Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
राजा अर्तहशश्त नहेम्याला यरुशलेमला पाठवतो
2 राजा अर्तहशश्तच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजासमोर द्राक्षारस आणला गेला. मी तो उचलला आणि राजाला दिला. या पूर्वी मी कधी राजाच्या सहवासात असताना उदास नव्हतो पण यावेळी मात्र कष्टी होतो. 2 म्हणून राजाने मला विचारले, “तुला बरे वाटत नाही का? तू असा खिन्न का दिसतोस? तू मनातून दु:खी दिसतोस.”
तेव्हा मी फार घाबरलो. 3 पण, भ्यायलेला असूनही मी राजाला म्हणालो, “राजा चिरायू होवो! माझ्या पूर्वजांचे जिथे दफन झाले आहे ते नगर उद्ध्वस्त झाले आहे. म्हणून मी दु:खी आहे. नगराच्या वेशीसुध्दा आगीत जळून गेल्या आहेत.”
4 यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?”
उत्तर देण्यापूर्वी मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. 5 मग मी राजाला म्हणालो, “राजाची मर्जी असेल आणि मी तुमच्याशी भलेपणाने वागलो असेन तर कृपया मला माझ्या पूर्वजांचे जिथे दफन झाले आहे त्या यहुदातील यरुशलेम नगराला पाठवावे. तिथे जाऊन नगराची पुन्हा उभारणी करण्याची माझी इच्छा आहे.”
6 राणी राजाजवळच बसली होती. त्या दोघांनी मला विचारले, “तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील? तू परत केव्हा येशील?”
राजा मला जाऊ द्यायला आनंदाने तयार झाला म्हणून मी ही त्याला विशिष्ट मुदत सांगितली. 7 मी पुढे राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मेहेरनजर असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. फरात नदीच्या पश्चिमेकडील अधिकाऱ्यांसाठी काही पत्रे मला द्यावीत. म्हणजे ती त्यांना दाखवल्यावर यहुदाच्या वाटेवर त्यांच्या हद्दीतून सुखरुप जायला ते मला परवानगी देतील. 8 शिवाय दरवाजे, भिंती, प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला द्यायला मला पत्र द्यावे.”
राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्व काही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले.
9 मग मी फरात नदीच्या पश्चिमेकडे असलेल्या, प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो. त्यांना राजाने दिलेली पत्रे दिली. राजाने माझ्यासोबत सैन्यातले अधिकारी आणि घोडेस्वारही पाठवले होते. 10 सनबल्लट आणि तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता. इस्राएलींच्या मदतीसाठी कोणी एक जण आला आहे याने ते नाराज झाले व रागावले. सनबल्लट होरोन या गावचा होता आणि तोबीया अम्मोनी आधिकारी होता.
आपले जीवन देवाला द्या
12 म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हांला विनवितो की, तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. 2 आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा.
3 मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगतो की, विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणांला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा. 4 कारण एका शरीरात आपले अनेक अवयव आहेत तरी सर्व अवयवांचे कार्य एकच नसते. 5 त्याचप्रमाणे, आपण पुष्कळ अंग असून ख्रिस्तामध्ये एक शरीर व एकमेकांचे अवयव आहोत.
6 देवाने दाखविलेल्या दयेनुसार आपणांस निरनिराळी दाने आहेत, जर कोणाला देवाचा संदेश देण्याचे दान आहे तर त्याने ते आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने उपयोगात आणावे. 7 जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे, कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे. 8 कोणाला बोध करण्याचे दान असेल तर त्याने बोध करण्यास वाहून घ्यावे. ज्याला दानधर्म देण्याचे दान असेल त्याने ते सद्हेतूने द्यावे. ज्याला अधिकाराचे दान असेल त्याने दक्षतेने ते काम करावे ज्याला दयेचे दान असेल त्याने आनंदाने दया करावी.
2006 by World Bible Translation Center