Revised Common Lectionary (Semicontinuous)
148 परमेश्वराची स्तुती करा.
स्वर्गातल्या देवदूतांनो
स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा.
ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा.
आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा.
का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती
त्या सदैव राहाव्यात म्हणून केली.
देवाने कधीही न संपणारे नियम केले.
7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा.
महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
8 देवाने अग्नी आणि गारा, बर्फ
आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे
आणि देवदार वृक्ष निर्मिले.
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि
पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले.
त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या.
देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा.
त्याच्या नावाला सदैव मान द्या.
स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील.
लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील.
लोक इस्राएलची स्तुती करतील.
हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो.
परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र
17 यहोयादा मरण पावल्यावर यहूदाच्या सरदारांनी राजा योवाशला येऊन मुजरा केला. राजाने त्यांचे ऐकून घेतले. 18 पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांवर देवाचा कोप झाला. 19 लोकांना परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले. संदेष्ट्यांनी लोकांना परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात.
20 तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा मुलगा. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हाला यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हाला सोडून देत आहे.’”
21 पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांना जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्याला दगडफेक करुन मारले. हे त्यांनी मंदिराच्या आवारातच केले. 22 जखऱ्याचे वडील यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाच्या मुलाला जखऱ्याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, “हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.”
23 वर्ष अखेरीला अरामच्या सैन्याने योवाशवर हल्ला केला. यहूदा आणि यरुशलेमवर हल्ला करुन त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले. 24 अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशला हे शासन केले.
विशेष कामासाठी सात जणांची निवड केली जाते
6 अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याचवेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहूदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की, अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो, तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते. 2 बारा प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले.
प्रेषित त्यांना म्हणाले, “देवाचे वचन शिकविण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही! लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले. 3 म्हणून बंधूनो, तुमचे स्वतःचे सात लोक निवडा. लोकांनी त्यांना हे चांगले आहेत असे म्हटले पाहिजे. ते ज्ञानाने व आत्म्याने पूर्ण भरलेले असावेत. आणि त्यांना ही सेवा करण्यास आपण देऊ. 4 मग आपण संपूर्ण वेळ प्रार्थना करण्यात व देवाचे वचन शिकविण्यात घालवू शकतो.”
5 बंधुवर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या सात जणांची निवड केली: स्तेफन (मोठा विश्वास व पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप्प), [a] प्रखर, नीकनोर, तिम्मोन, पार्मिना आणि निकलाव (अंतुखियाकर जो यहूदी झाला होता). 6 नंतर त्यांनी या सात जणांना प्रेषितांसमोर उभे केले. प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली.
7 देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते. यरुशलेममधील अनुयायांचा गट मोठा होत होता. एकढेच नव्हे तर एका मोठ्या यहूदी याजकवर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या.
51 “तुम्ही जे ताठ मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखी असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारीत आला आहात. 52 तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (ख्रिस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (ख्रिस्ताचा) विश्वासघात व खून केलात. 53 तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”
स्तेफनाचा वध होतो
54 यहूदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताला ऐकले व त्यांना फार राग आला, ते त्याच्याविरुद्ध दातओठ खाऊ लागले. 55 परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. 56 तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे!”
57 स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहूदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हातांनी झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले. 58 त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. 59 ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, “हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर!” 60 नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, “प्रभु, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको!” असे बोलून त्याने प्राण सोडला.
2006 by World Bible Translation Center