Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
132 परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण ठेव.
2 दावीदाने परमेश्वराला वचन दिले.
दावीदाने याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले.
3 दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही.
मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही.
मी झोपणार नाही.
4 माझ्या डोळ्यांना विश्रांती घेऊ देणार नाही.
5 मी या पैकी कुठलीही गोष्टी, जो पर्यंत परमेश्वरासाठी,
याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी, घर सापडत नाही तो पर्यंत करणार नाही.”
6 आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले.
आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली.
7 आपण पवित्र तंबूत जाऊ.
या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या.
8 परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरुन
तुझ्या शक्तिमान कोशासह उठ.
9 परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत.
तुझे भक्त खूप आनंदी आहेत.
10 तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी,
निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस.
11 परमेश्वराने दावीदाला वचन दिले.
परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले.
राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
12 परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि
मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.”
13 परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला.
त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
14 परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील,
मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन.
15 मी या शहराला भरपून अन्न मिळो असा आशीर्वाद देईन.
गरीब लोकांना देखील भरपूर खायला मिळेल.
16 मी याजकांना तारणाचे वस्त्र लेववीन.
आणि माझे भक्त इथे खूप आनंदी होतील.
17 मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन.
मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन.
18 मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन
परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”
लोक नियमशास्त्र ऐकतात
23 राजा योशीया याने यहूदा आणि यरुशलेम येथील सर्व वडिलधाऱ्यांना निरोप पाठवून बोलावून घेतले. 2 मग राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याच्या मागोमाग यहूदा आणि यरुशलेम येथे राहणारे लोकही गेले. अगदी सामान्य माणसापासून याजक, संदेष्टे यांच्यासारख्या महत्वाच्या व्यक्तींपर्यंत झाडून सर्वजण राजाच्या बरोबर गेले. मग राजाने परमेश्वराच्या मंदिरात सापडलेले कराराचे पुस्तक काढून त्यातील सर्व वचने सगळ्यांना ऐकू जातील अशी वाचली.
3 स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले. पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले.
4 मग बालदैवत, अशेरा, नक्षत्रे यांच्या पूजेसाठी केलेली सर्व पात्रे परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढण्यात यावीत अशी आज्ञा राजाने हिल्कीया, इतर याजक आणि द्वारपाल यांना दिली. मग त्याने ती यरुशलेम बाहेरच्या किद्रोनच्या शेतात जाळली. त्यांची राख बेथेल येथे नेली.
5 यहूदाच्या राजांनी याजक म्हणून जी माणसे निवडली होती ती सामान्य माणसे होती, आहरोन कुळातली नव्हती! हे भोंदू याजक यहूदाच्या सर्व नगरामध्ये तसेच यरुशलेमभोवतीच्या गावांतून उंचस्थानावरील पूजास्थळांपुढे सर्रास धूप जाळत होते. बाल, सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि आकाशातील इतर तारे यांच्यासाठी ते धूप जाळत. मग हिज्कीयाने या याजकांवर बंदी घातली.
6 योशीयाने परमेश्वराच्या मंदिरातून अशेराचा स्तंभ हलवला. तो गावाबाहेर किद्रोन खोऱ्यात नेऊन जाळून टाकला. नंतर त्याने जळलेल्या भागाच्या तुकड्यांची राख केली. ती सामान्य लोकांच्या थडग्यांवर विखरुन टाकली.
7 परमेश्वराच्या मंदिरातील पुरुषवेश्यांची घरे योशीयाने उद्ध्वस्त केली. बायकाही या घरांचा वापर करत आणि अशेरा या देवतेच्या सन्मानार्थ लहान तंबू आच्छादने करत असत.
8-9 याजक या काळात यरुशलेमला यज्ञबळी आणून मंदिरातील वेदीवर वाहात नव्हते. यहूदातील वेगवेगळ्या शहरामध्ये हे याजक राहात होते. त्या त्या ठिकाणच्या उंचस्थानावरील ठिकाणी ते धूप जाळत आणि यज्ञ करत. गेबापासून बैर-शेब्यापर्यंत अशी उंचस्थाने होती. आणि हे याजक आपली बेखमीर भाकर यरुशलेममधील मंदिरात विशिष्ट ठिकाणी न खाता त्या त्या गावांमध्ये सामान्य लोकांबरोबर बसून खात. पण राजाने ही उंचस्थाने मोडली आणि याजकांना यरुशलेमला आणले. नगराधिकारी यहोशवा याच्या वेशीजवळची डावीकडील उंचस्थानेही योशीयाने उद्ध्वस्त केली.
10 हिन्नोमच्या मुलाचे खोरे या ठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बळी देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये अशातऱ्हेने भ्रष्ट करुन टाकले. 11 पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवलेले होते. नाथान-मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्य दैवतांच्या सन्मानार्थ [a] होते. योशीयाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला.
12 आहाजच्या इमारतीच्या गच्चीत पूर्वी यहूदाच्या राजांनी वेद्या बांधल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकातही मनश्शेने वेद्या बांधल्या होत्या. योशीयाने या सर्व वेद्यांची मोडतोड करुन किद्रोनच्या खोऱ्यात त्यांचे भग्निवशेष टाकून दिले.
13 यरुशलेमजवळच्या विध्वंसगिरी नावाच्या पहाडावर राजा शलमोनने काही उच्चस्थाने पूर्वी बांधली होती. पहाडाच्या ती दक्षिणेला होती.सिदोन्यांची अमंगळ दैवत अष्टोरेथ, मवाब्यांची अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांची अमंगल देवता मिलकोम यांच्यासाठीही उच्चस्थाने त्याने बांधली होती. पण ही सर्व स्थाने राजा योशीयाने भ्रष्ट केली. 14 त्याने सर्वच्या सर्व स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब यांची पार मोडतोड केली आणि त्या ठिकाणावर मृत माणसांच्या अस्थी पसरुन टाकल्या.
स्वर्गातून येणारा
31 “जो (येशू) वरुन येतो तो इतर सर्वांहून थोर आहे. जो मनुष्य या जगापासून आला आहे तो जगाचा आहे. तो जगातल्याच गोष्टीविषयी बोलतो, परंतु जो स्वर्गातून आला तो (येशू) इतर लोकांहून थोर आहे. 32 त्याने जे ऐकले व पाहिले त्याविषयी सांगतो. परंतु तो सांगातो त्या गोष्टी कोणी स्वीकारीत नाहीत. 33 तो (येशू) जे सांगतो ते मान्य करणारा माणूस, देव सत्य आहे याचा पुरावाच देतो. 34 देवाने त्याला (येशूला) पाठविले. आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो. कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो. 35 पिता पुत्रावर प्रीति करतो, पित्याने सर्व गोष्टींवरील अधिकार पुत्राला दिलेला आहे. 36 जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळते, पंरतु जो पुत्राची आज्ञा पाळीत नाही त्याला अनंतकाळचे जीवन कधीही मिळणार नाही. उलट देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”
2006 by World Bible Translation Center