Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवरचे आसाफाचे स्तोत्र
75 देवा, आम्ही तुझी स्तुती करतो.
आम्ही तुझी स्तुती करतो.
तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
2 देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली,
मी बरोबर न्याय करीन.
3 पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल
आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.”
4-5 “काही लोक गर्विष्ठ असतात.
ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते,
परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका.
एवढे गर्विष्ठ बनू नका.’”
6 या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल
अशी कोणतीही शक्ती नाही. [a]
7 देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो.
देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो.
देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
8 देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे.
परमेश्वराच्या हातात पेला आहे.
तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे.
तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.
9 मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन.
मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.
10 मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन
आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.
40 परमेश्वर ईयोबाला म्हणाला:
2 “ईयोबा, तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास.
तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस.
आता तू चुकलास हे तू कबूल करशील का?
तू मला उत्तर देशील का?”
3 मग ईयोबाने देवाला उत्तर दिले तो म्हणाला:
4 “मी अगदी नगण्य [a] आहे.
मी काय बोलू?
मी तुला उत्तर देऊ शकत नाही.
मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
5 मी एकदा बोललो होतो.
पण आता अधिक बोलणार नाही.
मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.”
6 नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबाशी बोलला. तो म्हणाला:
7 “ईयोबा, तू आता कंबर कसून [b] उभा राहा
आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.
8 “ईयोबा, मी न्यायी नाही असे तुला वाटते का?
मी काही चूक केल्याचा आरोप करुन तू स्वतःचे निरपराधित्व सिध्द करु पहात आहेस.
9 ईयोबा तुझे बाहू देवाच्या बाहूंइतके शक्तिशाली आहेत का?
देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?
10 जर तू देवासारखा असलास तर तुला स्वतःबद्दल अभिमान वाटू दे.
आणि तुला मान मिळू दे.
तू जर देवासारखा असलास तर तू मानमरातब आणि वैभव कपड्यांसारखे घालू शकतोस.
11 तू जर देवासारखा असलास तर तू तुझा राग दाखवू शकतोस आणि गर्विष्ठ लोकांना शिक्षा करु शकतोस.
गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस.
12 होय ईयोबा त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर.
वाईट लोकांना जागच्या जागी चिरडून टाक.
13 त्यांना चिखलात पुरुन टाक.
त्यांचे शरीर गुंडाळून थडग्यात टाकून दे.
14 ईयोबा, तू जर या सगळ्या गोष्टी करु शकशील तर मी सुध्दा तुझी स्तुती करीन.
आणि तु तुझ्या सामर्थ्याने स्वतःला वाचवू शकतोस हे मी मान्य करीन.
15 “ईयोबा, तू बेहेमोथ कडे बघ.
मी (देवाने) तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले.
बेहेमोथ गायीसारखे गवत खातो.
16 बेहेमोथच्या अंगात बरीच शक्ती आहे.
त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.
17 बेहेमोथची शेपटी देवदाराच्या झाडासारखी उभी राहते.
त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
18 बेहेमोथची हाडे पितळेसारखी बळकट आहेत.
त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
19 बेहेमोथ हा अतिशय आश्र्चर्यकारक प्राणी मी (देवाने) निर्माण केला आहे.
परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.
20 डोंगरावर जिथे जंगली श्र्वापदे खेळतात
तिथले गवत बेहेमोथ खातो.
21 तो कमळाच्या झाडाखाली झोपतो.
बेहेमोथ दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.
22 कमळाचे झाड बेहेमोथला आपल्या सावलीत लपवते.
तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.
23 नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही.
यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही.
24 बेहेमोथचे डोळे कुणीही बांधू शकणार नाही
आणि त्याला सापळ्यात अडकवू शकणार नाही.
6 म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण मागे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्याविषयीची [a] शिकवण, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचा न्यायनिवाडा, देवावरील विश्र्वास, आपल्या निर्जीव गतजीवनाचा पश्चाताप या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये. 3 आणि जर देवाची इच्छा असेल तर आपण पूर्ण ख्रिस्तीपणापर्यंत जाऊ.
4-6 ज्यांना स्वर्गीय दानांचा अनुभव आलेला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, त्यांना पुन्हा पश्चात्तापाकडे नेणे अशक्य आहे. तसेच देवाच्या वचनाची गोडी अनुभवली आहे, व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याचा अनुभव आहे आणि त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळविणे अशक्य आहे, कारण त्याच्या स्वतःच्या हानीकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्याला आणतात.
7 जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो. 8 पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिति असते; तिचा अग्नीने नाश होईल.
9 बंधूंजनहो, आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत, पण खरोखर आम्ही तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हांला अशी खात्री आहे की, ज्या तारणाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल. 10 कारण तुम्ही केलेली पवित्रजनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्यावर केलेले प्रेम ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही. 11 पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरिता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी. 12 आम्हांला असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचे फळ मिळवितात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.
2006 by World Bible Translation Center