Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 140

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतीगीत

140 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव
    दुष्टांपासून माझे रक्षण कर.
ते लोक वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत आहेत.
    ते लोक नेहमी भांडणाला सुरुवात करतात.
त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत.
    जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे.

परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव.
    वाईट लोकांपासून माझे रक्षण कर.
ते लोक माझा पाठलाग करतात,
    आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला.
    त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले.
    त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.

परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
    परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
परमेश्वरा, तू माझा बलदंड प्रभु आहेस.
    तू माझा रक्षणकर्ता आहेस.
    लढाईत माझे डोके वाचवणाऱ्या शिरस्त्राणासारखा तू आहेस.
परमेश्वरा, त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस.
    त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नकोस.

परमेश्वरा, माझ्या शत्रूंना जिंकू देऊ नकोस.
    ते लोक वाईट योजना आखत आहेत.
    पण त्या वाईट गोष्टी त्यांच्याच बाबतीत घडू दे.
10 त्यांच्या डोक्यावर निखारे ओत.
    माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे.
    त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्ड्यात फेकून दे.
11 परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस.
    त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.
12 परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे.
    देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.
13 परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची स्तुती करतील.
    चांगले लोक तुझी उपासना करतील.

एस्तेर 5

एस्तेर राजाशी बोलते

तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. ती उभी होती तो राजमंदिरासमोरचा भाग होता. राजमंदिरात राजा सिंहासनावर बसला होता आणि त्याचे तोंड लोक येत त्या दिशेलाच होते. त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तिला पाहून तो खुष झाला. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा राणी आत शिरली आणि राजाजवळ गेली. सुवर्णराजदंडाच्या दुसऱ्या टोकाला तिने स्पर्श केला.

मग राजाने तिला विचारले, “राणी एस्तेर तुला कसली काळजी लागली आहे? तुला काय विचारायचे आहे? तुला तू मागशील ते मी देईन, अगदी अर्धे राज्यदेखील देईन.”

एस्तेर म्हणाली, “तुमच्यासाठी आणि हामानसाठी मी भोजन तयार केले आहे. तुम्ही आणि हामान या भोजनाला आज यावे”

तेव्हा राजा म्हणाला, “हामानला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हाला एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.”

राजा आणि हामान मग एस्तेरने आखलेल्या भोजन समारंभाला गेले. ते द्राक्षारस घेत असताना पुन्हा राजाने एस्तरेला विचारले, “आता सांग एस्तेर तुला काय हवे आहे? हवे ते माग. मी ते तुला देईन. बोल तर काय पाहिजे? तुला काय हवे ते देईन, अगदी अर्धे राज्यसुध्दा देईन.”

एस्तेर म्हणाली, “मला मागायचे ते असे: राजाची माझ्यावर कृपादृष्टी असेल आणि मी मागेन ते द्यायला राजा खुशीने तयार असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानसाठी आणखी एक मेजवानी देईन. मला खरोखर काय हवे ते मी उद्या सांगीन.”

हामानचा मर्दखयवर राग

हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मनःस्थितीत राजमहालातून निघाला. पण मर्दखयला राजद्वाराशी पाहाताच त्याला मर्दखयचा आतिशय संताप आला. हामान तिथून निघाला तेव्हा मर्दखयने त्याला मान न दिल्यामुळे हामान रागाने वेडापिसा झाला. मर्दखय हामानला घाबरत नव्हता आणि त्याचाच हामानला राग आला. 10 पण आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि बायको जेरेश यांना त्याने बोलावले. 11 आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला त्याने सुरुवात केली. आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वाच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला. 12 हामान पुढे म्हणाला, “एवढेच नाहीतर राणी एस्तेरने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर फक्त मलाच काय ते तिने बोलावले. पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे. 13 पण या सगळ्या गोष्टींचा मला तेवढा आनंद होत नाही. तो यहुदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला आहे तोपर्यंत मला खराखुरा आनंद मिळणार नाही.”

14 मग हामानची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र यांनी एक सूचना मांडली ते म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक स्तंभ उभारायला सांग तो 75 फूट उंच असू दे. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.”

हामानला ती सूचना आवडली म्हणून त्याने फाशीचा स्तंभ उभारायची आज्ञा केली.

1 योहान 2:18-25

ख्रिस्ताच्या शंत्रूंना अनुसरु नका

18 माझ्या मुलांनो, शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताही पुष्कळ ख्रिस्तविरोधी दिसू लागले आहेत. त्यामुळेच आम्हाला कळते की, शेवट जवळ आला आहे. 19 ते आमच्यातूनच बाहेर निघाले, पण ते खऱ्या अर्थाने आमच्यातील नव्हतेच, मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर ते आमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की, त्यांना आम्हांला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचा नव्हता.

20 पण जो पवित्र असा ख्रिस्त याने तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. 21 मी तुम्हांला सत्य माहीत नाही म्हणून लिहीत नाही पण तुम्हांला ते माहीत आहे कारण सत्यापासून कोणतेच असत्य येत नाही.

22 येशू हा ख्रिस्त नाही असे म्हणणारा खोटा नाही काय? असा मनुष्य ख्रिस्तविरोधी आहे. तो पिता आणि पुत्र या दोघांनाही नाकारतो. 23 जो पुत्राचा नाकार करतो त्याला पिताही नसतो, पण जो पुत्राला मानतो त्याला पिताही असतो.

24 तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे, त्यामध्येच राहा, सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्ही राहाल, तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. 25 आणि देवाने आम्हांला जे देण्याचे अभिवचन दिले आहे: ते म्हणजे अनंतकाळचे जीवन होय.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center