Revised Common Lectionary (Semicontinuous)
शांतीचा राजा येत आहे
11 इशायाच्या बुंध्याला (वंशाला) अंकुर (मूल) फुटून वाढू लागेल. ती फांदी इशायाच्या मुळाची असेल. 2 परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील. 3 परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही.
हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही. 4-5 तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगुलपणा व प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.
6 त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील. 7 गायी आणि अस्वले एकत्र गुण्यागोविंदाने राहतील. सगळ्यांची पिल्ले एकत्र राहतील आणि कोणीच कोणाला इजा करणार नाही. सिंह गाईसारखे चारा खातील. एवढेच नव्हे तर सापही माणसाला दंश करणार नाहीत. 8 तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.
9 ह्या सगळ्या गोष्टीवरून, तेथे शांती नांदेल, हेच दिसते. कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही. माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत. का? कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल. समुद्रात जसे अथांग पाणी असते, तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल.
8 आणि तू, कळपाच्या मनोऱ्या,
तुझी वेळ येईल.
योफल, सियोनच्या टेकाडा,
तू पुन्हा शासनाची जागा होशील.
हो! पूर्वीप्रमाणेच राज्य
यरुशलेममध्ये असेल.
इस्राएल लोकांनी बाबेलला का जायला पाहिजे?
9 आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस?
तुझा राजा गेला का?
तुझ्या नेत्याला तू गमावलेस का?
प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे तुला त्रास होत आहे.
10 सियोनच्या कन्ये, तुला वेदना जाणवू दे.
तू आपल्या बाळाला जन्म दे.
तुला या नगरीतून (यरुशलेममधून) बाहेर गेलेच पाहिजे.
तू रानात राहशील.
मला असे म्हणायचे आहे की तू बाबेलला जाशील.
पण त्या ठिकाणापासून तुझे रक्षण केले जाईल.
परमेश्वर तेथे जाऊन तुझी सुटका करील.
तो, तुला, तुझ्या शत्रूंपासून दूर नेईल.
परमेश्वर इतर राष्ट्रांचा नाश करील
11 पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द लढण्यास आली आहेत.
ती म्हणतात, “ती पाहा सियोन!
या, आपण तिच्यावर हल्ला करु या.”
12 त्या लोकांनी त्यांचे बेत केलेत.
पण परमेश्वर काय बेत करीत आहे, हे त्यांना माहीत नाही.
परमेश्वराने त्या लोकांना विशेष उद्देशाने येथे आणले आहे.
ते लोक, खळ्यातील धान्याप्रमाणे चिरडले जातील.
इस्राएल त्याच्या शत्रूंचा पाडाव करील
13 “सियोनच्या कन्ये, ऊठ आणि त्या लोकांना चिरडून टाक.
मी तुला खूप सामर्थ्यवान करीन.
तुला जणू काही लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर असतील.
तू पुष्कळांवर आघात करुन त्यांचे तुकडे तुकडे करशील.
तू त्यांची संपत्ती परमेश्वराला देशील.
तू त्याचे धन जगाच्या परमेश्वराला देशील.”
31 “मग मी या पिढीची कोणाशी तुलना करु? ते कोणासारखे आहेत? 32 ते उनाड मुलांसारखे आहेत, ते बाजारात बसतात, ते एकमेकाला म्हणतात,
‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला
पण तुम्ही नाचला नाही.
आम्ही तुमच्यासाठी शोकगीत गाईले
पण तुम्ही रडला नाही.’
33 बाप्तिस्मा करणारा योहान हा भाकर किंवा द्राक्षारस खात किंवा पीत आला नाही. पण तुम्ही म्हणता, ‘त्याला भूत लागले आहे.’ 34 मनुष्याचा पुत्र खात पीत आला आणि तुम्ही म्हणता, ‘पाहा, तो खादाड, मद्यपी, जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र आहे.’ 35 ज्ञान तेव्हा योग्य ठरते, जेव्हा त्याचा वापर केल्याने झालेल्या गोष्टी योग्य असतात.”
2006 by World Bible Translation Center