Revised Common Lectionary (Semicontinuous)
115 परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको.
सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि
आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
2 आमचा देव कुठे आहे,
याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
3 देव स्वर्गात आहे
आणि त्याला हवे ते तो करतो.
4 त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत.
कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
5 त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही.
त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
6 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही,
त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
7 त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही.
त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही
आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
8 ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात
ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.
9 इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
10 अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव.
परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
11 परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
12 परमेश्वर आमची आठवण ठेवतो.
परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल.
परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल.
परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
13 परमेश्वर त्याच्या लहान आणि
मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.
14 परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल.
अशी मी आशा करतो.
15 परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली
आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
16 स्वर्ग परमेश्वराचा आहे.
पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
17 मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
18 पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो
आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू.
परमेश्वराची स्तुती करा.
दबोराचे गीत
5 इस्राएल लोकांनी सीसराचा पराभव केला त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामचा मुलगा बाराक यांनी हे गीत गायले:
2 “इस्राएलचे लोक युध्दाला तयार झाले [a]
ते स्वेच्छेने युध्दासाठी सज्ज झाले.
परमेश्वराचा धन्यवाद करा.
3 “राजांनो ऐका,
लक्ष द्या अधिपतींनो,
मी परमेश्वराचे,
इस्राएल लोकांच्या परमेश्वराचे
गीत स्वतः गाईन.
त्याचे स्तुति स्तोत्र म्हणीन.
4 “परमेश्वरा, पूर्वी जेव्हा तू सेईरमधून आलास,
अदोम भूमीतून तू कूच केलेस.
तेव्हा पृथ्वी थरारली.
आकाशाने वर्षाव केला
ढगातून वृष्टी झाली.
5 पर्वतांचाही थरकाप झाला परमेश्वरापुढे.
सीनाय पर्वताच्या देवापुढे.
इस्राएलांचा देव परमेश्वरापुढे.
6 “अनाथचा मुलगा शमगार याच्या
आणि याएलच्या कारकिर्दीत राजमार्ग
ओस पडले वाटसरुंचे तांडे आडवाटेने जाऊ लागले.
7 “दबोरा तू येईपर्यंत इस्राएलची माता म्हणून तू उभी राहीपर्यंत [b]
इस्राएलमध्ये सैनिक नव्हते.
नावालाही सैनिक नव्हते.
8 “नगराच्या वेशीपाशी युध्द करायला
परमेश्वराने नवे नेते निवडले. [c]
तेव्हा चाळीस हजार इस्राएल लोकांत
कोणाकडेही भाला किंवा ढाल नव्हती.
9 “ज्यांनी स्वेच्छेने युध्दावर जाण्याचे पत्करले
त्या इस्राएल लोकांच्या सेनाधिपती बरोबर माझे हृदय आहे.
परमेश्वराचा धन्यवाद करा.
10 “पांढऱ्या गाढवांवर बसणाऱ्यांनो,
खोगिराच्या बिछायतीवर बसणाऱ्यांनो
आणि वाटेने चालणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या.
11 गुरांच्या पाणवठ्यावर आम्हाला झांजांचा
नाद ऐकू येतो.
जेंव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या
लोकांनी लढाई केली
आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात,
आणि इस्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात.
तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी
26 बंधूनो, मग काय करावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, प्रत्येकाकडे गाण्यासाठी स्तोत्र असते कोणाकडे शिक्षण असते. कोणाकडे प्रकटीकरण असते. कोणी दुसऱ्या भाषेत बोलतो, कोणी त्या भाषेचा अर्थ सांगतो, प्रत्येक गोष्ट मंडळीच्या वाढीसाठी केली गेली पाहिजे. 27 जर कोणी दुसऱ्या भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एका वेळी एकानेच बोलावे, आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा. 28 जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, व स्वतःशी व देवाशी बोलावे.
29 दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी. 30 बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रकट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे. 31 जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल, तर एका वेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल. 32 जे आत्मे भविष्यवाद्यांना प्रेरणा देतात, ते त्या संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात. 33 कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांति आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात,
34 स्त्रियांनी सभेत गप्प बसावे, कारण त्यांच्यासाठी सभेत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते, 35 त्यांना जर काही शिकायचे असेल, तर त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे. कारण स्त्रीने सभेत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे.
36 तुमच्याकडूनच देवाचा संदेश बाहेर गेला होता काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे? 37 एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो धार्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हाला लिहित आहे ती देवाकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. 38 म्हणून जर कोणी ती मानत नसेल, तर त्यालाही मानण्यात येणार नाही.
39 म्हणून माझ्या बंधूनो, देवासाठी संदेश देण्यासाठी उत्सुक असा, दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्याला मना करु नका. 40 तर सर्व गोष्टी योग्य रीतीने आणि व्यवस्थित असाव्यात.
2006 by World Bible Translation Center