Revised Common Lectionary (Semicontinuous)
3 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी माझा दूत पाठवीत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करील. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभु त्याच्या मंदिरात येईल तुम्हांला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे तो खरोखरीच येत आहे.”
2 “त्यावेळेची तयारी कोणीही करु शकत नाही. तो येताच, कोणीही त्याच्यासमोर उभा राहू शकणार नाही. तो धगधगत्या अग्नीसारखा असेल. वस्तू अगदी स्वच्छ व्हाव्या म्हणून वापरण्यात येणाऱ्या तीव्र साबणासारखा असेल. 3 तो लेवीच्या लोकांना स्वच्छ करील. विस्तवात चांदी ज्याप्रमाणे शुध्द केली जाते. तसा तो त्यांना शुध्द करील. तो त्यांना चांदी सोन्याप्रमाणे शुध्द करील. मग ते परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी आणतील आणि सर्व गोष्टी योग्यरीतीने करतील. 4 मग यरुशलेम व यहुदा यांच्याकडून परमेश्वर भेटी स्वीकारील. हे सर्व अगदी पूर्वीसारखे असेल प्राचीन काळासारखेच हे असेल.
68 “प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो,
कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास,
व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.
69 त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून
आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
70 देव म्हणाला की, मी असे करीन
त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.
71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात
त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.
72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे.
व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
73 हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
74 ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की,
आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.
75 त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.
76 “मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील.
प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
77 कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल
हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.
78 “कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे
स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
79 आणि शांतीच्या मार्गावर आमच्या
पावलांना मार्गदर्शन करील.”
पौलाची प्रार्थना
3 प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमची आठवण करतो, तेव्हा देवाचे आभार मानतो. 4 नेहमीच तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेच्यावेळी मी आनंदाने प्रार्थना करतो. 5 कारण अगदी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत सुवार्तेच्या कामात तुमचा सहभाग आहे. 6 मला याची खात्री आहे की, ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरु केले आहे, तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणीला.
7 तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य वाटते कारण तुम्ही माझ्या हृदयात आहात. आणि मी तुरुंगात असतानाच केवळ नव्हे तर जेव्हा मी सुवार्तेचे सत्य ठासून सिद्ध करीत होतो, तेव्हा ही देवाने जी कृपा मला दिली आहे त्यात तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वाटेकरी होता. 8 देव माझा साक्षी आहे, कारण ख्रिस्त येशूने जे प्रेम दाखविले त्यामुळे तुम्हां सर्वांसाठी मी अधीर झालो होतो.
9 आणि माझी हीच प्रार्थना आहे:
की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल. 10 मी अशी प्रार्थना करतो की, तुमच्याठायी हे गुण असावेत, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष ते तुम्ही निवडावे, आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, 11 आणि देवाच्या गौरवासाठी, स्तुति साठी आणि नीतिमत्त्वाचे फळ देण्यासाठी भरुन जावे.
योहानाचा संदेश(A)
3 तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी,
जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता,
आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना,
आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता,
व लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
2 हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले. 3 तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात गेला, व लोकांना त्यांच्या पापांपासून क्षमा मिळण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी घोषणा करीत फिरला. 4 हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले:
“वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला,
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
त्याचे रस्ते सरळ करा.
5 प्रत्येक दरी भरुन येईल,
आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल
वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील
ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
6 आणि सर्व लोक देवाचे तारण पाहतील!’” (B)
2006 by World Bible Translation Center