Revised Common Lectionary (Semicontinuous)
71 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
2 तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील.
तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
3 माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो,
तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस.
तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.
4 देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव.
मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
5 प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच
तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
6 जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे
मी माझ्या आईच्या शरीरात होतो
तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीच तुझी प्रार्थना केली.
योशीयाचा मृत्यू
20 योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो, फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढण्यासाठी सैन्यासह चालून आला. योशीया त्याला लढाईसाठी सामोरा गेला. 21 पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्याला कळवले की,
“राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील.”
22 पण योशीया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले. आणि वेष पालटून तो लढाईत उतरला. आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशीयाने ऐकले नाही. तो मगिद्दोच्या खोऱ्यात युध्दासाठी सज्ज झाला. 23 या लढाईत योशीयावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा.”
24 तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरुशलेमला नेले. यरुशलेममध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांना फार दु:ख झाले. 25 यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते गाण्याचा पायंडाच पडला आहे. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.
26-27 आपल्या कारकिर्दीत योशीयाने ज्या इतर गोष्टी केल्या त्या इस्राएल आणि यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात अथपासून इतीपर्यंत नोंदवलेल्या आहेत. त्याची परमेश्वरावरची निष्ठा आणि त्याचे आज्ञापालन याविषयी त्यात लिहिले आहे.
इफिस येथे पौल
19 तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले. 2 पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?”
ते अनुयायी त्याला म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही!”
3 तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?”
ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”
4 पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता. त्याने लोकांना सांगितले की, त्याच्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा. तो येणारा म्हणजे येशू होय.”
5 जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. 6 आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले. 7 या गटात सर्व मिळून बारा पुरुष होते.
8 पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे. 9 परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले. व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला, आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले. मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले. आणि तुरन्नाच्या शाळेत दररोच त्यांच्याशी चर्चा केली. 10 हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व यहूदीतर लोकांपर्यंत प्रभु येशूचे वचन पोहोंचले.
2006 by World Bible Translation Center