Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 11

11 माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस?
    तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”

दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात.
    ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात.
    ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्रदयात सरळ सोडतात.
त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचा [a] असा नाश केला तर काय होईल?
    मग चांगली माणसे काय करतील?

परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो.
    तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो
आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो
    ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.
परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो.
    दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो.
तो त्यांच्यावर जळते निखारे आणि तप्त गंधक ओतेल.
    दुष्टांना फक्त तप्त आणि चटका देणारा वाराच मिळेल.
परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात.
    चांगले लोक त्याच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.

1 राजे 6:15-38

15 मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती. 16 मंदिराच्या आत मागच्या बाजूला तीस फूट लांबीचा अत्यंतपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या. 17 मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. हा साठ फूट लांब होता. 18 हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे नखभरही दर्शन होत नव्हते. या लाकडावर फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीवकाम केलेले होते.

19 आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या करारकोशासाठी गाभारा करवून घेतला होता. 20 याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी तीस तीस फूट होती. 21 शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोही सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या. 22 अतिपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवले होते.

23 कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी 15 फूट होती. ते अतिपवित्र गाभाऱ्यात ठेवले. 24-26 हे दोन्ही करुब तंतोतंत एकाच आकाराचे, एकाच मोजमापाचे होते. त्यांना प्रत्येकी दोन पंख असून प्रत्येक पंख साडेसात फूट लांबीचा होता. पसलेल्या दोन्ही पंखांची रुंदी 15 फूट भरत होती. आणि प्रत्येक करुब पंधरा फूट लांबीचा होता. 27 हे करुब देवदूत आतल्या अतिपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते. 28 हे दोन करुब देवदूतही सोन्याने मढवले होते.

29 दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेलही होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती. 30 दोन्ही खोल्यांची जमीन सोन्याने मढवली होती.

31 जैतूनाच्या लाकडाचे दोन दरवाजे कारागिरांनी करुन ते अतिपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या महिरपीला पाच बाजू होत्या 32 जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती.

33 मुख्य भागालाही त्यांनी दरवाजे केले. जैतून लाकडाची चौकट उभारुन 34 फरच्या लाकडाचे दरवाजे केले. 35 कारागिरांनी दोन दरवाजे केले आणि प्रत्येक दार दोन झडपांचे होते त्यामुळे ते दुमडले जात असे. त्यावरही पुन्हा करुब देवदूत, खजुरीची झाडे, फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने आच्छादली होती.

36 मग आतला चौक बांधला. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि देवदाराची एक ओळ अशा त्या भिंती होत्या.

37 वर्षाचा दुसरा महिना जिव तेव्हापासून त्यांनी मंदिराच्या कामाला सुरुवात केली. इस्राएलचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दींचे ते चौथे वर्ष होते. 38 बूल महिन्यात म्हणजेच वर्षाच्या आठव्या महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पण शलमोनाचे ते सत्तेवरचे अकरावे वर्ष होते. म्हणजेच मंदिर बांधायला सात वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम नियोजित नमुन्या प्रमाणे तंतोतंत झाले.

योहान 15:16-25

16 “तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि नेमले आहे. यासाठी की, तुम्ही जाऊन फळ द्यावे. आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांस द्यावे 17 तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांस आज्ञा देऊन सांगतो.

येशू त्याच्या अनुयायांना सूचना देतो

18 “जर जग तुमचा द्वेष करते, तर लक्षात ठेवा की, पहिल्यांदा जगाने माझासुध्दा द्वेष केलेला आहे. 19 तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर, जशी ते स्वतःवर करतात तशी प्रीति केली असती, पण तुम्ही जगाचे नसल्याने, आणि तुमची जगातून निवड केल्याने, जग तुमचा द्वेष करते.

20 “जे शब्द तुम्हांला सांगितले ते लक्षात ठेवा. कोणताही नोकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो. त्यांनी जर माझी छळणूक केली तर ते तुमचीही करतील, त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमचीसुद्या पाळतील. 21 माझ्या नावामुळे ते तुमच्याशी अशाप्रकारे वागतील, कारण ज्याने मला पाठविले, त्याला ते ओळखत नाहीत. 22 जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापाबद्धल दोषी ठरले नसते. आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही.

23 “जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. 24 मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत. मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या, तर पापाबद्धल ते दोषी ठरले नसते, पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला. 25 परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले: ‘कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला.’ [a]

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center