Revised Common Lectionary (Semicontinuous)
लामेद
89 परमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो.
तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो.
90 तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा.
तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.
91 तुझ्या नियमांमुळे ती अजूनही आहे
आणि ती गुलामाप्रमाणे तुझे नियम पाळते.
92 जर तुझी शिकवण मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटली नसती
तर माझ्या दु:खाने माझा सर्वनाश झाला असता.
93 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा कधीच
विसरणार नाही कारण त्यांनी मला जगू दिले.
94 परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर.
का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.
95 दुष्टांनी माझा नाश करायचा प्रयत्न केला.
पण तुझ्या कराराने मला शहाणे बनवले.
96 तुझ्या नियमांखेरीज इतर गोष्टींना मर्यादा असतात.
11 बारुखने वाचलेले पटावरचे परमेश्वराचे संदेश मीखाया नावाच्या माणसाने ऐकले. शाफानचा मुलगा गमऱ्या ह्याचा मीखाया मुलगा होता. 12 पटावरील संदेश ऐकताच, मीखाया राजावाड्यातील राजाच्या खासगी चिटणीसाच्या खोलीत गेला. तेथे सर्व वरिष्ठ अधिकारी बसलेले होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: खाजगी चिटणीस अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानचा मुलगा गमऱ्या, हनन्याचा मुलगा सिद्कीया. आणखीही काही वरिष्ठ अधिकारी तेथे होते. 13 बारुख पट वाचत असताना ऐकलेली प्रत्येक गोष्ट मीखायाने त्यांना सांगितली.
14 मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यहूदी नावाच्या माणसाला बारुखकडे पाठविले. यहूदी नथन्याचा व नथन्या शलेम्याचा मुलगा होता. शलेम्याच्या वडिलांचे नाव कुशी. यहूदी बारुखला म्हणाला, “ज्या पटावरुन तू वाचलेस तो घेऊन माझ्याबरोबर चल.”
नेरीयाचा मुलगा बारुख याने पट घेतला व तो यहूदीबरोबर अधिकाऱ्यांकडे गेला.
15 मग ते अधिकारी बारुखला म्हणाले, “बस आणि आम्हाला तो पट वाचून दाखव.”
मग बारुखने तो पट त्यांना वाचून दाखविला.
16 त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पटावरील सर्व संदेश ऐकले. मग ते घाबरुन एकमेकांकडे पाहू लागले. ते बारुखला म्हणाले, “पटावरील संदेशाबाबत आपण राजा यहोयाकीम ह्याला सांगितलेच पाहिजे.” 17 मग त्या अधिकाऱ्यांनी बारुखला विचारले, “बारुख, ह्या पटावर लिहिलेले संदेश तुला कोठून मिळाले? यिर्मयाने तुला सांगितलेल्या गोष्टी तू लिहून घेतल्यास का ते आम्हाला सांग.”
18 बारुख म्हणाला, “हो! यिर्मयाने सांगितले व मी ते सर्व शाईने पटावर लिहिले.”
19 मग ते वरिष्ठ अधिकारी बारुखला म्हणाले, “तुला आणि यिर्मयाला कोठेतरी जाऊन लपलेच पाहिजे. तुमच्या लपण्याची जागा कोणालाही कळू देऊ नका.”
20 मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो पट अलीशामा लेखनिकाच्या खोलीत ठेवला. ते राजा यहोयाकीम याच्याकडे गेले व त्यांनी त्याला पटाबद्दल सर्व काही सांगितले.
21-22 यहोयाकीम राजाने यहूदीला तो पट आणण्यासाठी पाठविले. यहूदीने अलीशामा लेखनिकाच्या खोलीतून पट आणला. नंतर यहूदीने तो पट राजाला व तेथे उभ्या असलेल्या सेवकांना वचून दाखविला. हे सर्व वर्षांच्या नवव्या महिन्यात घडले. तेव्हा राजा यहोयाकीम त्याच्या हिवाळी निवासात होता. समोरच्या चुलवणात शेकोटी पेटलेली होती. 23 यहूदीने पट वाचायला सुरवात केली. पण त्याने पटावरील दोन-तीन रकाने वाचताच, राजाने तो पट खेचून घेतला. त्याने लहान चाकूने ते पटावरील रकाने कापले आणि शेकोटीत फेकून दिले. शेवटी सगळाच पट त्याने जाळून टाकला. 24 राजा यहोयाकीम व त्याचे सेवक पटावरील मजकूर ऐकून घाबरले नाहीत. आपल्या चुकांबद्दल दु:ख प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले नाहीत.
