Revised Common Lectionary (Semicontinuous)
यहूदामध्ये दुष्काळ
1 फारपूर्वी शास्त्यांच्या अमदानीत एकदा दुष्काळ पडला आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. तेव्हा अलीमलेख नावाचा गृहस्थ आपली बायको आणि दोन मुले यांच्यासह यहूदा बेथलेहेम सोडून मवाब या डोंगराळ प्रांतात राहायला आला. 2 त्याच्या बायकोचे नाव नामी आणि मुलांची नावे महलोन आणि खिल्योन अशी होती. हे लोक बेथलेहेम यहूदातील एफ्राथा कुळातील होते. मवाबात येऊन ते राहू लागले.
3 पुढे अलीमलेख वारला आणि त्याची बायको नामी व दोन मुले मागे राहिली. 4 नामीच्या मुलांनी मवाबातील दोन मुलींशी लग्ने केली. एकाच्या बायकोचे नाव होते अर्पा आणि दुसरीचे नाव रूथ. जवळपास दहा वर्ष ते तिथे राहिले. 5 आणि महलोन व खिल्योन दोघेही मरण पावले.नामी तिचा नवरा आणि मुलं यांच्यावाचून एकटीच राहिली.
नामी स्वगृही परततात
6 यहूदात आता दुष्काळ राहिलेला नाही परमेश्वर आपल्या लोकांच्या मदतीला धावून आला आहे, आणि त्याने त्यांना अन्न पुरवलेले आहे असे मवाबात नामीच्या कानालर आले. तेव्हा तिने घरी परत जायचे ठरवले तिच्या सुनाही तिच्याबरोबर जायला तयार झाल्या. 7 तेव्हा त्या ज्या ठिकाणी राहात होत्या ते ठिकाण सोडून त्या यहूदाला परत जायला निघाल्या.
8 तेव्हा नामीने आपल्या सुनांना सांगितले, “तुम्ही आपल्या माहेरी परत जा. मला आणि माझ्या मुलांना तुम्ही प्रेम दिलेत. तुम्ही जशा आमच्याशी दयाळू आणि प्रेमळ राहिलात तसाच परमेश्वर ही तुमच्याशी राहो. 9 परमेश्वर कृपेने तुम्हाला नवरा, सुखाचे घरदार मिळो” एवढे म्हणून नामीने त्यांचे चुंबन घेतले आणि तिघींना रडू कोसळले.
10 “आम्हाला तुमच्याबरोबर आणि तुमच्याच लोकात यायचे आहे” असे त्या दोघी नामीला म्हणू लागल्या.
11 पण नामी त्यांना म्हणाली, “नाही मुलींनो तुम्ही आपापल्या घरी जा. माझ्याबरोबर येऊन तरी काय फायदा? मी ही अशी. माझ्या पोटी आणखी मुलगे नाहीत.नाहीतर तुम्ही त्यांच्याशी लग्न केले असते. 12 तेव्हा तुम्ही परत गेलेले बरे. पुन्हा लग्न करायचेही माझे वय राहिले नाही आणि अजून माझे लग्न झाले तरी त्याचा तुम्हाला काय उपयोग? मला अगदी या घटकेला दिवस राहून दोन मुले झाली तरी काय फायदा? 13 ते वाढून लग्नाचे होई पर्यंत तुम्हाला थांबावे लागेल. पतिप्राप्तीसाठी मी तुम्हाला एवढे थांबवून ठेवू शकत नाही. माझ्या मनाला त्यामुळे फार यातना होतील. आधीच मी खूप सोसले आहे. परमेश्वराने माझी खूप परीक्षा पाहिली आहे.”
14 पुन्हा एकदा त्यांना रडू फुटले, मग अर्पाने चुंबन घेऊन नामीचा निरोप घेतला. पण रूथ मात्र तिला बिलगली.
15 नामी तिला म्हणाली, “तुझी जाऊ बघ कशी आपल्या लोकांत, आपल्या देवाकडे गेली, तूही तसेच केले पाहिजेस.”
16 पण रूथ हटून बसली आणि म्हणाली, “तुम्हाला सोडून जायची माझ्यावर जबरदस्ती करू नका. मला माहेरी जायला लावू नका.मी तुमच्याबरोबर येईन. जिथे तुम्ही जाल तिथे मी येईन. जिथे तुम्ही पथारी टाकाल तिथेच मीही पडेन. तुमचे लोक ते माझे लोक. तुमचा देव तो माझा देव. 17 तुम्ही जिथे मराल, तिथेच मी ही मरेन. जिथे तुम्हाला तिथेच मला पुरावे. हा शब्द मी पाळला नाही तर परमेश्वराने मला खुशाल शिक्षा करावी. आता आपली ताटातूट फक्त मरणानेच.” [a]
घरी परततात
18 रूथचा आपल्या बरोबरच यायचा निर्धार आहे हे पाहिल्यावर नामीने तिचे मन वळवायचा प्रयत्न सोडून दिला.
146 परमेश्वराची स्तुती करा.
माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
2 मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन.
मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
3 तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका.
लोकांवर विश्वास टाकू नका.
का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
4 लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते
आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
5 पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात.
ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या.
परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
7 जे लोक दु:खी कष्टी आहेत.
त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो.
तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
8 परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो.
संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो.
परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
9 परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो.
परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10 परमेश्वर सदैव राज्य करील
सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील
परमेश्वराची स्तुती करा.
नव्या करारामप्रमणे उपासना
11 पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा मुख्य याजक म्हणून आला आहे. तो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता अशा महान तसेच सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा मंडपामध्ये, या निर्मितीमधील, 12 बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वतःच एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे तारण मिळवून दिले.
13 कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख त्यांच्यावर शिंपडले तर त्याची अपवित्र शरीरे शुद्ध होतात, 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सदाजीवी आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे डागविरहित आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धि शुद्ध करील. आशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती?(A)
28 त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घालताना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञांत महत्त्वाची पाहिली आज्ञा कोणती?”
29 येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्त्राएला, ऐक, आपला प्रभु देव अनन्य आहे. 30 तू आपला देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर.’ [a] 31 दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’ [b] यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
32 तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी, आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते योग्य बोललात. 33 त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण समजुतीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”
34 येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” त्यांनतर त्याला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
2006 by World Bible Translation Center