Revised Common Lectionary (Semicontinuous)
11 माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस?
तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”
2 दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात.
ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात.
ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्रदयात सरळ सोडतात.
3 त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचा [a] असा नाश केला तर काय होईल?
मग चांगली माणसे काय करतील?
4 परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो.
तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो
आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो
ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.
5 परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो.
दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो.
6 तो त्यांच्यावर जळते निखारे आणि तप्त गंधक ओतेल.
दुष्टांना फक्त तप्त आणि चटका देणारा वाराच मिळेल.
7 परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात.
चांगले लोक त्याच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.
मंदीराची बांधणी
6 अशा तऱ्हेने शलमोनाने मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याला 480 वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथे वर्षे होते. वर्षाचा दुसरा महिना जिव चालू होता. 2 मंदिराची लांबी 90 फूट, रुंदी 30 फूट आणि उंची 45 फूट होती. 3 मंदिराची देवडी 30 फूट आणि उंची 45 फूट होती. मंदिराची देवडी 30 फूट लांब आणि 15 फूट रुंद होती. मंदिराच्या रुंदीइतकीच या देवडीची लांबी असून ती मंदिराच्या मुख्य भागाला लागूनच होती. 4 मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या. 5 मंदिराच्या भोवती अनेक खोल्या एका रांगेत बांधल्या होत्या. हे बांधकाम तीनमजली होते. 6 खोल्या मंदिराच्या भिंतीला लागून असल्या तरी त्यांच्या तुळ्या या भिंतीत नव्हत्या. मंदिराच्या भिंतीची रुंदी तळाकडे जास्त असून वर त्या निमुळत्या होत होत्या. त्यामुळे या खोल्यांच्या एका बाजूची भिंत तिच्या खालच्या भिंतीपेक्षा पातळ होती. तळमजल्यावरील खोल्यांची रुंदी साडेसात फूट, पहिल्या मजल्यावरच्या खोल्यांची 9 फूट तर त्यावरच्या खोल्यांची साडे दहा फूट होती. 7 भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले होते. खाणीतूनच ते योग्य मापाने कातून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना होतोड्या, कुऱ्हाही किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही.
8 तळमजल्यावरील खोल्यांना मंदिराच्या दक्षिणेकडून आत जायला वाट होती. तिथून वरच्या मजल्यांवर जायला आतून जिने होते.
9 शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता. 10 मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची साडेसात फूट होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते.
11 यावेळी परमेश्वर शलमोनाला म्हणाला, 12 “माझ्या सर्व आज्ञा आणि नियम तू पाळलेस तर तुझे वडील दावीद यांना कबूल केले ते सर्व मी तुझ्यासाठी करीन. 13 तू बांधत असलेल्या या मंदिरात इस्राएलपुत्रांमध्ये माझे वास्तव्य राहील. इस्राएलच्या लोकांना सोडून मी जाणार नाही.”
14 शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले.
शेवटच्या शुभेच्छा
21 यासाठी तुम्हाला हे कळावे की मी कसा आहे आणि काय करीत आहे, म्हणून तुखिक तुम्हांला सर्व काही सांगेल. तो आमचा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये विश्वासू सेवक आहे. 22 मी त्याला केवळ या कारणासाठीच तुमच्याकडे पाठवीत आहे की माझ्याविषयीचे वर्तमान तुम्हांला कळावे आणि तुमच्या अंतःकरणाचे समाधान व्हावे.
23 देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्तापासून आता बंधु बहिणींना विश्वासासह प्रीति आणि शांति लाभो. 24 जे सर्व जण आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीति करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.
2006 by World Bible Translation Center