Revised Common Lectionary (Semicontinuous)
148 परमेश्वराची स्तुती करा.
स्वर्गातल्या देवदूतांनो
स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा.
ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा.
आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा.
का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती
त्या सदैव राहाव्यात म्हणून केली.
देवाने कधीही न संपणारे नियम केले.
7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा.
महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
8 देवाने अग्नी आणि गारा, बर्फ
आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे
आणि देवदार वृक्ष निर्मिले.
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि
पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले.
त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या.
देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा.
त्याच्या नावाला सदैव मान द्या.
स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील.
लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील.
लोक इस्राएलची स्तुती करतील.
हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो.
परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र
देव त्याच्या लोकांना घरी आणेल
54 “स्त्रिये, सुखी हो.
तुला मुले नाहीत.
पण तू सुखी असावेस. परमेश्वर म्हणतो,
“एकट्या असणाऱ्या बाईला. [a]
नवरा असणाऱ्या बाईपेक्षा जास्त मुले होतील.”
2 “तुझा तंबू मोठा कर.
तुझी दारे सताड उघड.
तुझ्या घराचा आकार वाढव
तुझा तंबू मोठा आणि मजबूत कर.
3 का? कारण तुझा पसारा खूप वाढणार आहे.
खूप राष्ट्रातील लोक तुझ्या मुलांना येऊन मिळणार आहेत.
तुझे वंशज राष्ट्रांची व्यवस्था लावतील
आणि नाश झालेल्या शहरातून पुन्हा तुझी मुले वस्ती करतील.
4 घाबरू नकोस.
तुझी निराशा होणार नाही.
लोक तुझी निंदा करणार नाहीत.
तुला ओशाळवाणे व्हावे लागणार नाही.
तू तरूण असताना तुला लज्जित व्हावे लागले.
पण आता तू ते विसरशील.
पती गेल्यावर तुझी झालेली अप्रतिष्ठा
तुला आठवणार नाही.
5 कारण तुझा पती हा तुझा निर्माता म्हणजेच देव आहे.
त्याचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे.
इस्राएलला वाचविणारा एक तोच आहे तो इस्राएलचा पवित्र देव आहे.
आणि त्याला सर्व पृथ्वीचा पवित्र देव म्हटले जाईल.
6 “तू परित्यक्ता स्त्रीप्रमाणे होतीस.
तू मनातून फार दुखी: होतीस.
पण देवाने तुला आपली मानले.
पतीने तरूणपणीच सोडून दिलेल्या स्त्रीप्रमाणे तुझी अवस्था होती.
पण परमेश्वराने तुला आपली मानले.”
7 देव म्हणतो, “मी तुला सोडले ते थोड्या वेळापुरतेच.
मी तुला माझ्यात सामावून घेईन आणि तुझ्यावर कृपा करीन.
8 मला खूप राग आला होता म्हणून मी थोड्या वेळापुरता तुझ्यापासून लपून बसलो.
पण मी तुझ्यावर अखंड कृपा करून तुझे दुख: हलके करीन.”
परमेश्वर, तुझा तारणहार असे म्हणाला.
देव त्याच्या लोकांवर नेहमीच प्रेम करतो
9 देव म्हणतो, “नोहाच्या काळात प्रलय आणून मी जगाला शिक्षा केली होती ते आठव.
पण, पुन्हा प्रलय घडवून जग नष्ट करणार नाही असे वचन मी नोहाला दिले होते.
त्याचप्रमाणे मी आता तुला वचन देतो की मी तुझ्यावर कधी रागावणार नाही
आणि तुझी खरडपट्टी ही काढणार नाही.”
10 परमेश्वर म्हणतो, “एकवेळ डोंगर नाहीसे होतील,
टेकड्यांचे रूपांतर धुळीत होईल.
पण माझी तुझ्यावरची कृपा कधीही नाहीशी होणार नाही.
मी स्थापन केलेली
शांती चिरंतन राहील.”
तुझ्यावर कृपा करणारा परमेश्वरच हे सगळे सांगत आहे.
11 “बिचाऱ्या नगरी,
वादळाप्रमाणे शत्रू तुझ्यावर चालून आले
आणि कोणीही तुझे सांत्वन केले नाही.
पण मी तुला पुन्हा उभारीन.
तुझ्या वेशीच्या पायासाठी मी अतिशय चांगला चुना वापरीन.
मी पाया घालताना इंद्रनील वापरीन.
12 वेशीच्या भिंतीवरील दगड माणकांचे बसवीन.
वेशीच्या दारासाठी मी चकाकणारी रत्ने वापरीन.
वेशीसाठी मी हिरेमाणके वापरीन.
13 तुझी मुले देवाला अनुसरतील.
आणि तो त्यांना शिक्षण देईल.
मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल.
नवीन यरुशलेम
21 मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी [a] पाहिली. कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती. आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. 2 पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर यरुशलेम, वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते.
3 आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, “आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे. आणि तो त्यांच्या बरोबर राहील. आणि तो त्यांचा देव होईल. 4 तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील. आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवा दु:खसहन् करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.”
5 जो सिंहासनावर बसलेला होता, तो म्हणाला, “पाहा मी सर्व काही नवीन करीत आहे!” मग तो पुढे म्हणाला, “लिही! कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत.”
6 नंतर तो मला म्हणाला, “पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे, त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. 7 जो विजय मिळवितो, त्याला या सर्व गोष्टी मिळतील, मी त्याचा देव होईन, व तो माझा पुत्र होईल.
2006 by World Bible Translation Center