Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
125 जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे आहेत.
ते कधीही थरथरणार नाहीत.
ते सदैव असतील.
2 यरुशलेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर त्याच्या माणसांभोवती आहे.
तो त्याच्या माणसांचे सदैव रक्षण करील.
3 दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत.
जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील.
4 परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा.
ज्या लोकांची मने शुध्द आहेत त्यांच्याशी तू चांगला राहा.
5 दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात.
परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील.
इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
ज्ञान, एक चांगली स्त्री
8 ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला
तू ऐकावेस म्हणून तुला बोलावत आहेत.
2 ते टेकडीच्या माथ्यावर जिथे रस्ते मिळतात,
तिथे उभे आहेत.
3 ते शहराच्या दरवाजाशी आहेत.
ते उघड्या दरवाजातून बोलावत आहेत.
4 ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते, “लोक हो! मी तुम्हाला बोलावत आहे.
मी सगळ्या लोकांना बोलावत आहे.
5 तुम्ही जर मूर्ख असाल, तर शहाणे व्हायला शिका.
मूर्ख माणसांनो समजून घ्यायला शिका.
6 लक्ष द्या! ज्या गोष्टी शिकवतो त्या महत्वाच्या आहेत.
मी तुम्हाला फक्त योग्य असलेल्या गोष्टीच सांगतो.
7 माझे शब्द खरे आहेत.
मला वाईटाचा, खोट्याचा तिरस्कार वाटतो.
8 मी ज्या गोष्टी सांगतो त्या न्याय्य आहेत.
माझ्या शब्दांत काहीही चुकीचे अथवा खोटे नाही.
9 जो माणूस समजूतदार आहे त्याला या गोष्टी स्पष्ट दिसतात.
ज्ञानी माणूस या गोष्टी समजू शकतो.
10 माझ्या शिस्तीचा स्वीकार करा.
ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे.
ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे.
11 ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे.
ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.
ज्ञानरुपी स्त्री काय करते
12 “मी ज्ञान आहे.
मी चांगल्या न्यायाने जगते.
तुम्ही मला ज्ञानाबरोबर आणि चांगल्या योजनांबरोबर पाहू शकता.
13 जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल.
मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वतःला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते.
मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
14 परंतु मी लोकांना योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते आणि योग्य चांगला न्याय देते.
मी समजूतदारपणा आणि शक्ती देते.
15 राजे राज्य करताना माझा उपयोग करतात.
राज्यकर्ते चांगले कायदे करण्यासाठी माझा उपयोग करतात.
16 प्रत्येक चांगला राज्यकर्ता त्याच्या अंमलाखाली असलेल्या
लोकांवर राज्य करण्यासाठी माझा उपयोग करुन घेतो.
17 मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते.
आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
18 माझ्याजवळही देण्यासाठी श्रीमंती आणि मानमरातब आहेत.
मी खरी संपत्ती आणि यश देते.
19 मी ज्या गोष्टी देते त्या शुध्द सोन्यापेक्षा चांगल्या असतात.
आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात.
20 मी लोकांना योग्य मार्गावर आणते.
मी त्यांना योग्य न्यायाच्या मार्गाने नेते.
21 जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते.
होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरुन टाकीन.
22 “खूप पूर्वी सुरुवातीला परमेश्वराने
प्रथम माझीच निर्मिती केली.
23 आरंभीला मला निर्माण केले गेले.
जगाची सुरुवात होण्यापूर्वी मी निर्माण झाले.
24 महासागराच्या आधी माझा जन्म झाला.
पाणी उत्पन्न होण्या आधी मी होते.
25 पर्वतांच्या आधी माझा (ज्ञानाचा) जन्म झाला.
डोंगरांच्या आधी माझा जन्म झाला.
26 परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याआधीच मी जन्मले.
शेतांच्या आधी माझा जन्म झाला.
देवाने पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच माझा जन्म झाला होता.
27 परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते.
परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते.
त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते.
28 परमेश्वराने आकाशात ढग ठेवण्याआधी माझा जन्म झाला.
आणि परमेश्वराने समुद्रात पाणी ठेवले तेव्हाही मी तिथे होते.
29 परमेश्वराने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते.
पाणी परमेश्वराच्या संमती शिवाय चढू शकत नाही.
परमेश्वराने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा मी तिथे होते.
30 एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते.
माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे.
मी त्याचा आनंद होते.
31 त्याने निर्माण केलेल्या जगाविषयी परमेश्वर उत्सुक होता.
तो तिथे निर्माण केलेल्या लोकांबद्दल आनंदी होता.
येशू यहूदी नसलेल्या स्त्रीला मदत करतो(A)
21 नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनच्या भागात गेला. 22 तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने पछाडली आहे.”
23 पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंति केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”
24 पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेढरांकडे पाठविले आहे.”
25 मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभु, माझे साहाय्य करा.”
26 परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही.”
27 ती स्त्री म्हणाली, “होय प्रभु, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात.”
28 तेव्हा येशूने तिला म्हटले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो.” आणी तिची मुलगी बरी झाली.
येशू अनेकांना बरे करतो
29 नंतर येशू तेथून निघुन गालील सरोवराकडे गेला. येशू डोंगरावर गेला आणि तेथे बसला.
30 मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. 31 मुके बोलू लागले, लुळे सशक्त झाले. व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले, आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचा गौरव केले.
2006 by World Bible Translation Center