Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “पहाटेचे हरिण” या सुरांवर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
22 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस.
तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.
2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली
परंतु तू उत्तर दिले नाहीस
आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.
3 देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस
तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस.
4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला.
होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.
5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली.
त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही.
6 म्हणून मी कीटक आहे का?
मी मनुष्य नाही का?
लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
7 माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो.
ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.
8 ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग.
कदाचित् तो तुला मदत करेल.
तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.”
9 देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस.
मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस.
मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस.
आणि माझे सांत्वन केले आहेस.
10 मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस
मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस.
11 तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत
आणि मला मदत करायला कोणीही नाही.
12 माझ्याभोवती लोक आहेत
ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.
13 प्राण्यांवर गुरगुर करणाऱ्या व त्यांना फाडणाऱ्या
सिंहासारखे त्यांचे तोंड उघडे आहे.
14 माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या
पाण्यासारखी नाहीशी झाली आहे,
माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत
माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.
15 फुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहेस.
बिल्दद ईयोबला उत्तर देतो
18 नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले:
2 “ईयोबा, तू बोलणे केव्हा बंद करणार आहेस?
शांत राहा आणि लक्ष दे. आम्हाला काही बोलू दे.
3 आम्ही पशूसारखे मूर्ख आहोत असे तू का मानतोस?
4 ईयोबा तुझा राग तुलाच अधिक त्रासदायक होत आहे.
केवळ तुझ्यासाठी लोकांनी हे जग सोडून जावे का?
देव केवळ तुझ्या समाधानासाठी डोंगर हलवेल असे तुला वाटते का?
5 “हो दुष्ट माणसाचा प्रकाश नाहीसा होईल.
त्याचा अग्नी पेटणे बंद होईल.
6 त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल.
त्यांच्या जवळचा दिवा विझेल.
7 त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत.
तो हळु हळु चालेल आणि अशक्त बनेल.
त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अधःपात करतील.
8 त्याचेच पाय त्याला सापळ्यात अडकवतील.
तो आपणहून सापळ्यात जाईल आणि त्यात अडकेल.
9 सापळा त्याची टाच पकडेल.
त्याला घटृ पकडून ठेवेल.
10 जमिनीवरची दोरी त्याला जाळ्यात अडकवेल.
सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.
11 दहशत चहुबाजूंनी त्याची वाट पाहात आहे.
भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे.
12 वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत.
विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पहात आहेत.
13 भयानक रोग त्याची कातडी खाऊन टाकेल.
तो त्याचे हातपाय कुजवेल.
14 दुष्ट माणूस त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल.
त्याला भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.
15 त्याच्या घरात काहीही शिल्लक राहाणार नाही.
का? कारण त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरण्यात येईल.
16 त्याची खालची मुळे सुकून जातील
आणि वरच्या फांद्या मरतील.
17 पृथ्वीवरील लोकांना त्याची आठवण राहाणार नाही.
आता त्याची आठवण कुणालाही येणार नाही.
18 लोक त्याला प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील.
लोक त्याचा पाठलाग करुन या जगातून पळवून लावतील.
19 त्याला मुले आणि नातवंडे असणार नाहीत.
त्याच्या कुटुंबातले कुणीही जिवंत असणार नाही.
20 पश्र्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट माणसाचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल.
आणि पूर्वेकडचे लोक भयाने बधीर होतील.
21 दुष्ट माणसाच्या घराचे खरोखरच असे होईल.
जो माणूस देवाची पर्वा करीत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”
4 ज्याअर्थी देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या. 2 कारण आम्हालासुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही. 3 ज्या आम्ही विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. जसे देवाने म्हटले आहे.
“म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो,
‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत’” (A)
जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला. 4 कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसा बद्दल असे बोलला आहे की: “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्राति घेतली.” [a] 5 आणि पुन्हा या वचनांमध्ये तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत.”
6 ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासमुळे त्यात प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे. 7 त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्र्च्ति केली असून त्याला तो “आज” असे म्हणतो, अगोदरच उदधृत केलेल्या उताऱ्यामध्ये म्हटल्याप्रमाणे देव त्या दिवसाविषयी पुष्कळ वर्षांनी दाविदाद्वारे बोलला:
“आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
तर आपली अंतःकरणे कठीण करु नका.” (B)
8 कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता. 9 म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही सातवा म्हणजे विसाव्याच्या दिवस आहे. 10 कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वतःच्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता. 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु या. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
2006 by World Bible Translation Center