25 राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही. 26 यहोयाकीम राजाने लेखनिक बारुख व संदेष्टा यिर्मया यांना अटक करण्याचा काही लोकांना हूकूम दिला. ते लोक म्हणजे राजपुत्र यमेल, अरहज्रीएलचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या हे होत, पण त्यांना बारुख व यिर्मया सापडले नाहीत कारण त्यांना देवाने लपविले होते.
पौलाचा आनंद
2 तुमच्या अंतःकरणात आमच्यासाठी जागा करा: आम्ही कोणाचेही वाईट केले नाही. आम्ही कोणाला भ्रष्ट केले नाही. आम्ही कोणाचा गैर फायदा घेतला नाही. 3 मी तुम्हांला तुमचा निषेध करावा म्हणून असे म्हणत नाही. मी तुम्हांला अगोदरही सांगितले आहे की, आमच्या अंतःकरणात तुमच्याविषयी असे स्थान आहे की, आम्ही तुमच्याबरोबर जगू किंवा मरु. 4 मला तुमच्याविषयी मोठा विश्वास वाटतो, मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो, तुमच्या बाबतीत मी अधिक उत्तेजित झालो आहे. अनेक त्रास झाले तरी आमच्या सर्व त्रासात आमच्या आनंदाला उधाण आले आहे.
5 कारण जेव्हा आम्ही मासेदिनियाला आलो, तेव्हा आमच्या या शरीराला विसावा नव्हता. पण आम्हांला प्रत्येक ठिकाणी त्रास देण्यात आला, बाहेरुन भांडणे, आतून भीति होती. 6 पण जे हताश झाले आहेत त्याचे सांत्वन देव करतो, त्याने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले. 7 त्याच्यामुळेच नव्हे तर तुम्ही त्याला दिलेल्या सांत्वनामुळेसुद्धा. तुमच्या आमच्याबद्दल असलेल्या ओढीबद्दल त्याने आम्हांला सांगितले आहे. तुमचे खोलवरचे दु:ख, माझ्याबद्दलची तुमची असलेली तीव्र सदिच्छा याविषयी सांगितले, त्यामुळे माझा आनंद पूर्वीपेक्षा वाढला आहे.
8 जरी मी माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:खावले असले तरी त्याबद्दल मला खेद होत नाही, जरी मला खेद होत असला तरी मला आता जाणवले आहे की, माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:ख झाले, पण फक्त थोड्या वेळापुरते असावे. 9 तरी आता मी आनंदी आहे. यासाठी नाही की, तुम्हांला दु:खी केले, तर यासाठी की तुमच्या दु:खामुळे तुम्ही पशचात्ताप केला. कारण देवाने इच्छिल्याप्रमाणे तुम्ही दु:खी झाला आणि म्हणून आमच्याकडून कुणाची कोणत्याही प्रकारे हानि झाली नाही. 10 दैवी दु:ख तारणाप्रत नेणारा पश्र्चात्ताप आणते आणि कोणताही खेद बाळ्गीत नाही, पण जगिक दु:ख मरण आणते. 11 पहा दैवी दु:खामुळे तुमच्यात काय निर्माण झाले आहे: किती तरी गंभीरपणा आणि आत्मियता, स्वतःला स्पष्ट करण्यासाठी किती उत्सुकता, किती संताप, किती सावधानता, किती ओढ, किती सदिच्छा व न्याय मिळवून देण्यासाठी किती तत्परता, या बाबतीत प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःला निर्दोष असे सिद्ध केले. 12 म्हणून जरी मी तुम्हांला लिहिले तरी ते कोणी चूक केली म्हणून किंवा कोणी दूसऱ्याला दु:ख दिले म्हणून नाही तर उलट देवासमोर तुम्ही आमच्या बाबतीतील तुमची आत्मियता दाखवली हे तुम्हांला पाहता यावे.
2006 by World Bible Translation Center