Revised Common Lectionary (Semicontinuous)
मरीया देवाची स्तुति करते
46 आणि मरीया म्हणाली,
47 “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;
माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.
48 कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली होय,
येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
49 कारण सर्वसमर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात,
त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
51 त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले;
गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.
52 सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे,
आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
53 त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे.
श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.
54 त्याचा सेवक जो इस्राएल याला
मदत करण्यास तो आला आहे.
55 त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे
अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”
यरुशलेममधून नियमशास्त्र येईल
4 शेवटल्या दिवसांत, देवाचे मंदिर ज्या पर्वतावर आहे, तो पर्वत सर्व पर्वतांत उंच असेल.
टेकड्यांपेक्षा तो उंच होईल.
आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा प्रवाह सतत वाहत राहील.
2 तेथे पुष्कळ देशातले लोक जातील.
ते म्हणतील, “या! आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ या.
याकोबच्या देवाच्या मंदिरात आपण जाऊ या.
मग परमेश्वर आपल्याला त्याचा आचारधर्म शिकवील
व आपण त्याचे अनुसरण करु.”
परमेश्वराच्या शिकवणुकीचा आणि परमेश्वराच्या संदेशाचा प्रारंभ यरुशलेममधून सियोन पर्वतावरुन होईल.
मग तो सर्व जगात पसरेल.
3 तेव्हा सर्व राष्ट्रांतील लोकांचा परमेश्वर न्यायाधीश असेल.
दूरच्या देशातील पुष्कळ लोकांमधील वाद परमेश्वर मिटवील.
ते लोक लढण्यासाठी शस्त्रे वापरण्याचे सोडून देतील.
ते त्यांच्या तलवारीपासून नांगर बनवतील
आणि भाल्यांचा उपयोग झाडे छाटण्यासाठी करतील.
लोक एकमेकांशी लढाई करणार नाहीत.
लोकांना कधीही युध्दाचे शिक्षा दिले जाणार नाही.
4 प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीखाली
व अंजिराच्या झाडाखाली बसेल.
त्यांना कोणीही घाबविणार नाही.
का? कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने असे घडेल म्हणून सांगितले आहे.
5 दुसऱ्या राष्ट्रातील लोक आपापल्या दैवतांना अनुसरतात.
पण आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे नाव घेत सदासर्वकाळ चालत राहू.
ख्रिस्तामध्ये एक
11 म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते. 12 आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला. 13 पण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.
14 कारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला. 15 त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे. 16 आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल. 17 म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, 18 कारण त्याच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो.
19 यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात. 20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. 21 संपूर्ण इमारात त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभुमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे. 22 त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
2006 by World Bible Translation Center