Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 124

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.

124 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
    इस्राएल, मला उत्तर दे.
लोकांनी आपल्यावर हल्ला केला
    तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते
    तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते.
    नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे
    आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.

परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना
    आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.

जाळ्यात सापडलेल्या आणि
    नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत.
    जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
परमेश्वराकडून आपली मदत आली.
    परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.

एस्तेर 3

हामानचा यहुदींच्या संहाराचा बेत

या सर्व घडामोडी झाल्यानंतर राजाने अगागी हामानाचा गौरव केला. अगागी हामान हा हम्मदाथा याचा मुलगा. राजाने हामानला बढती देऊन इतर सर्व अधिकाऱ्यांपेक्षा मानाची जागा त्याला दिली. राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजावे सर्व सेवक हामानपुढे नतमस्तक होऊन त्याला मान देऊ लागले. पण मर्दखयने त्याच्यापुढे मान तुकवण्याचे किंवा त्याला मान द्यायचे नाकारले. तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयला विचारले, “हामानला मुजरा करायची राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?”

राजाचे सेवक मर्दखयला रोज हेच विचारू लागले तरी हामानला मुजरा करायची राजाज्ञा मर्दखयने पाळली नाहीच. तेव्हा या सेवकांनी हामानला हे सांगितले. हामान आता मर्दखयच्या बाबतीत काय करतो ते त्यांना पाहायचे होते. आपण यहुदी असल्याचे मर्दखयने या सेवकांना सांगितले होते. मर्दखय आपल्याला मुजरा करत नाही किंवा आपली मान तुकवत नाही हे हामानने पाहिले तेव्हा तो संतापला मर्दखय यहूदी आहे हे हामानला कळले होते. पण फक्त मर्दखयला जिवे मारून त्याचे समाधान होणार नव्हते. मर्दखयसारख्या सर्वांना, अहश्वेरोशच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहुदींना कसे मारता येईल याचा विचार तो करु लागला.

राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षातल्या नीसान या पहिल्या महिन्यात हामानने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. त्यानुसार अदार हा बारावा महिना निवडला. (त्या काळात अशा चिठ्ठ्यांना “पूर” म्हणत.) मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, “राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखुरलेले आहेत. इतर लोकांपेक्षा ते स्वतःला वेगळे ठेवतात. इतरांपेक्षा त्यांचे रीतिरिवाज वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. अशा लोकांना तुझ्या राज्यात राहू देणे हिताचे नाही.

“राजाची मर्जी असल्यास एक सूचना करतो: या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी. 10,000 रौप्यमुद्रा मी राजाच्या खजिन्यात [a] जमा करीन या पैशाचा विनियोग ही गोष्ट अंमलात आणणाऱ्या लोकांना मोबदला देण्यासाठी करता येईल.”

10 तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून हामानाला दिली. अगागी हामान हम्मदाथा याचा मुलगा होता. तो यहुद्यांचा शत्रू होता. 11 राजा मग हामानला म्हणाला, “हे धन ठेव. त्या लोकांना तुला काय द्यायचे ते दे.”

12 त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले गेले. त्यांनी हामानच्या आज्ञा प्रत्येक प्रांताच्या भाषेत लिहून काढल्या. प्रत्येक लोकसमूहाच्या भाषेत त्यांनी त्या लिहिल्या. राजाचे कारभारी, वेगवेगळया प्रांतांचे अधिकारी, आणि वेगवेगळया लोकसमूहांचे नेते यांनाही त्यांनी लिहिले. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि राजमुद्रा उठवून ते आदेश त्यांनी मुद्रांकित केले.

13 जासूदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. सर्व यहुद्यांचा नाश करावा, त्यांना ठार करावे, त्यांचा समूळ उच्छेद करावा असा राजाचा आदेश होता. तरुण व वृध्द माणसे, बायका मुले सगळ्यांचा त्यात समावेश होता. एकाच दिवशी सर्व यहुद्यांना ठार करावे असे त्या आदेशात म्हटले होते. तो दिवस म्हणजे अदार महिन्याचा, बाराव्या महिन्याचा तेरावा दिवस. यहुद्यांची सर्व मालमत्ता काढून घ्यावी असाही आदेश होता.

14 हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून द्यायची होती. प्रत्येक प्रांतात हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांना तो कळवण्यात येणार होता, जेणेकरून त्या दिवशी ते लोक तयार राहिले असते. 15 राजाच्या हुकूमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र चिंत्ताक्रांत झाले.

मत्तय 5:13-20

तुम्ही मिठासारखे तसेच प्रकाशासारखे आहात(A)

13 “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरूपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.

14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. 15 आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवीत नाही. उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. 16 तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.

येशू आणि जुन्या करारातील संदर्भ

17 “मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे. 18 मी तुम्हांला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशात्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही.

19 “म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल, पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल. 20 कारण मी तुम्हांस सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center