Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 34:1-8

दावीदाचे स्तोत्र दावीद अबिमलेखापुढे वेड्यासारखा वागला तेव्हा त्याने दावीदाला हाकलून दिले. अशा रीतीने दावीद त्याला सोडून गेला

34 मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन.
    माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा
    माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो.
देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला.
    आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या.
मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले.
    मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.
देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल
    लाज वाटून घेऊ नका.
या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली
    आणि परमेश्वराने माझे ऐकले.
    त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो.
    परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे
    ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल.

स्तोत्रसंहिता 34:19-22

19 चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील.
    परंतु परमेश्वर त्यांना त्यांच्या प्रत्येक संकटातून वाचवतो.
20 परमेश्वर त्यांच्या सर्व हाडांचे रक्षण करेल.
    त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.
21 परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या
    माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.
22 परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो.
    ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.

नहेम्या 1

नहेम्याची प्रार्थना

नहेम्या हा हखल्याचा मुलगा. त्याची ही वचने: किसलेव महिन्यात मी, नहेम्या, शूरान या राजधानीत होतो. राजा अर्तहशश्तच्या कारदीर्चीचे तेव्हा विसावे वर्ष होते. मी शूशन येथे असताना माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहुदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे राहणाऱ्या यहुद्यांची चौकशी केली. हे युहदी म्हणजे बंदिवासातून सुटून अजून यहुदातच राहणारे लोक होते. यरुशलेम नगराचीही खुशाली मी त्यांना विचारली.

हनानी आणि त्याच्या बरोबरचे लोक म्हणाले, “नहेम्या, बंदिवासातून सुटून यहुदात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत. त्यांच्यापुढे बऱ्याच अडचणी असून त्यांची अप्रतिष्ठा चालली आहे. कारण यरुशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे. तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”

यरुशलेमच्या लोकांची आणि नगराच्या तटबंदीची ही हकीकत ऐकून मी अत्यंत उद्विग्न झालो. मी खाली बसलो व रडू लागलो. मला अतिशय दु:ख झाले. कित्येक दिवस मी उपवास केला आणि स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. मी पुढीलप्रमाणे प्रार्थना केली:

“हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू मोठा सर्वशक्तीमान देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांशी केलेला प्रेमाचा करार पाळणारा तू परमेश्वर आहेस.

“तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपा करून डोळे आणि कान उघडे कर व ऐक. तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलींच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएलींनी तुझ्याविरुध्द जी पापे केली त्यांची मी कबुली देत आहे. मी कबुल करतो की मी तुझ्याविरुध्द पाप केले तसेच माझ्या वडीलांच्या घराण्यातील लोकांनीही केले. आम्हा इस्राएलींची वर्तणूक तुझ्या दृष्टीने वाईट होती. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.

“आपला सेवक मोशे याला दिलेली शिकवण तू कृपया आठव. त्याला तू म्हणाला होतास, ‘तुम्ही इस्राएल लोक एकनिष्ठ राहिला नाहीत तर दुसऱ्या राष्ट्रांमध्ये मी तुम्हाला विखरुन टाकीन. पण तुम्ही माझ्याकडे परत आलात आणि माझ्या आज्ञा पाळल्यात तर मी असे करीनः आपापली घरे बळजबरीने सोडायला लागून पृथ्वीच्या अंतापर्यंत देशोधडीला लागलेल्या तुमच्यातल्या लोकांनाही मी ठिकठिकाणांहून एकत्र आणीन. माझे नाव ठेवावे म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.’

10 “इस्राएल लोक तुझे सेवक असून ते तुझे लोक आहे. तुझ्या प्रचंड सामर्थ्याने तू या लोकांना सोडवलेस. 11 तेव्हा, हे परमेश्वरा, माझी विनवणी कृपा करुन ऐक. मी तुझा सेवक आहे. तुझ्या नावाविषयी भीतियुक्त आदर दाखवण्याची इच्छा असलेल्या तुझ्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐकावीस. मी राजाचा मद्य चाखणारा सेवक [a] आहे, हे परमेश्वरा, तुला हे माहीत आहेच. तेव्हा कृपा करून आज माझ्या मदतीला ये. राजाजवळ मी मदतीची याचना करीन तेव्हा मला साहाय्य कर. मला यश दे आणि राजाची मर्जी राखण्यात मला मदत कर.”

इब्री लोकांस 7:11-22

11 लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांना नियमशास्त्र दिले गेले पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता. 12 कारण जेव्हा याजकपणात बदल होतो तेव्हा नियमशास्त्रसुद्धा बदलणे अपरिहार्य होते. 13-14 कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे. व त्याच्या (लेवीच्या) वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही. हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभु यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.

येशू हा मलकीसदेक याजकासारखा आहे

15 आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारखा येतो तेव्हा ही गोष्ट आणखी स्पष्ट होते. 16 मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने येशूला याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्याला याजक करण्यात आले. 17 कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे: “तू मलकीसदेकासारखा अनंतकाळासाठी याजक आहेस” [a]

18 जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व तिरुपयोगी होता. 19 कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता एक अधिक चांगली आशा आम्हांला देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.

20 हेसुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा त्यांना शपथेशिवाय याजक करण्यात आले. 21 पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्याला सांगितले की,

“प्रभूने शपथ वाहिली आहे,
    आणि तो आपले मत बदलणार नाही:
‘तू अनंतकाळचा याजक आहेस.’” (A)

22 याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center