Revised Common Lectionary (Semicontinuous)
लामेद
89 परमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो.
तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो.
90 तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा.
तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.
91 तुझ्या नियमांमुळे ती अजूनही आहे
आणि ती गुलामाप्रमाणे तुझे नियम पाळते.
92 जर तुझी शिकवण मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटली नसती
तर माझ्या दु:खाने माझा सर्वनाश झाला असता.
93 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा कधीच
विसरणार नाही कारण त्यांनी मला जगू दिले.
94 परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर.
का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.
95 दुष्टांनी माझा नाश करायचा प्रयत्न केला.
पण तुझ्या कराराने मला शहाणे बनवले.
96 तुझ्या नियमांखेरीज इतर गोष्टींना मर्यादा असतात.
27 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला परमेश्वराचे सर्व संदेश लिहिलेला पट यहोयाकीमने जाळला, त्यानंतर हा संदेश आला. यिर्मयाने बारुखला सांगितले व बारुखने लिहून घेतले. तो संदेश असा होता.
28 “यिर्मया, दुसरा पट घे. पहिल्या पटावर लिहिलेले सर्व संदेश दुसऱ्या पटावर लिही. पहिला पट यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळला. 29 यिर्मया, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला असेही सांग ‘परमेश्वर काय म्हणतो पाहा यहोयाकीम, तू तो पट जाळलास. तू म्हणालास “बाबेलचा राजा नक्की येईल आणि या देशाचा नाश करील असे यिर्मयाने का लिहिले? बाबेलचा राजा माणसे व पशू ह्या दोघांचाही नाश करील असे तो का म्हणाला?” 30 म्हणून, यहोयाकीमचे वंशज दावीदाच्या सिंहासनावर बसणार नाहीत. जेव्हा यहोयाकीम मरेल, तेव्हा त्याचे राजाच्या इतमामाने अंत्यसंस्कार होणार नाहीत, तर त्याचा मृतदेह जमिनीवर फेकून दिला जाईल. दिवसाची उष्णता आणि रात्रीचे थंड दव ह्यात तो मृतदेह पडून राहील. 31 मी, परमेश्वर, यहोयाकीम व त्यांची मुले यांना शिक्षा करीन. मी त्याच्या अधिकाऱ्यांनाही शिक्षा करीन. कारण ते सर्व दुष्ट आहेत. मी त्यांच्यावर, यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांवर व यहूदाच्या सर्व लोकांवर भयंकर अरिष्ट आणण्याचे निश्र्चित केले आहे. मी ठरविल्यामप्रमाणे, त्यांचे वाईट करीन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.’”
32 मग यिर्मयाने दुसरा पट घेतला व तो नेरियाचा मुलगा बारुख या लेखनिकाला दिला. यिर्मयाने सांगितले आणि बारुखने या पटावर लिहिले. या दुसऱ्या पटावरील संदेश, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जाळलेल्या पटावरील संदेशाप्रमाणेच होते. पण ह्या दुसऱ्या पटात त्या संदेशा बरोबरच त्या संदेशातील शब्दांप्रमाणे आणखी पुष्कळ शब्दांची भर घातलेली होती.
येशू एका स्त्रीला बरे करतो(A)
38 येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले. 39 येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करु लागली.
इतर अनेकांना येशू बरे करतो
40 सूर्य मावळतीला जात असताना, ज्यांची माणसे निरनिराळ्या रोगांनी आजारी होती त्या सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. 41 कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, “तू देवाचा पुत्र आहेस.” परंतु त्याने त्यांना दटावले व बोलू दिले नाही कारण त्यांना माहीत होते की, तो ख्रिस्त आहे.
येशू इतर शहरांमध्ये जातो(B)
42 जेव्हा दिवस उगवला तेव्हा तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्याला शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले. आणि त्याने त्यांच्यातून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. 43 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे. कारण याच कारणासाठी मला पाठविले आहे.”
44 आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.
2006 by World Bible Translation Center