Revised Common Lectionary (Semicontinuous)
देव ईयोबशी बोलतो
38 नंतर परमेश्वर वावटळींतून ईयोबाशी बोलला. तो म्हणाला:
2 “जो मूर्खासारखा बोलत आहे
तो हा अज्ञानी मनुष्य कोण आहे? [a]
3 ईयोब, स्वतःला सावर [b] आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला तयार हो.
4 “ईयोब, मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास?
तू स्वतःला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
5 तू जर एवढा चलाख असशील तर जग इतके मोठे असावे हे कुणी ठरवले ते सांग.
मोजायच्या दोरीने ते कुणी मोजले का?
6 पृथ्वीचा पाया कशावर घातला आहे?
तिची कोनशिला कुणी ठेवली?
7 जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले
आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.
34 “ईयोबा, तुला मेघावर ओरडून
त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
35 तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का?
ती तुझ्याकडे येऊन, ‘आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?’
असे म्हणेल का?
तुझ्या सांगण्याप्रमाणे ती तुला हवे तिथे जाईल का?
36 “ईयोबा, लोकांना शहाणे कोण बनवतो?
त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?
37 ईयोबा, ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे?
त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो?
38 त्यामुळे धुळीचा चिखल होतो
आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात.
39 “ईयोबा, तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का?
त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?
40 ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात.
ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात.
41 ईयोबा, डोंब कावळ्याला कोण अन्न देतो?
जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात
आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवितो?
104 माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस.
तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.
2 माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस.
तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.
3 देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस.
तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि
वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.
4 देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस
आणि तुझ्या सेवकांना अग्नीसारखे.
5 देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेने उभारलेस की
तिचा कधीही नाश होणार नाही.
6 तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस,
पाण्याने डोंगरही झाकले गेले.
7 परंतु तू आज्ञा केलीस आणि पाणी ओसरले.
देवा, तू पाण्याला दटावलेस आणि ते ओसरले.
8 पाणी डोंगरावरुन खाली दरीत वाहात गेले
आणि नंतर ते तू त्याच्यासाठी केलेल्या जागेत गेले.
9 तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि
आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.
24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वराची स्तुती कर.
5 प्रत्येक मुख्य याजकाची निवड लोकांमधून होते. आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी जी दाने व अर्पणे देवाला सादर केली जातात, त्या कामाकरिता मुख्य याजक नेमलेला असतो. 2 प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास असमर्थ असतो कारण तो स्वतः दुबळा असतो. 3 आणि त्या दुबळेपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते. 5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने मुख्य याजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला,
“तू माझा पुत्र आहेस
आज मी तुला जन्म दिला आहे.” (A)
6 दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो,
“मलकीसदेकाप्रमाणे
तू अनंतकाळासाठी याजक आहेस” (B)
7 येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात, त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. 8 जरी तो पुत्र होता, तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंतकाळच्या तारणासाठी तो उगम झाला 10 व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो प्रमुख याजक म्हणून नियुक्त झाला.
याकोब व योहान येशूला मदतीसाठी विचारतात(A)
35 याकोब व योहान हे जब्दीचे मुलगे त्याच्याकडे आले. आणि त्याला म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणांजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.”
36 येशू त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
37 ते म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा.”
38 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हांस कळत नाही. मी जो प्याला पिणार आहे, तो तुमच्याने पिणे शक्य आहे काय? किंवा मी जो बाप्तिस्मा घेणार आहे तो तुमच्याने घेणे शक्य आहे काय?”
39 ते त्याला म्हणाले, “आम्हांस शक्य आहे.”
मग येशू त्यांना म्हणाला, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा घेईन तो तुम्ही घ्याल, 40 परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. ज्यांच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत, त्यांच्यासाठीच त्या राखून ठेवल्या आहेत.”
41 दहा शिष्यांनी या विनंतिविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले. 42 येशूने त्यांना जवळ बोलाविले आणि म्हटले, “तुम्हांस माहीत आहे की, परराष्ट्रीयांची जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्यावर स्वामित्व गाजवितात आणि त्यांचे पुढारी त्यांच्यावर अधिकार गाजवितात. 43 परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. 44 आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. 45 कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे. व अनेकांसाठी आपले जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.”
2006 by World Bible Translation Center