Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र तो यहुदाच्या रानात होता त्या वेळचे
63 देवा, तू माझा देव आहेस
आणि तू मला खूप हवा आहेस.
माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क,
बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले.
मी तुझी शक्ती आणि तुझे गौरव पाहिले.
3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे.
माझे ओठ तुझी स्तुती करतात.
4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन
तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन,
आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल,
मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
7 तू मला खरोखरच मदत केली आहेस.
तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो
आणि तू माझा हात धरतोस.
9 काही लोक मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु त्यांचा नाश होईल.
ते खाली त्यांच्या थडग्यात जातील.
10 त्यांना तलवारीने मारले जाईल.
रानटी कुत्री त्यांची प्रेते खातील.
11 परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल
आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का?
कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.
15 नबाटचा मुलगा यराबाम याने बांधलेली बेथेलमधली वेदी आणि उच्चस्थानेही योशीयाने उध्वस्त केली. या यराबामने इस्राएलला पाप करायला लावले होते. योशीयाने त्या बांधकामांची मोडतोड करुन त्याची अगदी माती केली. अशेरा स्तंभही त्याने जाळून टाकला. 16 योशीयाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यांतील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेष्ट्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्या प्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेष्ट्याने हे सांगितले होते.
पुन्हा पाहिले तेव्हा योशीयाला संदेष्ट्याची कबर दिसली.
17 योशीयाने विचारले, “हे थडगे कोणाचे?”
तेव्हा गावातील लोकांनी त्याला सांगितले, “हे यहूदातून आलेल्या संदेष्ट्याचे थडगे. तू बेथेलच्या वेदीची जी दशा करुन टाकलीस त्याबद्दल त्याने फार पूर्वीच भाकित केले होते.”
18 तेव्हा योशीया म्हणाला, “या थडग्याला धक्का लावू नका तेथील अस्थी हलवू नका.”
19 शोमरोनच्या नगरामधील उच्चस्थानांवरील सर्व दैवतेही योशीयाने उद्ध्वस्त केली. ही दैवते इस्राएलच्या राजांनी बांधली होती आणि त्या मुळे परमेश्वराचा कोप झाला होता. बेथेलमधील वेदीप्रमाणेच योशीयाने ह्या दैवतांची गत करुन टाकली.
20 शोमरोन मधील उच्चस्थानांच्या सर्व याजकांना योशीयाने ठार केले. त्या वेदीवरच त्याने त्यांना मारले. वेदीवर माणसांची हाडे जाळली. अशाप्रकारे सर्व पूजास्थळांची मोडतोड करुन मग तो यरुशलेमला परतला.
यहूदाचे लोक वल्हांडण साजरे करतात
21 राजा योशीयाने सर्व लोकांना आज्ञा केली, “ करारात लिहिले आहे त्या पध्दतीने तुमच्या परमेश्वर देवासाठी वल्हांडण सण साजरा करा.”
22 इस्राएलवर न्यायाधीश राज्य करत होते तेव्हापासून लोकांनी वल्हांडण सण अशा पध्दतीने साजरा केला नव्हता. यहूदाच्या किंवा इस्राएलच्या कोणत्याही राजाने त्यानिमित्त उत्सव केला नव्हता. 23 योशीयाचे राजा म्हणून अठरावे वर्ष चालू असताना लोकांनी परमेश्वरासाठी हा सण साजरा केला.
24 यहूदा आणि यरुशलेममध्ये लोक पुजत असलेल्या मांत्रिक (भूतसंचारी) चेटकी, गृहदेवता आणि अनेक अमंगळ गोष्टींचा नाश योशीयाने केला. परमेश्वराच्या मंदिरात याजक हिल्कीयाला जे नियमशास्त्राचे पुस्तक सापडले त्या बरहुकूम योशीयाने हे केले.
