Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
132 परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण ठेव.
2 दावीदाने परमेश्वराला वचन दिले.
दावीदाने याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले.
3 दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही.
मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही.
मी झोपणार नाही.
4 माझ्या डोळ्यांना विश्रांती घेऊ देणार नाही.
5 मी या पैकी कुठलीही गोष्टी, जो पर्यंत परमेश्वरासाठी,
याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी, घर सापडत नाही तो पर्यंत करणार नाही.”
6 आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले.
आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली.
7 आपण पवित्र तंबूत जाऊ.
या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या.
8 परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरुन
तुझ्या शक्तिमान कोशासह उठ.
9 परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत.
तुझे भक्त खूप आनंदी आहेत.
10 तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी,
निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस.
11 परमेश्वराने दावीदाला वचन दिले.
परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले.
राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
12 परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि
मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.”
13 परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला.
त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
14 परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील,
मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन.
15 मी या शहराला भरपून अन्न मिळो असा आशीर्वाद देईन.
गरीब लोकांना देखील भरपूर खायला मिळेल.
16 मी याजकांना तारणाचे वस्त्र लेववीन.
आणि माझे भक्त इथे खूप आनंदी होतील.
17 मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन.
मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन.
18 मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन
परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”
योशीयाचे यहूदावर राज्य
22 योशीया राज्य करु लागला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकथमधील अदाया याची मुलगी. 2 योशोयाचे वर्तन परमेश्वराला पटेल असेच होते. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले.
मंदिराच्या दुरुस्तीचा आदेश
3 मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस याला योशीया राजाने आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले. मंदिराच्या दुरुस्तीचा आदेश, 4 “तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे. 5 परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखेरख करणाऱ्यांना याजकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा. 6 सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत. 7 दिलेल्या पैशाचा हिशेब मागू नये कारण ही मंडळी विश्वसनीय आहे.”
मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक
8 महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले.
9 शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, “तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसा एकत्र करुन तो परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे.” 10 पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले.
स्तेफनाचा वध होतो
54 यहूदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताला ऐकले व त्यांना फार राग आला, ते त्याच्याविरुद्ध दातओठ खाऊ लागले. 55 परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. 56 तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे!”
57 स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहूदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हातांनी झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले. 58 त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. 59 ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, “हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर!” 60 नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, “प्रभु, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको!” असे बोलून त्याने प्राण सोडला.
विश्वासणाऱ्यांवर संकट
8 स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरु झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहूदा व शोमरोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले.
2006 by World Bible Translation Center