Revised Common Lectionary (Semicontinuous)
113 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा.
परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.
2 परमेश्वराचे नाव आता आणि
सदैव धन्य व्हावे असे मला वाटते.
3 पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत
परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.
4 परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे.
त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.
5 कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही.
देव स्वर्गात उंच बसतो.
6 देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश
आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.
7 देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो.
देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो.
8 आणि देव त्या लोकांना महत्व देतो.
देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.
9 स्त्रीला मूल होत नसेल तर देव तिला मुले देईल
आणि तिला आनंदी करेल.
परमेश्वराची स्तुती करा.
28 नंतर रिबका धावत घरी गेली व तिने या सर्व गोष्टी आपल्या आईस व घरच्या सर्वांस सांगितल्या; 29-30 रिबकेला लाबान नावाचा भाऊ होता; सेवक तिच्याशी ज्या गोष्टी बोलला त्या तिने त्याला सांगितल्या; या सगळ्या तो शांतपणे ऐकत होत; आणि जेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या बोटातील सोन्याची आंगठी, व हातातील सोन्याच्या बांगड्या पाहिल्या तेव्हा तो घरातून निघून पळत विहिरीकडे गेला; तेव्हा उंटा जवळ उभा असलेला तो सेवक त्याला विहिरीपाशी दिसला. 31 लाबान त्याला म्हणाला, “स्वामी येथे बाहेर याप्रमाणे उभे राहाण्याची गरज नाही; परमेश्वराचे आशीर्वादित स्वामी, आम्ही तुमचे स्वागत करतो, तुम्ही सर्व आमच्या घरी या. मी तुमच्या मुक्कामासाठी खोली तयार करुन ठेवली आहे; तसेच तुमच्या उंटांसाठी ही जागा केली आहे.”
32 तेव्हा अब्राहामाचा सेवक त्याच्या घरी गेला; लाबानाने उटांना सोडवीण्यास त्याला मदत केली आणि गवत व पेंढा दिले; 33 आणि त्याच्या पुढे जेवण वाढले; परंतु अब्राहामाच्या सेवकाने जेवण घेण्याचे नाकारले; तो म्हणाला, “मी येथे येण्याचे कारण तुम्हाला सांगितल्याशिवाय जेवणार नाही.”
तेव्हा लाबान म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही येथे कशासाठी आला ते आम्हाला सांगा.”
रिबकेसाठी सौदा
34 तो सेवक म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे; 35 परमेश्वराने माझ्या स्वामीला सर्व बाबतीत आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण केले आहे. माझा स्वामी आता एक थोर माणूस झाला आहे; परमेश्वराने त्याला मेंढरांचे कळप, गुराढोरांची खिल्लारे तसेच खूप सोने. चांदी, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत. 36 सारा, ही माझ्या स्वामीची पत्नी, स्वामीने त्याची सगळी मालमत्ता आपल्या मुलास दिली आहे. 37 माझ्या स्वामीने सक्तीने माझ्याकडून वचन घेतले; तो म्हणाला, ‘आपण या कनान देशात राहतो खरे, परंतु माझ्या मुलासाठी येथील कनानी मुलीतून कोणतीच मुलगी बायको करुन देऊ नकोस; 38 माझ्या स्वामीने मला शपथ घ्यावयास लावले व सांगितले, तू माझ्या बापाच्या देशात माझ्या आप्ता कडे, गणगोताकडे जा व तेथून माझ्या मुलाकरिता तू नवरी शोधून आण.’ 39 मी माझ्या स्वामीला म्हणालो, ‘यदा कदाचित तर नवरी मुलगा माझ्याबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर?’ 40 परंतु स्वामी, म्हणाले, ‘ज्या परमेश्वराची मी सेवा करतो तो त्याच्या दूताला तुझ्याबरोबर पाठवील व तो तुला मदत करील आणि तेथील माझ्या आप्तांतून तू माझ्या मुलाकरिता नवरी आणशील; 41 परंतु माझ्या बापाच्या देशात त्याच्या घरी तू जाशील आणि ते माझ्या मुलाकरीता नवरी मुलगी द्यावयाचे नाकारतील तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’
42 “आज मी या विहिरीपाशी आलो आणि परमेश्वराला प्रार्थना केली, ‘हे माझ्या स्वामीच्या अब्राहामच्या परमेश्वरा, ही माझ्या प्रवासाची फेरी सफळ कर;
येशू आपल्या गावी जातो(A)
16 मग तो नासरेथला गेला. जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बाथ दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला, तो वाचण्यासाठी उभा राहिला, 17 आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे:
18 “प्रभूचा आत्मा मजवर आहे,
कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी
बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी,
आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी,
जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी
19 आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे.” (B)
20 मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता. 21 त्यांने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली: “तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले.”
22 तेव्हा प्रत्येकाने त्याच्याविषयी चांगले उद्गार काढले. आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले. आणि ते म्हणाले, “हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?”
23 तो त्यांना म्हणाला, “अर्थात, तुम्ही मला ही म्हण लागू कराल; ‘वैद्या, स्वतःला बरे कर.’ ‘कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.’” मग तो म्हणाला, 24 “मी तुम्हांला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारला जात नाही.
25 “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षेपर्यंत पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता 26 तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्याला सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
27 “अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
28 जेव्हा सभास्थानातील लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते फार रागावले. 29 ते लोक उठले आणि त्यांनी त्याला (येशूला) शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या टेकडीच्या कड्याकडे त्याला ढकलून देण्यासाठी घेऊन गेले. 30 परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
2006 by World Bible Translation Center