Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 71:1-6

71 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
    त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील.
    तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो,
    तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस.
तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.
देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव.
    मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच
    तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे
    मी माझ्या आईच्या शरीरात होतो
    तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीच तुझी प्रार्थना केली.

2 इतिहास 36:11-21

यहूदाचा राजा सिद्कीया

11 सिद्कीया यहूदाचा राजा झाला तेव्हा तो एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेम मध्ये अकरा वर्षे राज्य केले. 12 परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य असे त्याचे वर्तन असे. परमेश्वराचे आदेश संदेष्टा यिर्मया याच्याकडून येत असत.त्याच्यापुढेही सिदकीया विनम्र झाला नाही आणि यिर्मयाचे त्याने ऐकले नाही.

यरूशलेमचा विनाश

13 सिद्कीयाने नबुखद्नेस्सर विरुध्द उठाव केला. नबुखद्नेस्सरने पूर्वी सिद्कीया कडून स्वतःशी एकनिष्ठतेची शपथ वाहवली होती. सिद्कीयाने तेव्हा देवाची शपथ घेऊन तसे वचन दिले होते. पण तरीही सिद्कीयाने आडमुठेपणा केला आणि आपला आयुष्यक्रम बदलून इस्राएलच्या परमेश्वर देवाचे आज्ञापालन करायचे नाकारले. 14 शिवाय याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडीलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रामाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरुशलेममधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळदाण केली. 15 त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांना सावध करण्यासाठी पुन्हापुन्हा संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वराला वाटत होते. 16 पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले. 17 तेव्हा बाबेलच्या राजाला देवाने यहूदा व यरुशलेमवर स्वारी करायला लावले. बाबेलच्या राजाने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरुशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांना जिवे मारताना तरुण-वृध्द, स्त्री-पुरुष, रोगी-निरोगी असा भेदाभेद बाळगला नाही. देवानेच नबुखदनेस्सरला यहूदा व यरुशलेमच्या लोकांना शासन करायची मुभा दिली होती. 18 देवाच्या मंदिरातील सर्व चीजवस्तू त्याने बाबेलला नेली. इतकेच नव्हे तर राजाच्या व सरदारांच्या किंमती वस्तूही नेल्या. 19 नबुखद्नेस्सरने व त्याच्या सैन्याने मंदिराला आग लावली, यरुशलेमची तटबंदी उद्ध्वस्त केली, राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरुशलेममधील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली. 20 अजूनही हयात असलेल्या लोकांना नबुखदनेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले. 21 अशाप्रकारे, यिर्मयाकडून इस्राएल बद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात आले. परमेश्वर यिर्मयाद्वारे म्हणाला होता: “हे ठिकाण सत्तर वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाळलेल्या शब्बाथच्या भरपाईसाठी असे होईल.”

योहान 1:43-51

43 दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला. येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” 44 जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता. 45 फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.”

46 परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला. “नासरेथ! नासरेथमधून काही चांगले निघेल काय?”

फिलिप्प म्हणाला, “येऊन पहा.”

47 येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले, येशू म्हणाला, “हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.”

48 “तुम्ही मला कसे ओळखता?” नथनेलाने विचारले.

येशूने उत्तर दिले, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता. तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्याविषयी सांगण्यापूर्वीच.”

49 मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात.”

50 येशू नथनेलला म्हणाला, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले, असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील!” 51 येशू पुढे म्हणाला, “खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्व जण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.” [a]

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center