Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
28 परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे.
माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस.
तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस
तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल.
2 परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्या पवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो.
मी तुला साद घालीन त्यावेळी
माझे ऐक माझ्यावर दया दाखव.
3 परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या
दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही.
ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती” या शब्दाने अभिवादन करतात.
परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात.
4 परमेश्वरा, ते लोक दुसऱ्यांचे वाईट करतात
म्हणून त्यांचे वाईट होऊ दे.
त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा कर.
5 वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत.
नाही, त्यांना ते कळू शकत नाही.
ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात.
6 परमेश्वराची स्तुती कर.
त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.
7 परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली.
मी खूप आनंदी आहे
आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
8 परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो.
परमेश्वर त्याला वाचवतो.
परमेश्वर त्याची शक्ती आहे.
9 देवा, तुझ्या लोकांना वाचव
जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे.
त्यांना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
12 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, 13 “मानवपुत्रा, माझा त्याग करणाऱ्या आणि पाप करणाऱ्या राष्ट्रांला मग ते राष्ट्र कोणतेही असो मी शिक्षा करीन. त्यांचा अन्न पुरवठा मी बंद करीन. मी कदाचित् देशात दुष्काळ पाडीन व लोक व प्राणी यांना देशातून बाहेर काढीन. 14 नोहा, दानीएल व इयोब हे तिथले असले, आणि तरीसुध्दा मी त्या देशाला शिक्षा करीन. आपल्या चांगुलपणाने फारतर ते स्वतःचा जीव वाचवू शकत असले तरी त्या देशाला वाचवू शकत नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
15 देव म्हणाला, “अथवा, कदाचित् मी हिंस्र प्राणी त्या देशात सोडीन आणि ते सर्व लोकांना ठार मारतील. त्या हिंस्र प्राण्यांमुळे कोणीही त्या देशामधून प्रवास करणार नाही. 16 जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहात असते, तर मी त्यांचे रक्षण केले असते. ते तिघे स्वतः चे प्राण वाचवू शकले असते. पण माझ्या प्राणाची शपथ घेऊन मी प्रतिज्ञा करतो ते इतरांचे प्राण वाचवू शकले नसते. त्यांच्या मुला-मुलींनाही ते वाचवू शकले नसते. पापी देशाचा नाश केला जाईल.” परमेश्वर माझा प्रभू, हे म्हणाला.
17 देव म्हणाला, “किंवा मी कदाचित् त्या देशावर चढाई करण्यासाठी शत्रूसैन्य पाठवीन. ते सैनिक त्या देशाचा नाश करतील. मी तेथील सर्व माणसांना व प्राण्यांना देशाबाहेर हालवीन. 18 जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहत असते, तर मी त्या तिघा सज्जानांना वाचविले असते. ते स्वतःचा प्राण वाचवू शकले असते पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतरांना म्हणजेच त्यांच्या मुलामुलींनासुध्दा वाचवू शकले नसते. त्या पापी देशाचा नाश केला जाईल” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
19 देव म्हणाला, “वा मी त्या देशात कदाचित् रोगराई पसरवीन. मी माझ्या क्रोधाचा त्यांच्यावर वर्षाव करीन. मी त्या देशातील सर्व लोकांचा व प्राण्यांचा मुक्काम तेथून हालवीन. 20 तेथे जर नोहा, दानीएल व इयोब राहात असते, तर ते सज्जन असल्यामुळे मी त्यांना वाचविले असते. ते तिघे स्वतःचे प्राण वाचवू शकले असते. पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतराना म्हणजे त्यांच्या मुलामुलींना सुद्धा वाचवू शकले नसते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
21 मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “यरुशलेमाची स्थिती किती वाईट होणार त्याचा विचार कर. शत्रू सैनिक, उपासमार, रोगराई आणि हिंस्र प्राणी या चारही शिक्षा मी त्यांना करीन. त्या देशातील सर्व माणसांना व प्राण्यांचा मी नाश करीन. 22 काही लोक त्या देशातून निसटतील, ते आपल्या मुलांमुलीना घेऊन, मदतीसाठी तुझ्याकडे येतील. मग ते लोक खरोखर किती वाईट आहेत, हे तुला कळेल आणि यरुशलेमवर मी आणलेली सर्व संकटे पाहून तुला बरेच वाटेल. 23 ते कसे जगतात आणि कोणत्या वाईट गोष्टी करतात हे तू पाहिल्यावर, त्यांना शिक्षा करण्यास सबळ कारण आहे, हे तुला पटेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
येशू दोन आंधळ्यांना बरे करतो(A)
29 ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. 30 रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभु येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.”
31 जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.”
32 मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
33 त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभु, आम्हांला दिसावे अशी आमची इच्छा आहे.”
34 येशूला त्यांच्याबद्दल कळवळा आला, आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले. आणि ते त्याच्या मागे गेले.
2006 by World Bible Translation Center