Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 26

दावीदाचे स्तोत्र.

26 परमेश्वरा, माझा न्याय कर.
    मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर.
    मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.
परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे.
    माझ्या ह्रदयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो.
    मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
मी कपटी लोकांबरोबर जात नाही,
    मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.
मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो.
    मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.

परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून
    तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो
    तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत त्या सत्यांची गाणी मी गातो.
परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते.
    मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो.

परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस.
    त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस.
10 ते लोक इतरांना फसवतील.
    वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.
11 परंतु मी निरपराध आहे.
    म्हणून देवा माझ्यावर दया कर आणि मला वाचव.
12 मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे.
    परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.

ईयोब 2:11-3:26

ईयोबचे तीन मित्र त्याच्या भेटीसाठी येतात

11 ईयोबाचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि शोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी ईयोब वर आलेल्या संकटांविषयी ऐकले होते. ते आपली घरे सोडून एका ठिकाणी भेटले. ईयोबला भेटून त्याला सहानुभूती दाखवावी व त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले. 12 परंतु बऱ्याच अंतरावरुन जेव्हा त्यांनी ईयोबला पाहिले तेव्हा तो ईयोबच आहे याची त्यांना खात्री वाटेना. तो खूप वेगळा दिसत होता. त्यांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले आणि धूळ आपल्या डोक्यावर उडवून घेतली. 13 नंतर तिन्ही मित्र सात दिवस व सात रात्री ईयोबा बरोबर बसून राहिले. ईयोबाशी कुणी एक शब्दही बोलले नाही कारण ईयोब किती सहन करत आहे ते त्यांना दिसत होते.

इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो

नंतर ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. तो म्हणाला,

“मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस कायमचा नष्ट होवो.
    ज्या रात्री ‘तो मुलगा आहे’ असे म्हटले गेले ती रात्र कधीच आली
    नसती तर बरे झाले असते असे मला वाटते.
तो दिवस काळाकुटृ झाला असता,
    देवाला त्याचे विस्मरण झाले असते,
    त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
तो दिवस मृत्यूसारखा काळा होवो.
    ढगही त्या दिवशी लपले असते आणि काळ्या ढगांनी प्रकाशाला घाबरवले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.
अंधाराने त्या रात्रीला ठेवून घ्यावे.
    दिनदर्शिकेतून ती रात्र नष्ट होवो.
    तिचा अंर्तभाव कुठल्याही महिन्यात होऊ नये.
त्या रात्रीतून काहीही निर्माण होऊ नये.
    आनंददायी आवाज त्या रात्री ऐकू न येवोत.
जादुगाराने शापवाणी उच्चारावी आणि माझ्या जन्मदिवसाला शापावे.
    ते लिव्याथानाला चेतविण्यास सदैव तत्पर असतात.
त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत.
    त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो.
    सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
10 का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही.
    ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
11 मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही?
    मी जन्मतःच का मेलो नाही?
12 माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले?
    तिने मला स्तनपान का दिले?
13 मी जर जन्मतःच मेलो असतो तर आता मी अगदी शांत असतो.
    पूर्वी होऊन गेलेल्या राजेलोकांच्यात आणि विद्वानांच्यामध्ये मी झोपी गेलो असतो
आणि विश्रांती घेतली असती तर किती बरे झाले असते.
14     त्या लोकांनी आपल्यासाठी प्रासाद आणि शहरे बांधली
    परंतु आता ती ओसाड आणि उध्वस्त झाली आहेत.
15 ज्या राजांनी आपली थडगी वा घरे सोन्या रुप्यांनी भरली
    त्यांच्या बरोबरच माझेही दफन झाले असते तर बरे झाले असते.
16 मी जन्मतःच मेलेले
    आणि जमिनीत पुरले गेलेले मूल का झालो नाही?
दिवसाच्या प्रकाशाचा किरणही न पाहिलेले
    मूल मी असतो तर बरे झाले असते.
17 वाईट लोक थडग्यात गेल्यानंतरच त्रास देण्याचे थांबवितात.
    आणि जे लोक दमलेले असतात त्यांना थडग्यात विश्रांती मिळते.
18 थडग्यात कैद्यांनाही विसावा मिळतो.
    तेथे त्यांना रक्षकांचे ओरडणे ऐकू येत नाही.
19 थडग्यात, स्मशानात अनेक प्रकारचे लोक असतात, लहान थोर सर्व तेथे असतात,
    गुलामांचीही तेथे आपल्या मालकापासून सुटका होते.

20 “दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे?
    ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
21 ज्याला मरायचे आहे त्याला मरण येत नाही,
    दु:खी माणूस गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या शोधात असतो.
22 ते लोक थडगे दिसल्यावर अधिक सुखी होतील.
    आपली कबर मिळाली की आनंदी होतील.
23 परंतु देव त्यांचे भविष्य नेहमी गुप्त ठेवतो
    आणि त्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारतो.
24 जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही!
    माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
25 काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती वाटत होती आणि तेच घडले.
    जे भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत घडले.
26 मी शांत होऊ शकत नाही.
    मी स्वस्थ राहू शकत नाही.
मी विसावा घेऊ शकत नाही.
    मी अतिशय अस्वस्थ आहे.”

गलतीकरांस 3:23-29

23 हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांला प्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. 24 त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र जे आपणांला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते, ते आपले पालक होते. 25 पण आता हा विश्वास आलाच आहे, तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही.

26-27 कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28 तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. 29 आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि देवाने अब्राहामाला दिलेल्या वचनानुसार वारस आहात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center