25 योशीयासारखा राजा यापूर्वी झाला नव्हता. योशीया पूर्णपणे परमेश्वराचा उपासक बनला मोशेच्या कराराचे पालन योशीयाइतक्या काटेकोरपणे कुठल्याच राजाने केले नव्हते. आणि त्यानंतरही तसा राजा झाला नाही.
दोन साक्षीदार
11 मग मला मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येण्यासारखी काठी देण्यात आली. आणि मला सांगण्यात आले, “जा आणि देवाचे मंदिर, वेदी व तेथील उपासकांचे मोजमाप कर. 2 पण बाहेरचे अंगण सोडून दे. त्याचे मोजमाप करु नको. कारण ते विदेशी लोकांना दिलेले आहे. ते बेचाळीस महिने पवित्र शहर तुडवितील. 3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना सामर्थ्य देईन. ते देवाचा संदेश 1,260 दिवस देतील. ते तागाची वस्त्रे [a] घालतील.”
4 हे दोन साक्षीदार म्हणजे दोन जैतुनाची झाडे आहेत. आणि पृथ्वीच्या प्रभुसमोर असणाऱ्या दीपसमया आहेत. 5 जर एखाद्या व्यक्तीने त्या साक्षीदारांना दुखविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या तोंडातून अग्नि निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करीत राहत असे. जो कोणी त्यांना इजा करण्याचा प्रयत्न करीत असे त्याला अवश्य मरावे लागे. 6 या साक्षीदारांना ते संदेश देत असताना पाऊस पडला तर तो थांबविण्याचे सामर्थ्य आहे. त्या साक्षीदारांना पाण्याचे रक्त करण्याचे सामर्थ्य आहे. पृथ्वीवर प्रत्येक प्रकारचे संकट पाठविण्याचे सामर्थ्य आहे आणि त्यांना पाहिजे तितके वेळा ते हे करु शकतात.
7 आणि जेव्हा दोन साक्षीदार त्यांचा संदेश देण्याचे संपवतील तेव्हा त्या अभांग दऱ्यातून येणारा प्राणी त्यांच्याशी लढाई करील. प्राणी त्यांचा पराभव करील व, त्यांना मारुन टाकील. 8 त्या साक्षीदारांची शरीरे मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील. त्या शहरांचे नाव सदोम आणि इजिप्त असे आहे. शहरांच्या या नावांना विशेष अर्थ आहे. या शहरातच आपल्या प्रभूला वधस्तंभावर मारण्यात आले. 9 साडेतीन दिवसांपर्यंत प्रत्येक वंशाचे. जमातीचे, भाषेचे आणि राष्ट्राचे लोक त्या साक्षीदारांच्या शरीरांकडे पाहतील. पण त्यांना पुरण्यास नकार देतील. 10 पृथ्वीवर राहणारे लोक त्या दोन साक्षीदारांच्या मृत्यूने आनंद पावतील ते मेजवान्या आयोजित करतील व एकमेकांना भेटी पाठवतील. ते असे करतील कारण या दोन साक्षीदारांनी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना अतोनात क्लेश दिले होते.
11 पण साडेतीन दिवसांनंतर देवाकडील जीवनाच्या श्वासाने त्या साक्षीदारांमध्ये प्रवेश केला. आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले. ज्या सर्व लोकांनी त्यांना पाहिले ते सर्व घाबरुन गेले. 12 मग त्या दोन साक्षीदारांनी स्वर्गातून मोठा आवाज ऐकला. तो म्हणाला, “इकडे वर या!” मग ते दोन साक्षीदार ढगातून स्वर्गात गेले. त्यांच्या शत्रूंनी त्यांना वर जाताना पाहिले.
13 त्याच वेळेला मोठा भूकंप झाला. एक दंशाश शहर नष्ट झाले व भूकंपात सात हजार लोक मारले गेले. जे लोक मेले नाहीत ते खूप घाबरले होते. त्यांनी स्वर्गातील देवाला गौरव दिले.
14 दुसरे मोठे संकट संपले. तिसरे मोठे संकट लवकरच येत आहे.
2006 by World Bible Translation Center