Revised Common Lectionary (Semicontinuous)
106 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या.
देवाचे प्रेम सदैव राहील.
2 परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही.
देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
3 जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात ते सुखी असतात.
ते लोक सदैव चांगली कृत्ये करतात.
4 परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव.
मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.
5 परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी
ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे.
मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे.
मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.
6 आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले.
आम्ही चुकलो.
आम्ही दुष्कृत्ये केली.
7 परमेश्वरा, मिसरमधले आमचे पूर्वज
तू केलेल्या चमत्कारांपासून काहीही शिकले नाहीत.
ते लाल समुद्राजवळ होते तेव्हा
आमचे पूर्वज तुझ्याविरुध्द गेले.
8 परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर,
देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.
9 देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला.
देवाने आमच्या पूर्वजांना खोल समुद्रातून वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले.
10 देवाने आमच्या पूर्वजांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले.
देवाने त्यांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका केली.
11 देवाने त्यांच्या शत्रूंना समुद्रात झाकून टाकले.
शत्रूंपैकी एकही जण सुटू शकला नाही.
12 नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला.
त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.
दबोरा, स्त्री न्यायाधीश
4 एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली. 2 तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इस्राएल लोकांचा पराभव करु दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. हरोशेथ या नगरात सीसरा राहात होता. 3 सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.
4 तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती. 5 एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्राएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते. 6 तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश या नगरात राहात असे. दबोरा त्याला म्हणाली, “इस्राएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील दहाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा. 7 मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन.”
8 त्यावर बाराक दबोराला म्हणाला, “तूही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन. तू नसलीस तर मात्र करणार नाही.”
9 दबोरा म्हणाली, “अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे.”
आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली. 10 तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.
11 हेबेर नावाचा एक माणूस केनी लोकांमध्ये होता. तो आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. (केनी लोक होबाबचे वंशज होते. होबाब म्हणजे मोशेचा सासरा) केदेशजवळच्या साननीम येथे एलोन वृक्षाजवळ हेबेरने तळ दिला होता.
12 अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरापाशी आला असल्याचे कोणीतरी सीसराला सांगितले. 13 तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथपासून त्या सर्वांनी किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला.
14 तेव्हा दबोरा बाराकला म्हणाली, “आज सीसराचा पराभव करायला परमेश्वर तुला मदत करणार आहे. त्याने आधीच तुझा मार्ग मोकळा केला आहे हे तुला माहीतच आहे.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरुन दहाहजार माणसांसह निघाला. 15 त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लढाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला. 16 बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने व त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा व सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही.
देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा
10 शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा. 11 देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे. 12 कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे. 13 म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.
14 म्हणून भक्क मपणे उभे राहा! सत्याने आपली कंबर बांधा, नीतीमत्त्वाचे उररत्राण धारण करा. 15 आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला. 16 या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल. 17 आणि तारणाचे शिररत्राण घ्या, आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे, तो घ्या.
2006 by World Bible Translation Center