Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरांत जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
120 मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने मला वाचवले.
2 परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव.
त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.
3 खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का?
त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
4 सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि
जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.
5 खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे,
केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे
6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ
मी खूप काळ राहिलो आहे.
7 मी म्हणालो, मला शांती हवी,
म्हणून त्यांना युध्द हवे आहे.
18 सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना येथील यिर्मया याची मुलगी. 19 सिद्कीया यहोयाखीनप्रमाणेच वर्तनाने वाईट होता. परमेश्वराच्या आज्ञेविरुध्द तो वागला. 20 तेव्हा परमेश्वराने संतापाने यरुशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली.
25 सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमवर चाल करुन गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमला वेढा देऊन लोकांची ये जा रोखली. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले. 2 सिद्कीयाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत हा वेढा चालू राहिला. 3 दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य माणसांची अन्नान्नदशा झाली.
4 नबुखदनेस्सरच्या सैन्याने शेवटी तटाला खिंडार पाडले. त्या रात्री राजा सिद्कीया आणि त्याचे सैन्य यांनी पलायन केले. त्यांनी पळून जाण्यासाठी दुहेरी तटबंदीमधल्या गुप्त वाटेचा आश्रय घेतला. ही वाट राजाच्या बागेजवळ होती नगराभोवती शत्रूसैन्याचा वेढा होता पण सिद्कीया आणि त्याचे सैन्य वाळवंटाच्या दिशेने निसटले. 5 बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्याला एकटा सोडून पळून गेले.
6 बाबेलच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले. 7 त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले.
यरुशलेमचा विध्वंस
8 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबुखदनेस्सर यरुशलेमवर चाल करुन आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता. 9 या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरुशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले.
10 मग बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली. 11 नगरात अजून असलेले लोक नबुजरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले. 12 अगदीच दरिद्री लोकांना तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले.
13 परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची बाबेलच्या सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करुन ते पितळ त्यांनी बाबेलला नेले. 14 इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली. 15 अग्निपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली. 16-17 अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू: दोन पितळी स्तंभ (प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते.) एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते.
यहूदी लोकांना कैदी बनवण्यात येते
18 नबुजरदानने मंदिरातून खालील लोकांना नेले मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल
19 आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली.
20-21 हमाथ प्रदेशातील रिब्ला येथे नबुजरदानने या सर्वांना राजासमोर हजर केले. राजाने त्या सर्वांची तेथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदींना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.
20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे. 21 कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. 22 कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. 23 पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले, 24 मग शेवट येईल प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता, व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल.
25 कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे. 26 शेवटचा शत्रू असल्यासारखा मृत्यूचा नाश केला पाहिजे. 27 कारण “देवाने सर्व काही त्याच्या अधिकारात ठेवले आहे.” आता जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की, “सर्व गोष्टी” अंकीत केल्या आहेत तेव्हा सर्व स्पष्ट आहे की, ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकीत केल्या आहेत, तो देव सोडून इतर सर्व गोष्टी त्याच्या अधिकार क्षेत्रात आहेत. 28 आणि सर्व गोष्टी जेव्हा स्वाधीन केलेल्या आहेत, तेव्हा पुत्रसुद्धा देवाच्या, ज्याने सर्व गोष्टी स्वाधीन केल्या आहेत, स्वतः स्वाधीन केला जाईल यासाठी की, देव सर्वांवर संपूर्णपणे अधिपती असावा.
29 नाहीतर, मेलेल्यांसाठी व त्यांची पुन्हा भेट होईल या आशेने ज्यांनी बाप्तिस्मा घेलला आहे ते काय करतील? जर मेलेले उठविले जात नाहीत तर त्यांच्यासाठी लोक बाप्तिस्मा का घेतात?
30 आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो? 31 बंधूजनहो, मी शपथपूर्वक सांगतो की, ख्रिस्त येशूमध्ये माझा तुमच्याविषयी अभिमान आहे, मी दररोज मरतो 32 इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मेलेले उठविले जात नाहीत तर “आपण खाऊ पिऊ, कारण आपण उद्या मरुन जाऊ!”
33 फसू नका, “वाईट सोबती चांगल्या सवयी बिघडवितात.” 34 शुद्धीवर या. जसे तुम्ही यायला पाहिजे आणि पाप करीत जाऊ नका. कारण तुम्हांपैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हांस लाजविण्यासाठी बोलतो.
2006 by World Bible Translation Center