Revised Common Lectionary (Semicontinuous)
104 माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस.
तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.
2 माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस.
तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.
3 देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस.
तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि
वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.
4 देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस
आणि तुझ्या सेवकांना अग्नीसारखे.
5 देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेने उभारलेस की
तिचा कधीही नाश होणार नाही.
6 तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस,
पाण्याने डोंगरही झाकले गेले.
7 परंतु तू आज्ञा केलीस आणि पाणी ओसरले.
देवा, तू पाण्याला दटावलेस आणि ते ओसरले.
8 पाणी डोंगरावरुन खाली दरीत वाहात गेले
आणि नंतर ते तू त्याच्यासाठी केलेल्या जागेत गेले.
9 तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि
आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.
24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वराची स्तुती कर.
37 “गडगडाट व वीजा ह्यांची मला भिती वाटते.
तेव्हा माझ्या ह्रदयाची धडधड वाढते.
2 प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो.
देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका.
3 देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो.
ती सर्व पृथ्वीभर चमकते.
4 वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो.
देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो.
वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
5 देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे.
देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
6 देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’
देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
7 देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांना तो काय करु शकतो
हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
8 पशू त्यांच्या घरकुलात जातात आणि तेथेच राहतात.
9 दक्षिणेकडून चक्रीवादळ येते.
उत्तरेकडून थंड वारे येतात.
10 देवाच्या नि:श्वासाने बर्फ होते
आणि समुद्र गोठतो.
11 देव ढगांना पाण्याने भरतो
आणि तो ते पसरवतो.
12 तो ढगांना सर्व पृथ्वीभर पसरण्याची आज्ञा करतो.
देव जी आज्ञा देतो ती ढग पाळतात.
13 देव लोकांना शिक्षा करण्यासाठी ढग आणतो,
पूर आणतो किंवा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी पाणी आणतो.
14 “ईयोबा, एक क्षणभर थांब आणि लक्ष दे.
थांब आणि देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
15 ईयोब, देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का?
तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
16 ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का?
देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याचे ढग हे केवळ एक उदाहरण आहे.
आणि देवाला त्याबद्दल सारे माहीत आहे.
17 परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत.
तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो,
तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते.
18 ईयोब, तू देवाला आकाश पसरवण्यात
आणि ते आरशाप्रमाणे करण्यात मदत करु शकशील का?
19 “ईयोब, देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग.
काय बोलावे ते आम्हाला कळत नाही कारण आम्हाला जास्त माहिती नाही.
20 मला देवाशी बोलायचे आहे असे मी म्हणणार नाही.
तसे म्हणणे म्हणजे स्वतःचा नाश करुन घेणे आहे.
21 माणूस सूर्याकडे बघू शकत नाही.
वाऱ्याने ढग पळवून लावले की तो फार तेजस्वी आणि चकचकीत दिसतो.
22 आणि देवसुध्दा तसाच आहे.
देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुन [a] चमकते.
देवाच्या भोवती तेजोवलय असते.
23 तो सर्वशक्तिमान देव महान आहे.
आपण त्याला समजू शकत नाही.
तो सामर्थ्यवान आहे परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो.
देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते.
24 म्हणूनच लोक देवाला मान देतात.
परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना मान देत नाही.”
श्र्वापदावर बसलेली तुच्छ स्त्री
17 सात वाट्या असलेल्या सात देवदूतांपैकी एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, “ये, मी तुला त्या अति नीच वेश्येला झालेली शिक्षा दाखवतो. ती बहुत जलांवर बसली आहे. 2 पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला. आणि तिच्या लैंगिक पापाच्या द्राक्षारसाने पृथ्वीवरील लोक धुंद झाले आहेत.”
3 मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले. तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्र्वापदावर बसलेले पाहिले. त्या श्र्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती. त्या श्र्वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे होती, 4 त्या स्त्रीने किरमिजी व जांभळी वस्त्रे घातली होती. तिने घातलेल्या सोने, जवाहिर व मोत्यांनी ती चमकत होती. तिच्या हातात सोन्याचा पेला होता, हा पेला वाईट गोष्टींनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता. 5 तिच्या कपाळावर नाव लिहिले होते. त्या नावाला गुपित अर्थ आहे. त्यावर असे लिहीले होते:
मोठी बाबेल वंश्यांची
व पृथ्वीवरील ओंगळ
गोष्टींची माता
6 मी पाहिले ती स्त्री रक्तसेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयी सांगितले त्याचे रक्त ती प्याली होती.
जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो. 7 मग देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्र्वापदावर बसली आहे, ज्याला सात डोकी व दहा शिंगे आहेत त्याचे रहस्य सांगतो. 8 जो श्र्वापद तू पाहिला तो (पूर्वी) होता, आता तो नाही. आणि तो तळविरहीत बोगद्यातून येईल आणि नष्ट केला जाईल. पृथ्वीवर राहणारे लोक ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात पृथ्वीच्या स्थापनेपासून लिहिलेली नाहीत ते जेव्हा श्र्वापदाला पाहतील, तेव्हा ते आश्चर्यचकित होतील कारण तो (पूर्वी) होता, आता तो नाही आणि तरी तो येईल.
9 “यासाठी शाहणपण असलेल्या बुद्धीची आवश्यकता आहे. सात डोकी या सात टेकड्या आहेत, ज्यावर ती स्त्री बसते. 10 ते सात राजेसुद्धा आहेत. त्यापैकी पाच राजे पतन पावले आहेत. एक आहे आणि एक अजून आला नाही. पण जेव्हा तो येईल तेव्हा तो फारच थोडा वेळ थांबेल. 11 जो प्राणी (पूर्वी) होता आणि जो आता नाही तो आठवा राजा आहे. आणि तो त्या सात राजांपासून आहे. आणि तो आपल्या नाशाकडे जात आहे.
12 “जी दहा शिंगे तू पाहिलीस ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही, असे दहा राजे आहेत. पण त्यांना श्र्वादाबरोबर एका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल. 13 त्यांचा एकच हेतू आहे. आणि ते त्यांची शक्ती व अधिकार श्र्वापदाला देतील. 14 ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे. आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”
15 मग देवदूत मला म्हणाला, “जे पाण्यांचे प्रवाह तू पाहिले, ज्यावर वेश्या बसली होती, ते म्हणजे पुष्कळ लोक, समुदाय, राष्ट्रांचे व भाषा बोलणारे लोक आहेत. 16 तो श्र्वापद आणि दहा शिंगे तू पाहिलीस ते त्या वेश्येचा तिरस्कार करतील. ते तिला ओसाड, उजाड करतील आणि तिला नग्न सोडून देतील, ते तिचे मांस खातील, व अग्नीने तिला जाळतील. 17 देवाचे वचन पूर्ण होईपर्यंत, देवाने त्या श्र्वापदाला सत्ता चालविण्याचा अधिकार देण्याचे कबूल केले आहे. देवाने त्याचा हेतु पूर्ण करण्याचे त्यांच्या मनात घातले आहे. 18 जी स्त्री तू पाहिलीस ती मोठी नगरी आहे, जी पृथ्वीवरच्या राजांवर सत्ता गाजवील.”
2006 by World Bible Translation Center