Revised Common Lectionary (Semicontinuous)
स्मरण दिवसाचे दावीदाचे स्तोत्र.
38 परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस
तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
2 परमेश्वरा, तू मला इजा केलीस
तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.
3 तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे.
मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस.
त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
4 मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे
आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.
5 मी मूर्खपणा केला आता
मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.
6 मी धनुष्यासारखा वाकलो आहे
आणि मी दिवसभर उदास असतो.
7 मला ताप आला आहे
आणि माझे सर्वशरीर दुखत आहे.
8 मी फार अशक्त झालो आहे
मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.
9 प्रभु तू माझे ओरडणे ऐकलेस माझे
उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत.
10 माझे हृदय धडधडत आहे.
माझी शक्ती निघून गेली आहे
आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे.
11 माझ्या आजारपणामुळे माझे मित्र
आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत.
माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
12 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात.
ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत.
ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
13 परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे.
मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
14 लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे.
मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.
15 म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर.
देवा, तूच माझ्यावतीने बोल.
16 मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील.
मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुका केल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.
17 मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे.
हे मला माहीत आहे मला माझे दु:ख विसरता येत नाही.
18 परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले.
मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.
19 माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत
आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे.
20 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात
आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या.
मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला
परंतु ते लोक माझ्यावर उलटले.
21 परमेश्वरा, मला सोडू नकोस.
देवा माझ्याजवळ राहा.
22 लवकर ये आणि मला मदत कर.
माझ्या देवा मला वाचव!
याकोब आपले शौर्य दाखवितो
33 याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला; त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले. लेआ व तिची मुले यांचा एक गट, राहेल व योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या दोन दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते. 2 याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीला त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वात शेवटी ठेवले.
3 याकोब स्वतः एसावा पुढे सामोरा गेला म्हणून एसावा समोर पुढे आलेला तोच पहिला होता; आपला भाऊ एसाव याला सामोरा जात असताना त्याने सात वेळा भूमिपर्यंत लवून त्याला नमन केले.
4 एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्याला भेटण्यास तो धावत गेला आणि आपल्या बाहुंचा विळखा त्याच्या भोवती टाकून त्याने गळयात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. 5 एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्या बरोबर ही कोण मंडळी आहे?”
याकोबाने उत्तर दिले, “देवाने मला दिलेली ही मुले आहेत, देवाने माझे कल्याण केले आहे.”
6 मग याकोबाच्या दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे गेल्या आणि त्यांनी एसावाला लवून नमन केले. 7 त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ, एसावापुढे गेली आणि त्यांनी त्याला लवून नमन केले.
8 एसावाने विचारले, “इकडे येताना मला दिसले ते लोक कोण? व त्यांच्या बरोबरची जनावरे कशासाठी?”
याकोबाने उत्तर दिले, “आपण माझा स्वीकार करावा म्हणून देणगी दाखल मी आपणाला दिलेली ही भेट आहे.”
9 परंतु एसाव म्हणाला, “माझ्या बंघु तू मला काही भेट द्यावयाची नाही, मला माझ्याकरिता भरपूर आहे.”
10 याकोब म्हणाला, “नाही नाही; मी आपणाला आग्रहाची विनंती करतो, आपण जर खरोखर माझा स्वीकार करिता तर मग कृपाकरुन मी आपणाला देतो त्या भेटीचा स्वीकार करा; आपले तोंड मला पुन्हा पाहावयास मिळाले म्हणून मला फार आनंद होत आहे; जणू काय मला देवाचे मुख पाहावयास मिळाले आहे. आपण माझा स्वीकार करिता म्हणूनही मला अतिशय आनंद वाटतो; 11 म्हणून मी आग्रहाची विनंती करतो की मी आपणाला भेट देतो तिचा स्वीकार करा. देवाने माझे कल्याण केले आहे. माझ्यापाशी माझ्या गरजा पुरुन उरेल एवढे आहे.” या प्रमाणे भेटी दाखल दिलेल्या देणग्या घेण्यासाठी याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली म्हणून मग एसावाने त्या देणग्यांचा स्वीकार केला.
12 मग एसाव म्हणाला, “आता तू वाटेस लाग व तुझा प्रवास पुढे चालू ठेव; मीही तुझ्याबरोबर चालतो.”
13 परंतु याकोब त्याला म्हणाला, “माझी मुले नाजुक आहेत हे आपणाला माहीत आहे; आणि माझ्या कळपातली दुभती जनावरे व त्यांची कच्ची बच्ची, करडे कोंकरे, वासरे यांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांच्यावर एकाच दिवशी अधिक दौड लादली तर सगळी जनावरे मरुन जातील; 14 तर माझे स्वामी आपण पुढे निघा; मी माझी गायीगुरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहानमुलेही थकणार नाहीत अशा चालीने चालेन व आपणास सेईर येथे येऊन भेटेन.”
15 तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या माणसातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवितो;”
परंतु याकोब म्हणाला, “ही तर माझ्या स्वामीची माझ्यावर कृपा आहे; परंतु माणसे ठेवण्याची तशी गरज नाही.” 16 तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला. 17 याकोब गांवास गेला; तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले आणि गुरांढोरांसाठी खोपट्या बांधल्या म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले.
अधिकाराखाली असणे
2 मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी जी शिकवण तुम्हाला दिली, ती तुम्ही काटेकोरपणे पाळता. 3 परंतु तुम्हाला हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे. आणि प्रत्येक पुरुष हा स्त्रीचे मस्तक आहे, आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे.
4 प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना करताना किंवा देवाकडून आलेला संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो मस्तकाला लज्जा आणतो. 5 परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते. कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे. 6 जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत. परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तिने आपले मस्तक झाकावे.
7 ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे. 8 पुरुष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे. 9 आणि मनुष्य स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली. 10 यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे त्याचे चिन्ह म्हणून तिने आपले मस्तक आच्छादावे व देवदूतांकरितासुद्धा तिने हे करावे.
11 तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरुष स्त्रीपासून स्वतंत्र नाही. 12 कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
13 हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता सभेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का? 14 पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हाला शिकवीत नाही काय? 15 परंतु स्त्रीने लांब केस राखणे हा तिचा मान आहे कारण तिला तिचे केस निसर्गतः आच्छादनासाठी दिले आहेत. 16 जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रुढी नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
2006 by World Bible Translation Center