Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र
145 देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो.
मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
2 मी तुझी रोज स्तुती करतो.
तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.
3 परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात.
त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.
4 परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील.
तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
5 तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे.
मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.
6 परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील.
तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.
7 तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील.
लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.
8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.
परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.
9 परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो.
तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.
10 परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो.
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
11 तुझे राज्य किती महान आहे हे ते सांगतात.
तू किती महान आहेस हे ते सांगतात.
12 म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते.
तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते.
13 परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील.
तू सदैव राज्य करशील.
14 जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो.
जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो.
15 परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात.
आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
16 परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस
आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.
17 परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते.
तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
18 जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात,
त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो.
जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो,
त्याच्या अगदी जवळ तो असतो.
19 भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो.
परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो.
तो त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो
आणि त्यांना वाचवतो.
20 जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
21 मी परमेश्वराची स्तुती करेन.
प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.
9 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू मला उद्दीपित बनवतेस.
फक्त तुझ्या एका डोळ्याने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने
तू माझे हृदय चोरले आहेस.
10 माझ्या प्रिये, माझ्या वधू तुझे,
प्रेम फार सुंदर आहे.
तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे.
तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
11 माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो.
तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे.
तुझ्या कपड्यांना अत्तरासारखा गोड सुवास आहे.
12 माझ्या प्रिये, माझ्या वधू,
तू कुलुपबंद केलेल्या बागेसारखी शुध्द आहेस.
तू बंदिस्त तळ्यासारखी,
कारंज्यासारखी आहेस.
13 तुझे अवयव डाळिंबाने
आणि इतर फळांनी सर्व
प्रकारच्या सुगंधी पदार्थांनी,
मेंदी,
14 जटामासी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
तुझे अवयव उदाची झाडे,
गंधरस व अगरु व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
15 तू बागेतल्या कारंज्यासाखी,
ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी,
लबानोनच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.
ती म्हणते
16 उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ!
दक्षिणवाऱ्या ये,
माझ्या बागेवरुन वाहा.
तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव.
माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करु दे
आणि तिथली गोड फळे चाखू दे.
तो म्हणतो
5 माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो.
मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली.
मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले.
मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो.
स्त्री प्रेमिकांशी बोलते
प्रिय मित्रांनो, खा, प्या.
प्रेमाने धुंद व्हा.
येशू उपासासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर देतो(A)
33 ते त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य नेहमी उपास करतात आणि प्रार्थना करतात. आणि परुश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य नेहमीच खातपीत असतात.”
34 येशू त्यांना म्हणाला, “नवरा मुलगा (वर) बरोबर असताना त्याच्या पाहुण्यांना तुम्ही उपाशी ठेवाल काय? 35 पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसांत ते उपास करतील.”
36 त्याने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही. 37 आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या द्राक्षारसाच्या कातडी पिशवीत ठेवीत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षारस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल. 38 नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे. 39 कोणालाही जुना द्राक्षारस प्याल्यानंतर नवा नको असतो कारण तो म्हणतो, ‘जुना द्राक्षारसच चांगला आहे.’”
2006 by World Bible Translation Center