Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे मास्कील
55 देवा, माझी प्रार्थना ऐक
कृपा करुन माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस.
2 देवा, कृपा करुन माझे ऐक
आणि मला उत्तर दे मला माझ्या तक्रारी सांगू दे.
3 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले,
तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला.
माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला.
4 माझे ह्रदय धडधडत आहे
मी खूप घाबरलो आहे.
5 मी भीतीने थरथर कापत आहे.
मी भयभीत झालो आहे.
6 मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते.
मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.
7 मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.
8 मी पळून जाईन, मी माझी सुटका करेन.
मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन.
9 प्रभु त्यांचा खोटेपणा बंद कर. [a]
या शहरात मला खूप हिंसा आणि भांडणे दिसत आहेत.
10 माझ्या भोवती संकटे आहेत.
दिवस रात्र आणि शहराच्या सर्व भागात संकटे आहेत
या शहरात महाभयंकर घटना घडत आहेत.
11 रस्त्यावर बरेच गुन्हे घडत आहेत.
लोक सर्वत्र खोटे बोलत आहेत आणि फसवणूक करत आहेत.
12 जर शत्रूंनीच माझा अपमान केला
तर मी तो सहन करु शकेन.
जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला
तर मी लपू शकेन.
13 परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र,
माझा साथी, माझा दोस्त.
14 आपण आपली गुपिंतं एकमेकांना सांगितली
आपण देवाच्या मंदिरात बरोबर प्रार्थना केली.
15 माझे शत्रू त्यांची वेळ यायच्या आधीच मरावेत अशी माझी इच्छा आहे,
जिवंतपणीच त्यांचे दफन व्हावे असे मला वाटते.
का? कारण ते त्यांच्या घरात भयंकर गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
सोफर ईयोबशी बोलतो
11 नंतर नामाथीच्या सोफरने ईयोबला उत्तर दिले:तो म्हणाला,
2 “शब्दांच्या या भाडिमाराला उत्तर द्यायलाच हवे.
ह्या सगळ्या बोलण्याने ईयोब बरोबर ठरतो का? नाही.
3 ईयोब, आमच्याजवळ तुला द्यायला उत्तर नाही
असे तुला वाटते का?
तू देवाला हसशील तेव्हा तुला कुणी ताकीद देणार नाही
असे तुला वाटते का?
4 ईयोब तू देवाला म्हणतोस,
‘मी जे बोलतो ते बरोबर आहे
आणि मी शुध्द पवित्र आहे हे तू बघू शकतोस.’
5 ईयोब देवाने तुला उत्तर द्यावे
आणि तू चुकतो आहेस हे तुला सांगावे असे मला वाटते.
6 देव तुला ज्ञानाचे रहस्य सांगू शकेल.
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे तो तुला सांगेल.
तुला जेवढी शिक्षा करायला हवी
तेवढी देव करत नाही हे तू समजून घे.
7 “ईयोब, तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का?
त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे.
8 त्याचं शहाणपण स्वर्गाच्या उंचीइतकं आहे,
तू काय करु शकतोस?
ते मृत्यूच्या ठिकाणापेक्षा शेओलपेक्षा खोल आहे.
तू काय जाणू शकतोस?
9 देव पृथ्वीपेक्षा मोठा आहे
आणि सागरापेक्षा महान आहे.
10 “देवाने जर तुला कैद करुन न्यायालयात न्यायचे ठरवले,
तर त्याला कोणीही अडवू शकत नाही.
11 कवडीमोलाचा कोण आहे ते देवाला माहीत आहे.
तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्याच्या लक्षात राहातात.
12 रानटी गाढव माणसाला जन्म देऊ शकत नाही.
आणि मूर्ख माणूस कधीही शहाणा होऊ शकणार नाही.
13 पण ईयोब फक्त देवाची सेवा करण्यासाठी तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस
आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी त्याच्या दिशेने उचलले पाहिजेस.
14 तुझ्या घरात असलेले पाप तू दूर ठेवले पाहिजेस.
तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस.
15 तरच तू उजळ माथ्याने देवाकडे बघू शकशील.
तू न भीता सर्व सामर्थ्यानिशी उभा राहू शकशील.
16 नंतर तू तुझे दु:ख विसरशील.
तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
17 भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल.
आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्याप्रमाणे चमकेल.
18 नंतर तुला सुरक्षित वाटेल.
कारण तेव्हा तिथे आशा असेल.
देव तुझी चिंता वाहील आणि तुला विश्रांती देईल.
19 तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होऊ शकशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही.
तुझ्याकडे खूप लोक मदतीसाठी येतील.
20 वाईट लोकही मदतीची अपेक्षा करतील.
परंतु त्यांची संकटापासून सुटका नाही
त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”
9-10 आता जे विवाहित आहेत त्यांना मी आज्ञा देतो. मी ती आज्ञा देत नसून प्रभु देत आहे. पत्नीने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचे पाहू नये. 11 पण जर ती वेगळे राहते तर तिने लग्न न करताच राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा. आणि पतीने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊ नये.
12 आता इतरासाठी सांगतो, आणि हे मी सांगत आहे, प्रभु नाही: जर एखाद्या ख्रिस्ती बांधवाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल, आणि त्याच्याबरोबर राहण्यास ती राजी असेल तर त्याने तिला सोडचिठ्ठी देऊ नये. 13 आणि एखाद्या स्त्रीचा नवरा जर विश्वास ठेवणारा नसेल आणि तो तिच्याबरोबर राहण्यास राजी असेल तर तिने त्याला सोडचिठ्ठी देऊ नये, 14 कारण विश्वास न ठेवणाऱ्या पतीचे त्याच्या ख्रिस्ती पत्नीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे पवित्रीकरण झाले आहे आणि विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीचे त्या ख्रिस्ती पतीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे त्यांचे नाते देवाच्या दृष्टीनेही कायदेशीर आहे. नाहीतर तुमची मुले अशुद्ध झाली असती, परंतु आता ती पवित्र आहेत.
15 तरीही विश्वास न ठेवणारा वेगळा होत असेल तर त्याने वेगळे व्हावे. याबाबतीत ख्रिस्ती बंधु किंवा बहीण यांना मोकळीक आहे. देवाने आपल्याला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे. 16 कारण पत्नी, तू तुइया विश्वास न ठेवणाऱ्या पतीला तारु शकशील हे तुला कसे माहीत? किंवा पती, तू आपल्या विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीला तारशील हे तुला कसे माहीत?
2006 by World Bible Translation Center