Revised Common Lectionary (Semicontinuous)
धान्याचे खळे
3 काही दिवसांनी रूथची सासू नामी रूथला म्हणाली, “मुली, आता मला तुझ्यासाठी नवरा आणि चांगले घर शोधून काढायला हवें. त्यातच तुझे भले आहे. 2 बवाज त्यासाठी योग्य आहे तो आपला जवळचा आप्तच [a] आहे. त्याच्याकडच्या कामकरी बायकांबरोबर तू काम केले आहेस. आज रात्री तो खळ्यात मळणीसाठी मुक्कामाला असेल. 3 त न्हाऊन माखून तयार हो. चांगले ठेवणीतले कपडे घाल आणि रात्री खव्व्यावर जा. बवाजचे जेवणखाण होईपर्यंत त्याच्या नजरेला पडू नको. 4 जेवण झाल्यावर तो विश्रांती घ्यायला आडवा होईल. लक्ष असू दे म्हणजे तो कुठे आहे ते तुला कळेल. तेव्हा तू पुढे हो आणि त्याच्या पायावरचे पांधरूण काढून [b] तिथेच त्याच्याजवळ पड लगेच काय करायचे ते तोच मग तुला सांगेल.”
5 तेव्हा रूथने सासूच्या म्हणण्याप्रमाणे वागायचे कबूल केले.
13 त्यानंतर बवाजने रूथशी लग्न केले. तिला परमेश्वराच्या दयेने दिवस राहून मुलगा झाला. 14 गावातील बायका नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा. [a] दिला तो इस्राएलमध्ये किर्तिवंत होईल. 15 तुमचे तो पुनरूज्जीवन करेल वृध्दापकाळी तो तुमची काळजी घेईल तुझ्या सुनेमुळे हे झाले तिने तुला हा मुलगा दिला तिचे तुझ्यावर प्रेम आहे. सात मुलांपेक्षाही तिची थोरवी आधिक आहे.
16 नामीने बाळाला घेतले, आपल्या कुशीत घेतले. त्याचे संगोपन केले. 17 शेजाऱ्यांनी त्याचे नाव ठेवले. बायका म्हणाल्या, “नामीलाच हा मुलगा झाला आहे.” मग शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. ओबेद इशायचा पिता झाला. इशाय राजा दावीदचा पिता झाला.
शलमोनाचे वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
127 जर परमेश्वर घर बांधीत नसेल
तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत.
जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल
तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
2 भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि
रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
देव ज्या लोकांवर प्रेम करतो
त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
3 मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत.
आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
4 तरुण माणसाची मुले सैनिकाच्या
भात्यातील बाणांसारखी आहेत.
5 जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणी [a] त्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.
24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.
25 जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही. 26 तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे.
27 आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते, 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
येशू नियमशास्त्राच्या बोधकांचा टीका करतो(A)
38 शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. 39 आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. 40 ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांना फार कडक शिक्षा होईल.”
विधवा दान देण्याचा अर्थ दाखविते(B)
41 येशू दानपेटीच्या समोर बसला असता लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता. आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. 42 नंतर एक गरीब विधवा आली. तिने तांब्याची दोन लहान नाणी टाकली, ज्याची किंमत शंभरातील एका पैशाएवढी होती.
43 येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. 44 मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”
2006 by World Bible Translation Center