Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “दूर ओकच्या झाडावर असलेला पारवा” या चालीवर आधारलेले दावीदाचे मास्कील. पलिष्ट्यांनी त्याला गाथमध्येपकडले त्या वेळचे स्तोत्र
56 देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर.
ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत.
2 माझ्या शत्रूंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला.
मोजता न येण्याइतके लढणारे तिथे आहेत.
3 मी जेव्हा घाबरतो तेव्हा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.
4 माझा देवावर विश्वास आहे म्हणून मी भीत नाही.
लोक मला त्रास देऊ शकत नाहीत.
देवाच्या वचनाबद्दल मी त्याचे गुणगान करीन.
5 माझे शत्रू माझ्या शब्दांचा विपर्यास करतात.
ते नेहमी माझ्या विरुध्द दुष्ट कारवाया करतात.
6 ते एकत्र लपतात आणि
मला मारण्यासाठी माझी प्रत्येक हालचाल टिपतात.
7 देवा, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे.
परक्या राष्ट्रांचा राग सहन करण्यासाठी त्यांना दूर पाठवून दे.
8 मी खूप चिंताक्रांत झालो आहे.
मी किती रडलो ते तुला माहीत आहे.
तू माझ्या अश्रूंची नक्कीच मोजदाद ठेवली असशील.
9 म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रूंचा पराभव कर.
तू ते करु शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस.
10 मी देवाच्या वचनाबद्दल त्याची स्तुती करतो.
परमेश्वराने मला वचन दिले म्हणून मी त्याचे गुणगान करतो.
11 माझा देवावर भरंवसा आहे म्हणून मला भीती वाटत नाही.
लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत.
12 देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे.
मी तुला माझे धन्यवाद अर्पण करणार आहे.
13 का? कारण तू मला मृत्यूपासून वाचवलेस,
तू मला पराभवापासून वाचवलेस
म्हणून केवळ जिवंत असलेले लोकच
जो प्रकाश पाहू शकतात अशा प्रकाशात मी त्याला अनुसरेन.
नामानची समस्या
5 नामान हा अरामच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्याला कोड होते.
2 अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलमध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलमधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानच्या बायकोची दासी झाली. 3 ती नामानच्या बायकोला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनमधला संदेष्टा अलीशा याला भेटावे असे मला वाटते. तो यांचे कोड बरे करु शकेल.”
4 नामान मग अरामच्या राजाकडे गेला. त्याने राजाला ही इस्राएलची मुलगी काय म्हणाली ते सांगितले.
5 त्यावर राजा म्हणाला, “तू आत्ताच जा. इस्राएलच्या राजासाठी मी पत्र देतो.”
तेव्हा नामान इस्राएलला निघाला. आपल्याबरोबर त्याने नजराणा घेतला. साडेसातशे पौंड चांदी, सहा हजार सुवर्णमुद्रा आणि दहा वस्त्रांचे जोड घेतले. 6 आपल्या राजाकडून त्याने इस्राएलच्या राजासाठी पत्रही घेतले. पत्रात म्हटले होते: “आणि पत्रास कारण की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे.”
7 इस्राएलच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा आपण दु:खी आणि हतबल झालो आहोत हे दाखवण्यासाठी त्याने आपले कपडे फाडून घेतले. तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे की काय? छे छे! जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. असे असताना अरामच्या राजाने कोड असलेल्या माणसाला उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? तसा विचार केला तर यात काही तरी कारस्थान दिसते. अरामचा राजा काही तरी कुरबूर सुरु करायच्या विचारात आहे!”
8 राजाचे हे दु:खाने कपडे फाडणे आणि अस्वस्थ होणे संदेष्टा अलीशाच्या कानावर गेले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, “तू कपडे का फाडलेस? (तू एवढा दु:खी का होतोस?) नामानला माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलमध्ये संदेष्टा असल्याचे त्याला कळेल.”
9 तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराशी आला आणि दाराबाहेर थांबला. 10 अलीशाने नोकरा मार्फत नामानला निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात सात वेळा स्नान कर म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ, नितळ होशील.”
11 नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “मला वाटले, अलीशा निदान बाहेर येईल, माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवील आणि मला बरे करील. 12 अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलमधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करुन मी शुध्द का होऊ नये?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.
13 पण नामानचे नोकर त्याच्या पाठोपाठ गेले आणि त्यांनी त्याला समजावले. ते म्हणाले. “स्वामी, संदेष्ट्याने तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? मग एखादी साधीशी बाब तुम्ही ऐकायलाच हवी नाही का? ‘आंघोळ कर.’ त्याने तू स्वच्छ, निर्दोष होशील एवढेच तर त्याने सांगितले.”
14 तेव्हा नामानने अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे केले. यार्देन नदीत त्याने सात वेळा बुडी मारुन स्नान केले. त्याने तो स्वच्छ, नितळ झाला. त्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल झाली.
13 म्हणून, जो दुसऱ्या भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. 14 कारण जर मी दुसऱ्या भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझे मन रिकामे राहते. 15 मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धिनेही प्रार्थना करीन. 16 कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो फक्त ऐकणारा सामान्य तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही. 17 आता तू धन्यवाद देत असलास हे जरी चांगले असले तरी दुसरी व्यक्ति आध्यात्मिकदृष्ट्या बलवान झालेली नसते.
18 मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलू शकतो ज्याचे दान मला आहे, 19 परंतु सभेत इतरांनाही बोध करता यावा म्हणून इतर भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माझ्या मनाप्रमाणे पाच शब्द सांगणे मी पसंत करतो.
20 बंधूनो, तुमच्या विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा. 21 नियमशास्त्र म्हणते,
“इतर भाषा बोलणाऱ्याचा
उपयोग करुन,
मी या लोकांशी बोलेन
तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” (A)
हे असे प्रभु म्हणतो.
22 म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वासणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. 23 म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल (आणि) जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हाला म्हणणार नाही का? 24 परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात; 25 त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात. आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे!”
2006 by World Bible Translation Center