Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 45:3-11

मग योसेफ हूंदके देत आपल्या भावांना म्हणाला, “प्रिय भावांनो! तुमचा भाऊ योसेफ-मीच आहे!” मग गहिंवर आवरुन योसेफ पुढे म्हणाला, “माझा बाप खुशाल आहे ना!” परंतु त्याचे भाऊ आश्चर्याने चकित झाले; ते एवढे घाबरले व गोंधळले की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना!

तेव्हा योसेफ आपल्या भावांना पुन्हा म्हणाला, “जरा इकडे माझ्याकडे या; कृपा करुन माझ्याजवळ या अशी मी विनंती करतो.” तेव्हा त्याचे भाऊ त्याच्या जवळ गेले; आणि योसेफ त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे; होय! ज्या भावाला तुम्ही मिसरच्या लोकांना गुलाम म्हणून विकले तो योसेफ मीच आहे. आता त्याविषयी काही चिंता व काळजी करु नका; किंवा तुम्ही जे केले त्याबद्दल आपल्याला संताप करुन घेऊ नका; मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती. हा भयंकर दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही. अशारीतीने या देशात मी अगोदर येऊन तुमच्यासर्वांचे प्राण वाचावेत म्हणून देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे. मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या बापासमान केले आहे; त्यामुळे मी फारोच्या घरदाराचा स्वामी आणि सर्व मिसर देशाचा प्रशासक झालो आहे.”

इस्राएलास मिसरला जाण्याचे निमंत्रण येते

योसेफ म्हणाला, “तर आता तोबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा; माझ्या बापाला सांगा की तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हाला येणे प्रमाणे संदेश पाठवला आहे.” देवाने मला अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे अधिपति केले आहे. तर आता वेळ न दवडता माझ्याकडे निघून या. 10 तुम्ही माझ्या जवळ गोशेन प्रांतात राहा; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे असा तुम्हां सर्वांचे मी स्वगात करतो. 11 येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुमची सर्व प्रकारची काळजी घेईन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावण्याची वेळ येणार नाही.

उत्पत्ति 45:15

15 मग योसेफाने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला; यानंतर त्याचे भाऊ त्याज बरोबर बोलू लागले.

स्तोत्रसंहिता 37:1-11

37 तू दुष्टांवर चिडू नकोस.
    वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करु नकोस.
वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या
    आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.
तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास
    तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे
    तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.
परमेश्वरावर अवलंबून राहा.
    त्याच्यावर विश्वास ठेव.
    आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.
परमेश्वर तुझा चांगुलपणा
    आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तळपू देईल.
परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा
    दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
रागावू नकोस, संताप करुन घेऊ नकोस.
तुला स्वत:ला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस.
का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे.
    परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
10 थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत.
    तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.
11 विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
    आणि ते शांती व समाधानात जगतील.

स्तोत्रसंहिता 37:39-40

39 परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो
    ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.
40 परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले
    लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.

1 करिंथकरांस 15:35-38

आपले शरीर कोणत्या प्रकारचे असेल?

35 परंतु कोणीतरी म्हणेल? “मेलेले कसे उठविले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?” 36 तू किती मूर्ख आहेस? तू जे पेरतोस ते प्रथम मेल्याशिवाय जिवंत होत नाही. 37 आणि तू लावतोस (पेरतोस) त्यासंबंधी तू जे जमिनीत पेरतोस ते वाढलेले रोपटे नसून जे वाढतच राहणार आहे, ते नव्हे तर फक्त धान्य (दाणा). तो गव्हाचा किंवा इतर कोठला तरी असेल. 38 आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्याला आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे “शरीर” देतो.

1 करिंथकरांस 15:42-50

42 म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते आविनाशी आहे. 43 जे शरीर जमिनीत पुरले आहे, ते अपमानात पुरलेले असते. ते अशक्त असते पण उठविले जाते ते सशक्त शरीर असते 44 जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठविले जाते ते आध्यात्मिक शरीर आहे.

जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात. 45 आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत प्राणी झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. 46 परंतु जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, जे जगिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते. 47 पाहिला मनुष्य मातीतून आला म्हणजे तो धुळीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. 48 ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. 49 ज्याप्रमाणे तयार केलेल्या माणसाची प्रतिमा आपण धारण केली आहे, तशी आपणसुद्धा स्वर्गीय माणसाची प्रतिमा धारण करु.

50 बंधूनो, मी तुम्हांला सांगतो, आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसेव विनाशीपण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही.

लूक 6:27-38

तुमच्या शत्रूवर प्रेम करा(A)

27 “माझे ऐकणाऱ्यांना मी सांगतो. तुमच्या शत्रूंवर प्रेम करा. जे तुमचा द्धेष करतात, त्यांचे चांगले करा. 28 जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हांला वाईट वागवितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 29 जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसरा पण गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्याला तुमचा सदराही घेऊ द्या. 30 जे तुम्हांला मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमचे घेतो ते परत मागू नका. 31 लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हांला वाटते तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.

32 “तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केले, तर तुम्ही काय विशेष केले? पापी लोकसुद्धा, जे त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. 33 तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात. 34 ज्यांच्याकडून तुम्हांला परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.

35 “पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा. व कोणतीही अपेक्षा न ठेवता उसने द्या, मग तुमचे बक्षीस मोठे असेल व तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण देव हा कृतघ्न व दुष्ट लोकांवर दया करतो. 36 जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा.

स्वतःकडे पाहा(B)

37 “दुसऱ्यांचा न्याय करु नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला दोषी ठरविले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. 38 दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हांलाही दिले जाईल. तुमच्या पदरात हलवून, दाबून, ओसंडून वाहणारे उत्तम माप ओतले जाईल. जे माप तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता त्याच मापाने तुम्हांला दिले जाईल.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center