Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
इतर देशांतील लोक म्हणतील,
“इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
तर आपण खूप आनंदी होऊ.
4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5 एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6 तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
इस्राएलची शिक्षा संपेल
40 तुमचा देव म्हणतो,
“माझ्या लोकांचे सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.
2 यरुशलेमशी ममतेने बोला यरुशलेमला सांगा:
‘तुझ्या सेवेचा काळ संपला
तुझ्या पापांची किंमत तू मोजली आहेस.’
परमेश्वराने यरूशलेमला शिक्षा केली.
तिने केलेल्या प्रत्येक पापाकरिता दोनदा शिक्षा केली.”
3 ऐका! कोणीतरी ओरडत आहे,
“परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा.
आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.
4 प्रत्येक दरी भरून काढा.
प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा.
वेडेवाकडे रस्ते सरळ करा.
खडकाळ जमीन गुळगुळीत करा.
5 मग देवाची प्रभा फाकेल
आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील.
हो! स्वतः परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.”
6 एक आवाज आला, “बोल!”
मग माणूस म्हणाला, “मी काय बोलू?”
आवाज म्हणाला, हे बोल: “सर्व माणसे गवतासारखी आहेत.
माणसाचा चांगुलपणा कोवळ्या गवताच्या पात्यासारखा आहे.
7 परमेश्वराकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने
हे गवत सुकते व मरते,
सर्व माणसे गवतासारखी आहेत हेच सत्य आहे.
8 गवत सुकते आणि फुले कोमेजतात
पण आमच्या देवाची वाणी सदासर्वकाळ राहते.”
तारण: देवाची सुवार्ता
9 सियोन, तुझ्याकडे सांगण्यासाठी एक सुर्वाता आहे.
उंच डोंगरावर चढून जा आणि ही सुवार्ता ओरडून सांग.
यरूशलेम, तुझ्यासाठी चांगली वार्ता आहे.
घाबरू नकोस.
मोठ्याने बोल.
यहुदातील सर्व शहरांना ही वार्ता सांग, “हा पाहा तुमचा देव!”
10 परमेश्वर, माझा प्रभू सर्व सामर्थ्यानिशी येत आहे
लोकांवर अधिकार चालविण्यासाठी तो त्याचे सामर्थ्य वापरील
तो आपल्या लोकांसाठी बक्षिस आणील.
तो त्यांचा मोबदला चुकता करील.
11 ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या वळवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या लोकांना वळवेल.
परमेश्वर आपल्या हाताने (सामर्थ्याने) त्यांना एकत्र गोळा करील.
तो लहान मेढ्यांना हातांत उचलून घेईल व त्या लहानग्यांच्या आया परमेश्वराच्या बाजूबाजूने चालतील.
22 कारण आपल्याला माहीत आहे की, आजपर्यंत, निर्माण केलेले संपूर्ण जग कण्हत, वेदना भोगीत आहे. 23 परंतु निर्माण केलेले जगच नव्हे तर आपणांस ज्यांना आत्म्याचे प्रथम फळही मिळाले आहे ते, आपणही संपूर्ण दत्तकपणासाठी आपल्या शरीराच्या नाशवंत, मर्त्य स्वभावापासून मुक्ती व्हावी म्हणून आतल्याआत कण्हत आहोत. 24 आपण आपल्या मनातील या आशेने तारले गेलो आहोत. परंतु आपण ज्याची आशा धरली ते पाहू शकलो तर ही आशा नसेल. कारण जे पाहतो त्याची आशा कोण धरील? 25 परंतु जर आपण जे पाहत नाही त्याची आशा धरतो तर आपण धीराने त्याची वाट पाहतो.
2006 by World Bible Translation Center