Revised Common Lectionary (Semicontinuous)
शांतीचा राजा येत आहे
11 इशायाच्या बुंध्याला (वंशाला) अंकुर (मूल) फुटून वाढू लागेल. ती फांदी इशायाच्या मुळाची असेल. 2 परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील. 3 परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही.
हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही. 4-5 तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगुलपणा व प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.
6 त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील. 7 गायी आणि अस्वले एकत्र गुण्यागोविंदाने राहतील. सगळ्यांची पिल्ले एकत्र राहतील आणि कोणीच कोणाला इजा करणार नाही. सिंह गाईसारखे चारा खातील. एवढेच नव्हे तर सापही माणसाला दंश करणार नाहीत. 8 तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.
9 ह्या सगळ्या गोष्टीवरून, तेथे शांती नांदेल, हेच दिसते. कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही. माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत. का? कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल. समुद्रात जसे अथांग पाणी असते, तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल.
20 परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, 21 “या लोकांपासून दूर जा. मला आता त्यांचा नाश करायचा आहे.”
22 पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, “कृपा करुन या सगळयांवर रागावू नकोस, सर्वाच्या आत्म्यांच्या देवा! फकत एका माणसाने पाप केले आहे!”
23 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, 24 “सर्व लोकांना कोरह, दाथान, व अबीराम यांच्या तंबूपासून दूर जायला सांग.”
25 मोशे उभा राहिला आणि दाथान व अबीराम यांच्याकडे गेला. इस्राएलचे सर्व वडिलधारी त्याच्या मागे गेले. 26 मोशेने सर्व लोकांना बजावले, “या दुष्टांच्या तंबू पासून दूर जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. जर तुम्ही हात लावला तर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल.”
27 म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या बायका, मुले आणि तहान्या मुलांबरोबर उभे राहिले.
28 नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हांला दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हांला दाखवीन. 29 हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मेले-जशी माणसे नेहमी मरतात-तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरंच पाठवल नाही. 30 पण जर परमेश्वराने या लोकांना वेगव्व्या नव्या रीतीने मारले-तर तुम्हांला कळेल की त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे: धरती दुभागेल आणि त्या लोकांना आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.”
31 जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली. 32 धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली. 33 ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्या बरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले.
34 इस्राएल लोकांनी नाश होत असलेल्या लोकांचे आक्रोश ऐकले म्हणून ते सर्व सैरावैरा धावू लागले आणि म्हणाले, “पृथ्वी आपल्यालासुद्धा गिळून टाकील.”
35 नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने उद-धूप जाळणाऱ्या 250 लोकांचा नाश केला.
23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरविला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्यविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करुन येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. 24 त्याने फोड करुन सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.
25 पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरुन मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता:
26 ‘या लोकांकडे (यहूदी) तुम्ही जा, आणि त्यांना सांगा:
तुम्ही ऐकाल तर खरे
पण तुम्हांला समजणार नाही.
तुम्ही पहाल तुम्हाला दिसेल
पण तुम्ही काय पाहात ते तुम्हाला कळणार नाही.
27 कारण या लोकांचे विचार मंद झाले आहेत
त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही.
आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही
तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते
आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळाले
असते आणि मी त्यांना बरे केले असते.’ (A)
28 “म्हणून देवाचे हे तारण यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठविण्यात आले आहे. हे तुम्हा यहूदी लोकांना कळावे. ते ऐकतील.” 29 [a]
30 पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी. 31 त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. त्याने प्रभु येशूविषयी शिक्षण दिले. तो हे काम फार धैर्याने करीत असे. आणि कोणीही त्याला बोलण्यात अडवू शकले नाही.
2006 by World Bible Translation Center