्र म्हणाला. “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.” 27 पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले.

28 पेत्र त्या लोकांना म्हणाला, “तुम्ही हे जाणता की, यहूदी मनुष्याने इतर जातींच्या लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमाला धरुन नाही. पण देवाने मला दाखविले आहे की, मी इतर मनुष्यमात्राला ‘अशुद्ध’ किंवा ‘अपवित्र’ मानू नये. 29 याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता, कृपा करुन मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलाविले?”

30 कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला. त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले. होते. 31 तो मनुष्य म्हणाला, ‘कर्नेल्या! देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तु तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो. 32 म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे. आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.’ 33 तेव्हा मी लागलीच तुम्हांला निरोप पाठविला, तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हांला जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हांला दिली आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center