Revised Common Lectionary (Semicontinuous)
12 यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर.
सियोन तुझ्या देवाची स्तुती कर.
13 यरुशलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो
आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो.
14 देवाने तुझ्या देशात शांती आणली.
म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही.
आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे.
15 देव पृथ्वीला आज्ञा करतो
आणि ती त्या आज्ञा त्वरित पाळते.
16 जमीन लोकरी सारखी संपूर्ण पांढरी होई पर्यंत देव हिमवर्षाव करतो.
देव गोठलेले बर्फ धुळीसारखे हवेत उडू देतो.
17 देव, आकाशतून दगडाप्रमाणे गारांचावर्षाव करतो.
तो जी थंडी पाठवतो तिचा सामना कुणीही करु शकत नाही.
18 नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात.
बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते.
19 देवाने याकोबाला (इस्राएल) त्याची आज्ञा दिली.
देवाने इस्राएलला त्याचे नियम दिले.
20 देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही.
देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत.
परमेश्वराची स्तुती करा.
5 तो गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्याला स्वप्नात दर्शन दिले देव म्हणाला, “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”
6 शलमोन तेव्हा म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडील यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते भलेपणाने आणि योग्य मार्गाने जगले. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलालाच गादीवर बसवून तू मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस. 7 माझ्या वडीलांनंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी अजाण मुलासारखाच आहे. माझे कर्तव्य बजावायला योग्य ते शहाणपण माझ्याजवळ नाही. 8 मी तुझा सेवक तू निवडलेल्या अक्षरश: अगणित अशा लोकांपैकी एक आहे. शासकाला तर अनेक निर्णय करावे लागतात. 9 तेव्हा राज्य करायला आणि लोकांशी न्यायबुध्दीने वागायला आवश्यक ते शहाणपण तू मला दे. त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज एवढ्या लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे.”
10 शलमोनाने हे मागितले याचा परमेश्वराला फार आनंद झाला 11 म्हणून देव त्याला म्हणाला, “तू स्वतःसाठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस. 12 तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तू ज्ञानी आणि चाणाक्ष होशील तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही. 13 शिवाय तू न मागितलेल्या गोष्टीही बक्षीस म्हणून मी तुला देईन. आयुष्यभर तुला मानसन्मान मिळेल आणि तुझ्यासारखा थोर राजा कोणी असणार नाही. 14 मी दाखवलेल्या मार्गांने चाल आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळ. आपल्या वडीलांप्रमाणेच वाग. असे वागलास तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”
येशू जगाचा प्रकाश आहे
12 नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील.”
13 परंतु परुशी लोक येशूला म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्वतः आपल्याविषयी बोलता, तेव्हा ह्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारु शकत नाही.”
14 येशूने उत्तर दिले, “होय, मी स्वतःच माझ्याविषयी या गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील. कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हांला माहीत नाही. 15 तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही. 16 पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो. कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले, तो माझ्याबरोबर असतो. 17 तुमचे स्वतःचेच नियमशास्त्र असे म्हणते की, दोन साक्षीदार एकाच गोष्टीविषयी साक्ष देतात तेव्हा ते काय म्हणतात, ते तुम्हांला स्वीकारावेच लागते. 18 स्वतःविषयी बोलणाऱ्या दोघा साक्षीदारांपैकी मी एक साक्षीदार आहे. आणि ज्या पित्याने मला पाठविले, तो दुसरा साक्षीदार आहे.”
19 लोकांनी येशूला विचारले, “तुमचा पिता कोठे आहे?”
येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला अगर माझ्या पित्याला ओळखत नाही. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
2006 by World Bible Translation Center