Revised Common Lectionary (Semicontinuous)
हन्नाचे धन्यवाद
2 हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले;
“परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही.
त्याच्यामुळे मला सामर्थ्य आले [a]
माझ्या शत्रुंना मी हसते. [b]
माझ्या विजयाचा मला आनंद आहे!
2 परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही.
देवा, तुझ्यावाचून कोणी नाही.
आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.
3 लोकहो, बढाया मारु नका.
गर्वाने बोलू नका.
कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे.
तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
4 शूरांची धनुष्यं भंगतात
आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
5 पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते
त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे.
आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते
ते आता आराम करत आहेत.
आजपर्यंत नि:संतान होती
तिला आता सात मुलं आहेत.
पण मुलबाळ असलेली दु:खी आहे.
कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.
6 परमेश्वर लोकांना मरण देतो
आणि परमेश्वरच त्यांना जीवन देतो.
तोच अधोलोकाला नेतो
आणि वरही आणतो.
7 परमेश्वरच काहीना दरिद्री तर
काहींना श्रीमंत करतो.
काही लोकांना लाचार करतो
तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
8 गरीबांना धुळीतून उचलून
त्यांचे दु:ख हरण [c] त्यांचा गौरव करुन
त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो,
मानाचे स्थान देतो.
जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली.
सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे. [d]
9 सज्जनांना तो आधार देतो.
त्यांना लटपटू देत नाही.
पण दुर्जनांचा संहार करतो.
त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ
अशा वेळी कुचकामी ठरते.
10 शत्रूंचा तो नाश करुन
त्याच्यावर गर्जेल.
दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील.
राजाला सामर्थ्य देईल.
आपल्या खास राजाला बलवान करील.”
21 एलकाना त्या वर्षी यज्ञ करण्यासाठी आणि देवाला बोललेले नवस फेडण्यासाठी शिलो येथे सहकुटुंब गेला 22 हन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोहला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला वाहीन. तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”
23 हन्नाचा पती एलकाना त्यावर म्हणाला, “तुला योग्य वाटेल तसे कर. तो खायला लागेपर्यंत तू हवी तर घरीच राहा. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद खरा ठरो.” तेव्हा हन्ना घरीच राहिली कारण शमुवेल अंगावर पीत होता. त्याचे दूध तुटेपर्यंत ती राहिली.
हन्ना शमुवेलला घेऊन सिलो येथे एलीकडे जाते
24 तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलोहे येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने तीन वर्षाचा एक गोऱ्हा वीस पौंड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हे ही आणले.
25 ते सर्व परमेश्वरासमोर गेले. एलकानाने नेहमी प्रमाणे परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा बळी दिला. [a] मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले. 26 ती एलीला म्हणाली “महाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू द्या मी खरे तेच सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूर्वी परमेश्वराजवळ याचना केली होती. 27 परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला. 28 आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.”
हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवले [b] आणि परमेश्वराची भक्ती केली.
तू लक्षात ठेवाव्यास अशा काही गोष्टी
11 पण देवाच्या माणासा, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्याचीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रेम, सहनशीलता, आणि लीनता यासाठी जोराचा प्रयत्न कर. 12 विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत टिकून राहा. ज्यासाठी तुला बोलाविले होते. त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस 13 जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो. 14 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या समयापर्यत निष्कलंक आणि दोषरहित राहावे म्हणून ही आज्ञा पाळ. 15 जो धन्य, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु ह्या धन्यवादिताच्या निर्णयानुसार, योग्य समय आल्यावर हे घडवून आणील. 16 ज्या एकालाच अमरत्व आहे, ज्यापर्यंत पोहोंचता येणार नाही अशा प्रकाशात राहतो. ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही, त्याला सन्मान आणि अनंतकाळचे सामर्थ्य असो.
17 या युगातील श्रीमंतांस आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी. 18 चांगले करण्याची त्यांना आज्ञा कर. चांगल्या कृत्यात धनवान आणि उदार असावे. व स्वतःजवळ जे आहे त्यात इतरांबरोबर सहभागी होण्याची इच्छा असावी. 19 असे करण्याने ते स्वतःसाठी स्वर्गीय धनाचा साठा करतील जो भावी काळासाठी भक्कम पाया असे होईल त्यामुळे त्यांना खऱ्या जीवनाचा ताबा मिळेल.
20 तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “ज्ञान” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी विश्वासापासून दूर जा. 21 ज्यांनी हा दावा केला ते या “विद्येमुळे” विश्वासाच्या खुणेपासून ढळले आहेत.
देवाची कृपा तुम्हांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center