Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
21 शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी खड्डे खणतात. पाण्याला दिशा देण्यासाठी ते वेगवेगळे खड्डे बुजवतात. त्याच रीतीने परमेश्वर राजाच्या मनावर ताबा मिळवतो. राजाने जिथे जावे असे परमेश्वराला वाटते तिथे परमेश्वर त्याला नेतो.
2 माणूस जे जे करतो ते सर्व बरोबर आहे असे त्याला वाटते. पण लोक काही गोष्टी करतात या मागची खरी कारणे योग्य की अयोग्य ते परमेश्वरच ठरवतो.
3 ज्या गोष्टी योग्य व न्यायी आहेत त्याच करा. बळी अर्पण करण्यापेक्षा अशा गोष्टीच परमेश्वराला आवडतात.
4 गर्विष्ठ दृष्टी व गर्विष्ठ विचार पापरुप आहेत. माणूस पातकी आहे हेच ते दर्शवितात.
5 काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो. पण जर तुम्ही काळजी घेतली नाही आणि घाई घाईत गोष्टी केल्या तर तुम्ही गरीब व्हाल.
6 जर तुम्ही श्रीमंत होण्यासाठी लबाडी केलीत तर तुमची संपत्ती लवकरच नाहीशी होईल आणि तुमची संपत्तीच तुम्हाला मरणाचा मार्ग दाखवील.
7 दुष्ट लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्या त्यांचा नाश करतील. ते लोक योग्य गोष्टी करायला नकार देतात.
8 वाईट लोक नेहमी दुसऱ्यांना फसवायचा प्रयत्न करतात. पण चांगले लोक विश्वासू आणि न्यायी असतात.
9 सतत वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा घराच्या छतावर राहाणे अधिक चांगले.
10 दुष्ट लोकांना नेहमी वाईट गोष्टी करायच्या असतात आणि ते लोक त्यांच्या भोवतालच्या लोकांना दया दाखवत नाहीत.
11 जे लोक देवाची चेष्टा करतात त्यांना शिक्षा करा म्हणजे मूर्ख लोक धडा शिकतील. ते शहाणे होतील आणि नंतर त्यांना अधिकाधिक ज्ञान मिळेल.
12 देव चांगला आहे. दुष्ट लोक काय करतात ते देवाला माहीत आहे आणि तो त्यांना शिक्षा करील.
13 जर एखाद्याने गरीब लोकांना मदत करायला नकार दिला तर जेव्हा त्याला मदतीची गरज भासेल तेव्हा त्याला ती मिळणार नाही.
14 जर एखादा माणूस तुमच्यावर रागावला असला तर त्याला खाजगीरित्या एक भेट द्या. गुप्त भेट राग थोपवते.
15 योग्य न्याय चांगल्या लोकांना आनंदी बनवतो. पण तोच दुष्ट लोकांना घाबरतो.
16 जर एखाद्याने शहाणपणाचा मार्ग सोडला तर तो विनाशाकडे जातो.
17 जर एखाद्याला मजा करणे हेच अत्यंत महत्वाचे वाटत असेल तर तो गरीब होईल. जर त्या माणसाला द्राक्षारस आणि अन्न खूप आवडत असेल तर तो कधीही श्रीमंत होणार नाही.
यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी शंका घेतात(A)
23 येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
24 येशू म्हणाला, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन. 25 तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?”
येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 26 पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”
27 म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.”
तेव्हा येशू म्हणाला, “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.
येशू दोन पुत्रांचा दाखला सांगतो
28 “याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
29 “मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.
30 “नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.
31 “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?”
ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.”
येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32 जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.
2006 by World Bible Translation Center