Revised Common Lectionary (Semicontinuous)
करारकोशाची मंदिरात स्थापना
8 इस्राएलमधील सगळी वडीलधारी मंडळी,. सर्व घराण्यांचे प्रमुख आणि कुटुंबातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरुशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून करारकोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले.
6 मग याजकांनी परमेश्वराचा तो करारकोश योग्य जागी ठेवला. मंदिरातील अतिपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.
10 अतिपवित्र गाभाऱ्यात [a] हा पवित्र करारकोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले. त्याबरोबर मंदिर मेघाने व्यापले. 11 परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेल्यामुळे याजकांना आपले काम चालू ठेवता येईना.
22 एवढे बोलून शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला. सर्व लोक त्याच्या समोर होते. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पसरुन वर पाहात 23 शलमोन म्हणाला,
“हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस. 24 माझे वडील दावीद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस आणि ते खरे करुन दाखवलेस. आपल्या मुखाने तू वचने दिलेस आणि तुझ्याच सामर्थ्यामुळे ते आज प्रत्यक्षात आले आहे. 25 माझ्या वडीलांना दिलेली इतर वचनेही. हे, इस्राएलच्या परमेश्वर देवा, तू खरी करुन दाखव तू म्हणाला होतास, ‘दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझे काटेकोर आज्ञापालन केले पाहिजे. तसे झाले तर तुमच्याच घराण्यातील कोणीतरी एकजण नेहमी इस्राएल लोकांवर राज्य करील.’ 26 परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, हा माझ्या वडीलांना दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.
27 “पण परमेश्वरा, तू खरोखरच इथे पृथ्वीवर आमच्यामध्ये कायम राहाशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यांतही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी अपुरेच आहे. 28 पण कृपाकरुन माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझ्या परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक. 29 पूर्वी तू म्हणाला होतास, ‘येथे माझा सन्मान होईल.’ तेव्हा रात्रांदिवस या मंदिराकडे नजर असू दे. या मंदिरातील माझी ही प्रार्थना ऐक. 30 परमेश्वरा, इस्राएलचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करु तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात असते हे आम्हाला माहीत आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हाला क्षमा कर.
41-42 “तुझी थोरवी आणि सामर्थ्य इतर लोकांच्याही कानावर जाईल. मग ते दूरदूरच्या ठिकाणांहून या मंदिरात प्रार्थनेसाठी येतील. 43 तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांनाही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांना कळेल.
प्रमुख गायकासाठी गित्तीथच्या चालीवर बसवलेले कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत.
84 सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.
2 परमेश्वरा, मला वाट पहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे.
मला तुझ्या मंदिरात यायचे आहे.
माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे.
3 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना
आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात.
ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात
आणि तिथे त्यांना पिल्ले होतात.
4 तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात.
ते नेहमी तुझी स्तुती करतात.
5 जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात,
ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. [a]
6 ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला
झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण
केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो. [b]
7 लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना
एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात.
8 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक
याकोबाच्या देवा, माझे ऐक.
9 देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर.
तू निवडलेल्या राजाला दया दाखव.
10 तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे.
माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे.
11 परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे.
देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो
जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात
आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो.
12 सर्वशक्तिमान परमेश्वरा,
जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात.
देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा
10 शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा. 11 देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे. 12 कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे. 13 म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.
14 म्हणून भक्क मपणे उभे राहा! सत्याने आपली कंबर बांधा, नीतीमत्त्वाचे उररत्राण धारण करा. 15 आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला. 16 या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल. 17 आणि तारणाचे शिररत्राण घ्या, आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे, तो घ्या. 18 प्रत्येक प्रंसांगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक विनंति करुन आत्म्यात प्रार्थना करा. चिकाटी व प्रार्थनेसह सर्व संतांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत राहा. कारण जेव्हा मी तोंड उघडेन तेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा. यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करुन देणे शक्य व्हावे. 20 त्याच्या वतीने मी साखळदंडनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे. धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा.
56 जो माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो.
57 “पित्याने मला पाठविले. तो जिवंत आहे आणि पित्यामुळे मीही जगतो. म्हणून जो कोणी मला खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील. 58 आपल्या वाडवडिलांनी अरण्यांत जी भाकर खाल्ली, त्या भाकरीसारखा मी नाही. त्यांनी ती भाकर खाल्ली परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरुन गेले. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाते तो अनंतकाळ जगेल.”
59 कफर्णहूम नगरातील सभास्थानात शिक्षण देताना येशूने या सर्व गोष्टी सांगितल्या.
अनंतकाळच्या जीवनाचे शब्द
60 येशूच्या शिष्यांनी हे ऐकले, त्यांपैकी अनेकजण म्हणाले, “हे शिक्षण स्वीकारण्यास फार कठीण आहे. कोण हे शिक्षण मान्य करील?”
61 आपले शिष्य याविषयी कुरकूर करीत आहेत, हे येशूने ओळखले. म्हणून तो त्यांना म्हणाला. “ही शिकवण तुम्हांला त्रासदायक वाटेल काय? 62 तर मग मनुष्याचा पुत्र जेथून आला तेथे परत जाताना पाहून तुम्हांला तसेच त्रासदायक वाटेल काय? 63 शरीराद्वारे मनुष्याला जीवन मिळत नाही. परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हांला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते. 64 परंतु तुमच्यातील काहीजण विश्वास ठेवीत नाहीत.” जे लोक विश्वास ठेवीत नव्हते, ते येशूला माहीत होते. येशूला हे अगदी सुरुवातीपासूनच माहीत होते. आणि जो मनुष्य त्याचा विश्वासघात करणार होता, तोही त्याला माहित होता. 65 येशू म्हणाला, “म्हणूनच मी तुम्हांला म्हटले की, ‘जर पिता एखाद्या व्यक्तीला माझ्याकडे येऊ देत नसेल तर ती व्यक्ती येणारच नाही.’”
66 येशूने हे सर्व सांगितल्यावर त्याच्या शिष्यांपैकी बरेच जण त्याल सोडून गेले; येशूच्या मागे जाण्याचे त्यांनी सोडून दिले.
67 नंतर येशूने आपल्या बारा शिष्यांना विचारले, “तुम्हांलासुद्धा मला सोडून जावेसे वाटते काय?”
68 शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी आम्ही कोठे जाणार? अनंतकलच्या जीवनाची वचने तर तुमच्याजवळ आहेत. 69 आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही पवित्र व्यक्ति आहात हे आम्हांला माहीत आहे.”
2006 by World Bible Translation Center