Revised Common Lectionary (Semicontinuous)
धार्मिक माणूस ईयोब
1 ऊर देशात ईयोब नावाचा एक माणूस राहात होता. तो फार चांगला व श्रध्दाळू माणूस होता. ईयोब देवाची भक्ती करीत असे. ईयोब वाईट गोष्टीपासून दूर राहात असे.
सैतान ईयोबाला पुन्हा त्रास देतो
2 आणखी एके दिवशी देवपुत्र परमेश्वराला भेटायला आले. त्यांच्याबरोबर सैतानही होता. सैतान परमेश्वराला भेटायला आला होता. 2 परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू कुठे गेला होतास?”
सैतान परमेश्वराला उत्तर देत म्हणाला, “मी पृथ्वीवरच इकडे तिकडे भटकत होतो.”
3 नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, “माझा सेवक ईयोब याच्याकडे तू लक्ष देत होतास का? सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो खरोखरच फार चांगला व विश्वासू आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टींपासून दूर राहातो. तू मला निष्कारण त्याच्या जवळच्या सर्व गोष्टींचा नाश करायला सांगितलेस आणि तरीही तो विश्वासू राहिला आहे.”
4 सैतानाने उत्तर दिले, “कातडीला कातडी [a] मनुष्य जिवंत राहाण्यासाठी सर्व काही देऊ शकतो. 5 परंतु जर तू तुझ्या शक्तीचा वापर त्याला शारीरिक इजा करण्यासाठी केलास तर तो तुला तुझ्या तोंडावर शाप [b] देईल.”
6 तेव्हा परमेश्वर सैतानाला म्हणाला, “ठीक आहे. तो आता तुझ्या हाती आहे. मात्र त्याला मारण्याची परवानगी मी तुला देत नाही.”
7 मग सैतान परमेश्वराकडून निघाला. त्याने ईयोबाला ठणकणारी गळवे दिली. ईयोबच्या सर्वांगावर तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे होती. 8 म्हणून ईयोब कचऱ्याच्या ढीगाजवळ बसला. आपली गळवे खाजविण्यासाठी त्याने खापराचा तुकडा वापरला. 9 ईयोबाची बायको त्याला म्हणाली, “तू अजूनही देवाशी निष्ठावान आहेस का? तू देवाला शाप देऊन मरुन का जात नाहीस?”
10 ईयोबाने बायकोला उत्तर दिले, “तू एखाद्या मूर्ख बाईसारखी बोलत आहेस. देव जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी देतो तेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो. तसाच आपण संकटांचाही स्वीकार तक्रार न करता केला पाहिजे.” त्याच्या संकटकाळातसुध्दा ईयोबने पाप केले नाही. तो देवाच्याविरुध्द बोलला नाही.
दावीदाचे स्तोत्र.
26 परमेश्वरा, माझा न्याय कर.
मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर.
मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.
2 परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे.
माझ्या ह्रदयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
3 मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो.
मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
4 मी कपटी लोकांबरोबर जात नाही,
मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.
5 मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो.
मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.
6 परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून
तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
7 परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो
तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत त्या सत्यांची गाणी मी गातो.
8 परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते.
मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो.
9 परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस.
त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस.
10 ते लोक इतरांना फसवतील.
वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.
11 परंतु मी निरपराध आहे.
म्हणून देवा माझ्यावर दया कर आणि मला वाचव.
12 मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे.
परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.
देव त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे
1 भूतकाळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे पुष्कळ वेळा वेगवेगळ्या मार्गांनी बोलला. 2 पण या शेवटच्या दिवसांत तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने हे जगसुद्धा पुत्राकरवीच निर्माण केले. 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला. 4 तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे त्याला मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
त्यांचे तारण करण्यासाठी ख्रिस्त मनुष्यांसारखा झाला
5 जे येणारे नवीन जग होते त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही, त्याच भविष्याकाळातील जगाविषयी आपण बोलत आहोत. 6 पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे:
“मनुष्य कोण आहे की ज्याची
तुला चिंता वाटते?
किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की
ज्याचा तू विचार करावास?
7 थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले
तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
8 तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” (A)
देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही. 9 परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधु आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही. 12 येशू म्हणतो,
“मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन
मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.” (B)
2 काही परुशी येशूकडे आले. त्यांनी त्याला विचारले, “आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा हे मनुष्यासाठी कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले.
3 येशूने त्यांना उत्तर दिले, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?”
4 ते म्हणाले, “मोशेने पुरूषाला सुटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या बायकोला सोडण्याची परवानगी दिली आहे.”
5 येशू म्हणाला, “कारणकेवळ तुमच्या हट्टामुळे मोशेने तुमच्यासाठी ही पर्यायी अनुमति दिली (लिहिली) आहे. 6 परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण केले. [a] 7 या कारणामुळे पुरुष आपल्या आईवडिलांना सोडील व आपल्या पत्नीशी जडून राहील. 8 आणि ती दोघे एकदेह होतील. [b] म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. 9 यासाठी देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने वेगळे करू नये.”
10 नंतर, येशू व शिष्य घरात असता शिष्यांनी या गोष्टीविषयी त्याला विचारले, 11 येशू त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. 12 आणि जर पत्नी आपल्या नवऱ्याला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते तर तीही व्यभिचार करते.”
येशू मुलांचा स्वीकार करतो(A)
13 त्याने त्यांना स्पर्श करावा, यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणीत होते. परंतु शिष्यांनी त्यांना दटावले 14 येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावला आणि त्यांना म्हणाला, “लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे. 15 मी तुम्हांस खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा तेथे कधीही प्रवेश होणार नाही.” 16 तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले. आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि आशिर्वाद दिला.
2006 by World Bible Translation Center