Revised Common Lectionary (Semicontinuous)
देव नेहमीच त्याच्या लोकांबरोबर असतो
43 याकोबा, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएला, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस. 2 जेव्हा तू अडचणीत असतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही. आगीमधून चालताना तुला भाजणार नाही. ज्वाळा तुला पोळणार नाहीत. 3 का? कारण मी स्वतः तुझा परमेश्वर आहे. मी, इस्राएलचा पवित्र देव तुझा तारणहार आहे. मी तुझ्या मोबदल्यात मिसर देश दिला. तुला माझा करण्यासाठी मी इथिओपिआ व सेबा यांचे दान केले. 4 तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहेस. म्हणून मी तुझा आदर करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी मी सर्व लोक आणि सर्व राष्ट्रे दान करीन.
5 “म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सर्व मुलांना गोळा करून तुझ्याकडे आणीन, मी त्यांना पूर्व आणि पश्चिम दिशेकडून गोळा करीन. 6 मी उत्तरेला म्हणेन: माझे लोक मला परत दे. मी दक्षिणेला सांगेन, माझ्या लोकांना तुरूंगात ठेवू नको. दूरदूरच्या ठिकाणांहून माझ्या मुलांमुलींना माझ्याकडे परत आण. 7 जी माणसे माझी आहेत, जी माझे नाव लावतात, त्या सर्वांना माझ्याकडे आण. मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत.”
दावीदाचे स्तोत्र.
29 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
2 परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा.
तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
3 परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो
गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
4 परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते.
त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
5 परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो.
परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6 परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते.
सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
7 परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
8 परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
9 परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो.
परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता
आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो.
परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.
14 यरुशलेममधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले. 15 जेव्हा पेत्र व योहान आले. तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. 16 या लोकांचा प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. 17 मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.
15 लोक मशीहाची अपेक्षा करीत होते. आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की, “कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे.”
16 त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. 17 त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विझविता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
योहानाकरवी येशूचा बाप्तिस्मा(A)
21 तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता, तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले. 22 आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रुपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”
2006 by World Bible Translation Center